रविवार, २३ जुलै, २०१७

भिती कुणाची

भिती कुणाची

का वाटते मनाला ऊगा भिती कुणाची
आहे तुझे तुझ्याशी चिंता तुला कुणाची

कोणी कसे लिहावे ज्याची तयास चिंता
ऊगा पिळून जीवा त्वा खंत ती कुणाची

झाले कितेक मोठे होऊन थोर गेले
का ती फुका करावी चिंता इथे कुणाची

आस्वाद लेखनाचा चाखून छान घ्यावा
खोडी उगा कशाला काढायची कुणाची

लोकांस काय त्याचे तूम्ही कसे लिहावे
लावून बोल कोणा का हाय घ्या कुणाची

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29122/new/#new

http://www.maayboli.com/node/63209

शनिवार, २२ जुलै, २०१७

हायकू

#हायकू ११७
सांज वाहते
गूढ गर्द सावल्या
भास बाहुल्या २२-०७-२०१७

#हायकू ११६
काळी धरती
पावसाने खुलते
बीज रूजते २१-०७-२०१७

#हायकू ११५
बा रे पावसा
थांब आता जरासा
घेण्या उसासा २१-०७-२०१७

डोळे भरून गेले

डोळे भरून गेले

येथून नेमके का वारे फिरून गेले
सारे कसे निखारे येथे विझून गेले

कष्टात जिंकलेल्या सार्‍याच वैभवाला
डावात खेळतांना का ते हरून गेले?

युद्धात हारले जे जाता समीप जेत्या
उन्माद प्यायलेले हत्या करून गेले

नेत्रात भाव त्याच्या व्याकूळ गोठलेले
कोणास देख कष्टी डोळे भरून गेले

गाथा जरी बुडाली कुंभाड ते रचूनी    
सच्चे अभंग त्यांचे सारे तरून गेले

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29102/new/#new

गुरुवार, २० जुलै, २०१७

हायकू

#हायकू ११४
गंध फुलांचा
वारा स्वैर शोधतो
तोच वाहतो २०.०७.२०१७

#हायकू ११३
अतीव वृष्टि
इतस्त: पाणी पाणी
चिंता हो मनी १९.०७.२०१७


#हायकू ११२
एका घरात
जन्म घेती भावंडे
भिन्न स्वभाव १८.०७.२०१७

मंगळवार, १८ जुलै, २०१७

हायकू

#हायकू १११
पाऊल रानी
गवतात हिरव्या
तलम भास १८.०७.२०१७

#हायकू ११०
पाऊस गेला
पाखरे स्वैर झाली
नभी उडाली १६.०७.२०१७

#हायकू १०९
मेघ पाहती
सुर्य निघे अस्ताला
तो रक्तवर्णी १५.०७.२०१७


सोमवार, १७ जुलै, २०१७

गुढ अर्थ


!! गुढ अर्थ !!

न्यायचे सोबती, कोणा काय ठाव !
तरी धावा धाव, संचयासी !!

सुखाच्या शोधासी, करीता प्रयत्न !
होईना तो अंत, कष्टाचाही !!

वृत्ती समाधानी, ठेवोनी पहाता !
लागे सुख हाता, विचारांती !!

सांगोनी ते गेले, नश्वर ही काया !
तरी जडे माया, देहावरी !!

संताच्या वाणीत, वसे गुढ अर्थ !
जावो न तो व्यर्थ, म्हणे शिवा !!

© शिवाजी सांगळे🦋
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-29086/msg68887/#msg68887

शनिवार, १५ जुलै, २०१७

हायकू

#हायकू १०८
गंध दर्वळ
भ्रमरांचा घोळका
फुलली फुलं १५.०७.२०१७

#हायकू १०७
पाऊस थेंब
ओंजळीत दडले
मन रमले १४.०७.२०१७

#हायकू १०६
सांज हि आली
झाकोळलेे आभाळ
नीरवं शांत १२.०७.२०१७


शुक्रवार, १४ जुलै, २०१७

ओळख

ओळख

तुला मी आवडतो
मला सुद्धा तु आवडतेस,
समोर आल्यावर, का
ओळख द्यायची टाळतेस?
=शिव
410/12-07-2017

नको करू (अष्टक्षरी)

नको करू (अष्टक्षरी)

काजळ रेषा काढता
नेत्र बाण तो सुटतो

माळू नको तू गजरा
मीच मोहरून जातो

नको ते केस मोकळे
जीवाचा या गुंता होतो

ओष्ठशलाका लावते?
रक्तीमा गालास येतो

ओठा स्पर्ष अधराचा
कलेजा खलास होतो
© शिवाजी साांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t29015/new/#new

बुधवार, १२ जुलै, २०१७

या रे या...

या रे या...

फिरतात लोक आमचे
या रे, अतिरेक्यांनो या,
जीव घेण्या त्यांचा येथे
बेदिक्कत तुम्ही इथे या!

आम्ही केवळ निषेध न्
चर्चा करतो, तोवर या,
जावोत लोक पर्यटना वा
देव दर्शना, तेथे तूम्ही या!

लाज लज्जा सोडली ती
पुळका घेणारे आहेत, या,
पोसला कसाब तो आम्ही
पोसू तुम्हा, त्या साठी या!

झोपलोत कि सोंग करतो
नाही कळत, पाहण्या या,
स्वस्त आहेत जीव येथले
गोळीबाराच्या सरावास या!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t29009/new/#new