कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २६ मे, २०२५

अमृत २६०५२०२५ yq २१:०३:०५

अमृत

घेता दोन घोट जरासे, मेंदूला तजेला देतो
गंधाळून वाफाळल्या धमाल चर्चा घडवतो

थाटामाटात असतो कधी कुठे गुदमरलेला
खरा तर तो, कोपऱ्यावरील टपरीत भेटतो

काळ, वेळ, बंधनं ना त्या कशाचे लागलेले
रोजचा आहे तरी चारचौघात मजा आणतो 

उन्हाळा, पावसाळा वा ऋतू हिवाळा असो
तल्लफ भागवायला हा मात्र तत्पर असतो

ताण तणाव काहीही असो शिण घालवाया
आम्ही चहास या पृथ्वीवरले अमृत म्हणतो

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

पाऊस फील

पाऊस फील

कोसळला पाऊस येवढा तरी तो फील आला नाही
गढूळ पाण्यात नळाच्या, अजून गारवा मुरला नाही

वेडावतो माणूस जेव्हा, ऋतू त्याची नक्कल करतो
सावरुन जरी घेतो ऋतू, तरी माणूस बदलला नाही

वाहतील नदी नाले, येईलही पूर अताशा कुठे कुठे
तुंबणाऱ्या शहरांना सुद्धा अद्याप तो कळला नाही

कोडकौतुक खरे त्याचे, नित्य शेतात राबणाऱ्यांना
म्हणून मनाजोगा त्यांच्या पाऊस तो बरसला नाही 

बदलू लागलेत आडाखे, सारेच हल्ली असे येथले
कुठे,कधी,किती पडावे?अंदाज हा पावसाला नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=56923.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १८ मे, २०२५

रे मानवा १८०५२०२५ yq २०:४८:०७

रे मानवा 

प्रवास हा नजर रोखून वाटेवरचा 
अहमहमिकेत येथील जगण्याचा 

फसतो दुबळा न् कधी भक्ष्य होतो
अलिखित कठोर नियम निसर्गाचा 

शिस्तबद्ध सारीच यातायात मोठी 
तरीही जो तो अतुट भाग सृष्टीचा 

सारेच शांत आलबेल भूक नसता 
हस्तक्षेप नसतो कुणाला कुणाचा 

तरीही एक विनंती, तुला रे मानवा
सोड उद्योग अतिक्रमण करण्याचा 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ३ मे, २०२५

साखर झोप

साखर झोप

नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी
होतात खरी, पहाट स्वप्ने, साखर झोप ती हवीहवीशी

वाहता मोगरगंध, मंद त्या कुंतलांचा
भास होता जरासा नाजूक पैंजणांचा
वेडावून देते हालचाल तुझी ती जराशी
मीही शोधतो किणकिण हात उशाशी...१
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी

चाळवते झोप न् अंगभर उठतो शहारा 
मिठीत बद्ध होण्या तनू दे तनूस दुजोरा
बहरून गारव्यात अन् बिलगता उराशी
चालतो संवाद फक्त स्पर्शाचा स्पर्शाशी...२
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी

हव्याहव्याशा तृप्तीने होता गात्रे सुस्त
अस्तव्यस्त तरी ही यौवन सुडौल पुष्ट 
वाटता, बोलावे पुन्हा मौनाने मौनाशी
लटका नकार न् डोळ्यात दिसते खुशी...३
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी
होतात खरी, पहाट स्वप्ने, साखर झोप ती हवीहवीशी

https://marathikavita.co.in/index.php?topic=55761.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १ मे, २०२५

भाबडेपणा ०१०५२०२५ yq १६:२५:१०

भाबडेपणा

नाही ठाऊक फुलपाखराला
डायरीमधील फुल सुकले आहे!

कोरडलेल्या पाकळ्यांना पण
भावशून्य शब्दांची साथ आहे!

तरीही भाबडेपणा वेडा इतका
फुलपाखरू घिरट्या घेत आहे!

कुठवर जगावे आशेवर इतके
रंगीत गोजिरा छळभास आहे!

यावी ना,कल्पना या जीवाला
मोहात फसणे असे व्यर्थ आहे!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

अज्ञात शक्ती



















अज्ञात शक्ती

उच्चारलास कधी शेवटचा शब्द स्मरतो का 
मुक,अबोल संवाद ध्यानी कोणा राहतो का

चालणार कुठवर, प्रित ही राखून मौन असे
राग रूसवा एवढा, मनात कोणी ठेवतो का

कटाक्ष स्पर्श आधी, नंतर संवाद घडला येथे 
वैश्विक संपर्क आधार हा सहजी तोडतो का

होतो आघात शब्दांनी,कबूल, तरीही प्रेमात
दिल्या घेतलेल्या शब्दांचे महत्व टाळतो का

शब्दच देती धीर,आधार हिम्मत आपल्याला
प्रसंगी तीच असते अज्ञात शक्ती जाणतो का 

https://marathikavita.co.in/index.php?topic=54645.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

सगळे म्हातारे

सगळे म्हातारे

म्हातारे असं कसं करतात?
सकाळीच लवकर उठून बसतात
टाकलाय का हो चहा कुणी?
रँन्डमली उगाच विचारून पाहतात !

न् चहा घेता घेता चवीने 
उगा काहीबाही चौकश्या करतात
अडल्या नडल्या गोष्टींवर
न मागता आपणहून मतही देतात !

फिरता फिरता घरभर 
इतस्ततः पडलेल्या वस्तूंशी बोलतात 
नुसते बोलतच नाहीत
पुन्हा त्यांना,त्यांच्या जागेवर ठेवतात !

नाष्ट्या सोबत, पेपरही उरकतो
न् काही बातम्यांवर लेक्चर ठोकतात
मधेच काहीतरी वाचता वाचता
स्वतःमधे स्वतःच का हरवून बसतात?

आठवण करता सहज कुणी
आपोआप आपणहून भानावर येतात
तसं दूसरं काही काम नसता 
पोथी किंवा मोबाईल घेऊन बसतात !

नातवंडांसह खेळ खेळतानां 
लहान होत त्यांच्याशी भांडणं करतात
दटावता म्हातारीने हळूच कधी
मग लटक्या रागाने रूसूनही बसतात !

गंभीर चर्चेत एखाद्या दुपारी
अनुभवांच्या चार गोष्टी ऐकवतात
पोराबाळांनी मानलं तर ठिक
नाहीतर गपगुमान शांतपणे बसतात !

संध्याकाळी ते मात्र, हमखास
आठवून काही हळवे, कातर होतात
म्हातारीशी सावकाश बोलताना
गुपचुप स्वतःचे डोळे टिपून घेतात !

काहीतरी पुटपुटत स्वतःशी
मनात कसलीतरी उजळणी करतात
अगदीच नाही काही सुचलं
तर पोथी घेऊन हाती एकांती बसतात !

वयोपरत्वे आल्या आजारांची
दागिने आहेत म्हणून टर उडवतात
चालते फिरते असले तरी
कधी कधी जास्त चिडचिड करतात !

रात्रीचं जेवण, गोळ्या, औषध
मात्र न चुकता, आपणहून स्वतः घेतात
उद्या पुन्हा कामं आहेत म्हणता
डोळे मिटून अंथरूणात जागेच राहतात !

नेहमीच प्रश्न पडतो मला
सगळे म्हातारे असं काय करतात?
कदाचित वाढत्या वयाशी
कर्तव्याचा गुणाकार का मांडतात ?

https://marathikavita.co.in/index.php?topic=54446.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १३ एप्रिल, २०२५

जागता जागता

जागता जागता

वाटेत भेटले कुणी अचानक चालता चालता 
घेतल्या आणाभाका मैत्रीच्या बोलता बोलता 

सांगितले गेले गुपित मनीचे,सारे खाजगीतले 
करूनी कित्येक प्रयत्न त्यांस टाळता टाळता 

का रंगली चर्चा दोघात एवढी...काही कळेना 
कोमेजला गजरा मोगऱ्याचा माळता माळता 

बातचीत अन् झडल्या चर्चा,रात्रभर दोघांच्या 
एकट्यात तेवणारा दीपस्तंभ विझता विझता 

किमया अशी काय झाली त्या रात्र मैफलीची 
रेंगाळले गोड स्वप्न, स्वप्नातून जागता जागता 

https://marathikavita.co.in/index.php?topic=54388.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

तुटलो असा की

तुटलो असा की

एकदा तुटलो असा की, पुन्हा वळलो नाही 
बदलूनी वागणे बोलणे कुणा कळलो नाही 

सोडली वाट ती, देवून दु:खे जी गेली काही
दाखवली आमिषे कैक तरी पाघळलो नाही 

उगाच पोळले आयुष्याने,या असे वेळोवेळी 
अज्ञाताने कोणा बळ दिले नी जळलो नाही 

पचवता पचवता खेळात डाव छळकपटाचे    
नव्हतो अव्वल तरी, मुद्दाम कोसळलो नाही

लागले वेड जीवनाचे, अविट सोसता वेदना 
मात्र मायेस आभासी, येथल्या चळलो नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=54159.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

शहरामध्ये

शहरामध्ये

वेदनांना गाव नाही बदलत्या शहरामध्ये 
भावनांना भाव नाही वाढत्या शहरामध्ये 

जो तो व्यस्त येथे, कार्यात कोणत्यातरी
ऐकण्या नाही कुणी बोलत्या शहरामध्ये 

दाखवतो रात्रंदिवस आसमंत एकच रंग  
लख्ख उजेड नभात जागत्या शहरामध्ये

भडकतात ज्वाळा दुरदूर वर ठिणग्यांनी
स्वार्थ साधू अफवांनी पेटत्या शहरामध्ये

पुर्वापार म्हटले गेले "थांबला तो संपला"
खरे उतरते सत्यात, धावत्या शहरामध्ये

https://marathikavita.co.in/index.php?topic=54029.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ६ एप्रिल, २०२५

कथा

कथा 

सांगे एक कथा गळून पडलेलं पान 
ठरव तू, खरं खोटं मानायचं ते मान 

प्रत्येका वाट्याला,येतात सुखदुःख 
मिळतो तसाच कधी मान अपमान 

नाते फांदीशी,अन् लोकांशी काय?
जोवर हिरवेपण देठात, तोवर शान

एखाद दिवशी, काही तरी बिनसतं 
शुष्कता येताच,फांदी काढते ध्यान

झोके अन् हेलकावे, घेत वाऱ्यावर 
मिसळून मातीत, होते मातीसमान 

https://marathikavita.co.in/index.php?topic=53901.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

एकांतवेळी

एकांतवेळी

काय सांगू एकांतवेळी, काय काय होते 
राहून राहून सारखी तुझी आठवण येते

आक्रंदत राहते मन उगा आतल्या आत 
शोधण्यास तुला झाडां फुलांत दौड घेते

बैचेन भावनांचा, उरी या केवढा पसारा 
सावरावे म्हणता, फिरून मना सतावते

करावी प्रतिक्षा कुठवर,एकट्या एकांती
आवर्तन ते भासांचे, तुझ्या वारंवार होते

कसे कळावे तुला, एकांत कसा छळतो
उगाच का,मन माझे गाणे विरहाचे गाते

https://marathikavita.co.in/index.php?topic=53800.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १ एप्रिल, २०२५

आभासी फैसला

आभासी फैसला

खरंच मन गुंतले या आभासी दुनियेत 
काय आहे वास्तवात नाही ध्यानी येत 

इन्स्टा,फेबु, वॉअँ आणि एक्स सोडून 
लोकांना आजकाल नाही जगता येत 

पूर्वी बरं होतं, होते खेळ मैदानी खुप 
कोणा एकात,लोक जमवून होते घेत 

कामकाज पण आजकाल बैठं झालं 
कॉर्पोरेट चालतं आभासी सोबत थेट

दुखून येतात बोटं मान,खांदे न् कंबर
बसून बसून, हळूहळू सुटू लागतं पोट

धरावी का सोडावी आभासी दुनिया?
फैसला काही पक्का आज नाही होत

https://marathikavita.co.in/index.php?topic=53537.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

गुरुवार, २७ मार्च, २०२५

धाकधुक २७०३२०२५ yq १३:१९:१०

धाकधुक

परीक्षेची धाकधुक पावलोपावली असते 
इच्छा असो नसो परीक्षेला बसावे लागते

आयुष्य नावाचे मुक्तविद्यापीठ खरे इथले
जीवनात, वेगवेगळ्या परीक्षा घेत असते

नापास किंवा पास काही जरी झाले तरी
परिस्थितीला येणाऱ्या, तोंड द्यावे लागते

प्रेम,आनंद,दु:ख अशा कित्येक भावनाना
इच्छा नसता उगाचच सामोरे जावे लागते

धाकधुक नित्याचीअशा, अज्ञात परीक्षेची
नको नको म्हणता, उरात धडधडत राहते

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

बुधवार, २६ मार्च, २०२५

पोरके २६०३२०२५ ०६:४४:११


















पोरके

उन्हाळ्याची सुरुवात 
यंदा फारच तिव्रतेने झाली 
आम्हीच खरे कृतघ्न
सारी वनसंपदा नष्ट केली

अजून थोडा वेळ आहे
जिद्दीने वातावरण हे सावरा
विकास थोडा थांबवून
वृक्षारोपणाची सुरुवात करा

आधुनिकतेच्या नादात
पर्यावरण पार विसरून गेलो 
भविष्यात आम्ही म्हणू
निसर्गा शिवाय पोरके झालो

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

मंगळवार, २५ मार्च, २०२५

प्रेम कार्य

प्रेम कार्य

आठवण आभास देते, स्पर्श नाही
व्याकूळतेत या, कशाचा हर्ष नाही

उरतो केवळ खेळ एक विचारांचा
त्यातून काही निघत निष्कर्ष नाही

जगा लेखी प्रेम कोणते कार्य मोठे
मानावे का श्रेष्ठ ज्यात संघर्ष नाही

कितीक काळ घुसमटायचे अजून
झुरण्यात येथे, काही उत्कर्ष नाही

सुरवातीसच फैसला होतो मनाचा
उगाच फुकटची चर्चा-विमर्ष नाही

लोटला काळ, होत्या अमर जोड्या
म्हणे शिव आज कुणी आदर्श नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=53344.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

पांथस्थ

पांथस्थ

खरा तर नशिबाचा खेळ सारा
वळणावर संपतो रस्ता बिचारा
पाहताना दूरवरून कधी कधी
साऱ्यांना भुलवितो, हा नजारा

दोष ना त्याचा, न् तुमचा काही 
भ्रम केवळ, मनाचा खेळ सारा
सारीच वाट ती त्याची बेतलेली
वळणे नागमोडी, प्रवास न्यारा

व्याप मनाचा, अन् ताप देहाला
अविरत चाले हा संसार पसारा
कोणा ठावे कोण कुठवर साथी
संथ पथी, शोधे पांथस्थ सहारा

https://marathikavita.co.in/index.php?topic=53341.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शनिवार, २२ मार्च, २०२५

भावनांच्या भरात

भावनांच्या भरात

काहीबाही घडतं भावनांच्या भरात
ठरवूनही कैकदा येत नाही ध्यानात

कित्येकदा असतात शुल्लक घटना
तरीही, विषय वाढून जातो खोलात

ठरवतात नेहमी पुन्हा नको व्हायला
नाही म्हणूनही, वाद वारंवार होतात

होतो गैरसमज न् अकारण नाराजी
उगाच मन कुढते, मनातल्या मनात

होवो न वेडेवाकडे भावनेच्या भरात
दिलजमाई होता हे दोघेही ठरवतात

https://marathikavita.co.in/index.php?topic=53222.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

कथा २१०३२०२५ yq ०९:५१:४२


कथा

माझी पहिली कविता..अर्थात
तिच्या साठीच होती

तिला काहीच माहीत नसताना
ती माझी राणी होती

बराचसा काळ स्वप्नांत जगलो
ती मात्र अनभिज्ञ होती

आता ती कुठे? मीच अनभिज्ञ
उरली सारी कथा हाती

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

सोमवार, १७ मार्च, २०२५

नव मार्ग

नव मार्ग

सुधरत नाही,चुकलेली वाट पुन्हा एकदा 
का चुकलो आपण?मनात एकच तगादा 

शोधता उत्तरे, काहीच हाती लागत नाही 
झरू लागती अंतरी, नवे प्रश्न काही बाही

एक मात्र होते, धडा नवीन मिळून जातो 
जगण्याचा अर्थ स्वतःलाच कळू लागतो

समृद्ध होते, शिदोरी विविध अनुभवांची
कळते ना किंमत, भोवतालच्या जगाची 

कसाही असो न्याय उफराटा या जगाचा 
हिंमत येते शोधण्यास नव मार्ग स्वतःचा

https://marathikavita.co.in/index.php?topic=53033.0

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९