लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

बेस्ट आऊट आँफ वेस्ट
































            "बेस्ट आऊट आँफ वेस्ट" किंवा "कचऱ्यातून कला", तसं तर नावातच सर्व काही आलं, आणि हे साध्य करण्यासाठी हवाय घरात कामी न येणारा थोडासा अनावश्यक पसारा सोबत बऱ्यापैकी वेळ, कल्पकता आणि महत्त्वाची ती इच्छाशक्ती. 

            तर झालं असं की सालाबादप्रमाणे यंदाच्या दिवाळीसाठी आकाश कंदील तयार करायचा बेत आखला आणि तयारीला लागलो, काही बांबूचे तुकडे होते, ते व्यवस्थित कापून, साळून घेतले खरे, पण या सर्व कामासाठी लागणारी काही छोटीमोठी हत्यारे काही एका ठिकाणी सापडत नव्हती मग पुन्हा त्यासाठी काही तरी करणं आलं. अर्थात प्राधान्यक्रम कंदिलाला होता तो तर तयार केलाच सोबत घरात अतिरिक्त असलेल्या जाडसर ग्लॉसी पेपर व जुन्या लग्न पत्रिका वापरून डिझायनर, टोटल बांबू व प्लास्टिक फ्री आकर्षक पारंपरिक कंदील देखील तयार केला म्हणजे करायला गेलो एक अन् झाले दोन, पण मजा आली, एक वेगळंच समाधान मिळालं, अर्थात स्वनिर्मितीचा आनंद काही औरच असतो नाही का?

            तर आता दुसरा मुद्दा, वर म्हटल्याप्रमाणे काही जुन्या लग्न पत्रिका निवडून एकत्र केल्या, डोक्यात स्टेशनरी बॉक्सचा आराखडा तयारच होता, प्रथम  बेस तयार केला, मोजमाप घेऊन अपेक्षित खण, त्यांचे आकार, कटींग झाल्यावर आतल्या बाजूस जुन्या लिफाप्याचा खाकी पेपर वापरला, नंतर भिंती आणि आतले खण गोंद व आवश्यक तेथे फेव्हीकॉल वापरून तयार केले व शेवटी आकर्षक अशा लाल व सोनेरी लग्न पत्रिकांच पद्धतशीर कटींग करून डकवण्याचं काम केल आणि घरच्या वापरासाठी सुबक असा स्टेशनरी बॉक्स तयार झाला.

            अगरबत्तीच्या गोल खोक्यांचा फ्लॉवर पॉट आणि पिस्त्याच्या टरफलांची फुलं कधीकाळी तयार केली होती, आताही पुठ्याचे काही मोठे गोल खोके हाती लागले आणि सजवायला पत्रिका होत्याच, मग त्यांना सुद्धा थोडासा साज चढवला, पैकी एक तर माझ्या एका स्नेह्यांना खुप आवडला, म्हटलं 'माझी छोटीशी आठवण भेट असु द्या तुमच्या साठी', म्हणून दिला, ते खूष आणि मी समाधानी. 

            माझं ठरलयं, असेच काही वेगळं 'बेस्ट आऊट आँफ वेस्ट' करीत वेळेचा सदुपयोग करायचा व नव निर्मितीचा आनंद घ्यायचा, तर लवकरच भेटू आणखी काही नव्या कलाकृतीसह...

~शिवाजी सांगळे 🦋 २१|११|२०२०

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

विल्हेवाट













नमस्कार मंडळी,

          आज थोडसं नवीन विषया बद्दल, हल्लीच मला सोशल मिडिया द्वारे समजलेला हा विषय तसा बऱ्याच जणांना माहीतही असेल? तरीही, फोटोतील या बाटल्या साध्यासुध्या नाहीत, खरं तर या साधारण प्लास्टिकच्याच, पण जरा खास आहेत. नाही समजलं? मंडळी, खरेदी केलेल्या बिस्कीट, चिप्स, कुरकुरे, चॉकलेट, वेफर्स इत्यादी खाद्यपदार्थां सोबत अनाहूत पणे घरात शिरलेले वेगवेगळ्या प्रकारचे शे-सव्वाशे रँपर्स पोटात घेऊन तट्ट झालेल्या या बाटल्या आहेत. आज जागभरात अशाप्रकारच्या बाटलीस पर्यावरणपूरक विट (Eco Brick) असे संबोधले जाते. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करून रस्ते, प्लेवर ब्लॉक, पत्रे इत्यादी वस्तू बनविल्या जातात.

             एरवी आपण असे अनेक रँपर्स, पिशव्या सहजपणे कचऱ्यात टाकतो, त्याचं पुढे काय होतं ते कालांतराने आपल्याला पावसाळ्यात समजतं, नाले, गटारं तुंबतात, हळूहळू नद्या, समुद्रात जावून जल प्रदूषण, जाळल्यावर वायू प्रदूषण वाढते आणि एकंदरीत निसर्गाचा तोल बिघडून ऱ्हास होतो जो भविष्याच्या दृष्टीने मानवासाठी, आपल्या साठी फारच घातक आहे. 

             अशा प्लास्टिकची वैयक्तिक स्तरावर विल्हेवाट लावणं आपल्याला सोपं आहे, फावल्या वेळात वा सवडीनुसार स्वच्छ व कोरडे असलेले प्लास्टिकचे रँपर्स, पिशव्यांचे छोटे तुकडे करून सहजपणे एका बाटलीत ठासून भरायचे व ती बाटली कालांतराने भंगारात किंवा असा सुका कचरा गोळा करणाऱ्यांकडे सुपुर्द करून द्यायची झालं...

             अप्रत्यक्षपणे का होईना, पर्यावरणाप्रती मी एक छोटसं पाऊल टाकलं आहे, आपण कधी सुरवात करणार? बघा जमतय का?

~शिवाजी सांगळे, बदलापूर ०९|११|२०२०




गुरुवार, २६ मार्च, २०२०

कोरोना कैदी?

कोरोना कैदी?

बाहेर कर्फ्यु सदृश वातावरण, रस्त्यावर उगाच भटकणाऱ्यांना वर्दीवाले मनापासून चोपतात अशा बातम्या आणि त्यात त्यांचा दोष नाही हे पटत होतं, आणखी म्हणजे आम्ही त्या शहरातील जावई आहोत याचा पास वा परवाना आमच्याकडे नसल्याने आणि त्यांना हे कळायची सुतराम शक्यता नसल्याने आम्ही मात्र नजरकैदेत अन् त्या नाइलाजामुळे संध्याकाळी अंगणात खुर्ची टाकून बसलो, सहज वर नजर गेली, तर निलगिरीच्या पानांआड शेजारच्या इमारतीच्या टेरेसवर काहीतरी हालचाल दिसली, पाहतो तर चारपाच जणांच एक वानर कुटुंब मस्त मजेत उड्या मारीत सैरसपाटा करीत होतं, ते पाहून मनात उगाच त्यांच्या बद्दल आसूया वाटू लागली, एकीकडे सरकारी आदेशानुसार चालती बोलती माणसं आपआपल्या घरात व आहे त्या जागेवरच पुतळा झालेली आणि एक हे मुक्त जीव, आपला नैसर्गिक हक्क बजावत जणू जाणीव करून देत होते कि, निसर्गाचा मान राखा, तो तुमची काळजी घेईल, पण माणूस असा विचार थोडा न करतो, तो तर स्वार्थासाठी जगतो.

पर्यटन स्वखर्चाने असो वा फुकट, चार सहा दिवसांपेक्षा जास्त नको वाटतं आणि पाहुणचार कुणाकडून अगदी सासुरवाडीतला का असेना, आठ दिवसांपेक्षा जास्त बरा नसतो, सद्या अशीच काहीशी अवस्था माझी झाली आहे म्हणूनच म्हणावंसं वाटतं की काय पण वेळ येते एक एकदा!

गेल्या महिन्यात सासुबाईनां देवाज्ञा झाल्यामुळे सासुरवाडीला यावं लागलं, जवळपास नाही हो, चांगलंच बाराशे किलोमीटर लांब, परमुलखात ग्वाल्हेरला काही दिवसांच्या मुक्कामा नंतर आस्मादिक सहकुटुंब पुन्हा आपल्या घरी 'माहेरी' सुखरूप परत आलेले.

पण वेळ सांगून येत नाही म्हणतात तेच खरं, आणखी काही कामानिमित्त आठवड्यापुर्वी पुन्हा सासुरवाडीला यावं लागलं आणि तेही नेमकं कोरोनाच्या सावटाखाली, आणि तिथेच सारा घोटाळा झाला. तसं पाहिलं तर काही अपवाद वगळता सासुरवाडीला येणं नुकसानदायक नाही हे समस्त जावई मंडळींना वेगळं सांगायला नको, पण परीस्थिती तुमच्यावर कशी वेळ आणेल हे सांगता येत नाही, अगदी असंच काहीसं झालं, परतीच्या हिशोबाने तिकीट वगैरे बुक करून झाले होते, पण... करोना आडवा आला, शासकीय आदेशानुसार सुरवातीला मार्च अखेर लॉकडाऊनचा आदेश, सर्व वाहतूक बंद, याला काही पर्याय नाही...इतपत ठिक म्हणून "मरता ना क्या करता"? असा विचार करीत मनाला समजावलं.

रात्री आठ वाजता प्रधान सेवकांनी देशाला केलेले संबोधन ऐकलं आणि पहिल्यांदा पुढील एकवीस दिवसांच्या कंपलसरी मुक्कामाची आम्ही धास्ती घेतली, तसा कुठल्याही प्रकारचा ताण नसला तरी, शेवटी कुणीही स्वतःला आपल्या नेहमीच्या वर्तुळातच सुरक्षित मानतो, त्याला मी पण अपवाद नाही, एकीकडे मुलांची काळजी आणि लोकांच्या दृष्टीने महत्वाची नसली तरी आपआपली वैयक्तिक (खास)गी कामं असतातच ना?

आता कोणता गनिमीकावा करावा आणि एकवीस दिवसाच्या "कोरोना कैदेतून" कशी सुटका करून घ्यावी? असा प्रश्न डोक्यात फिरतोय, परंतु काही मार्ग निघेलसा दिसत नाही. सारखं ते वानर कुटुंब नजरे समोर येतयं, आणि मान्य कराव लागतय कि "माणूस माकडांचा वंशज आहे" आणि स्वत:च्या चुकीचे आपलंच नुकसान करून घेतोय.

Marathi Lekh, March 25, 2020, 07:10:09 PM
https://marathikavita.co.in/marathi-lekh/t32387/new/#new



©शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

सोपी वाट जगण्याची

सोपी वाट जगण्याची

दूरवर क्षितिजाला स्पर्श करणारा तांबूस गोल अगदी सावकाश, अलगदपणे मार्ग आक्रमीत होता आणि समांतर उडणारे समुद्र पक्षी एका अदृष्य गंतव्याकडे झेपावत असताना... शरीराला हळूवार स्पर्शातून जाणवणारा किनाऱ्यावरचा मंद वारा, एका वेगळ्याच विश्वात तन मनाला समाधिस्थ करीत होता आणि विसर पाडीत होता आजूबाजूच्या सर्व व्यवहारीक जिवंतपणाचा. समुद्राच्या मंद, खळखळाट करणाऱ्या शितल लाटा शिवाशिवीचा खेळ खेळत किनाऱ्याची भेट घेऊन परत जातांना मन सुद्धा नकळत त्यांच्या सोबत हेलकावे खायला लागतं, तेव्हा लाटांची अशी आवर्तनं का कुणास ठावूक मनाला जवळची, आपलीशी वाटू लागतात.

एरवी उर्जेचा, जगण्याचा आणि उत्साहाचा असीम स्त्रोत घेऊन उजाडणारा असाच अल्हाददायक, केशरगर्भ दिवाकर तप्त दुपारशी कधी आणि कशी जवळीक साधतो आणि नंतर सावकाश, अलवारपणे संध्याकाळशी हितगूज करू लागतो ते उमजतच नाही, हे सारं कळतं केवळ हातातील किंवा भिंतीवरील घड्याळाच्या पुढे पुढे सरकणाऱ्या काट्यांमुळे, ए.सी. ने थंड झालेल्या काचेच्या बंद गगनचुंबी इमारतीच्या वातावरणातील आतल्या जगाला बाहेरचं जग सहसा मोकळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे उघड्या डोळ्यांनी सहजपणे पहायला अनुभवायला आणि डोळ्यात साठवायला वेळ नसतो, नेमकं असं आयुष्य हल्ली संपुर्ण जगात बहुतेक लोक जगताहेत असं वाटतं.

आधुनिक प्रगत साधनांमुळे खरंच आपण विकसित की मेकॅनिकल झालोय? की रोज होणाऱ्या शोध आणि संशोधनांना युज टू झालोय? नाही लक्षात येत ना? बरोबर आहे कारण आधुनिक साधनांचा एवढा प्रचंड पगडा आपल्या रोजच्या जीवनावर पडला आहे की त्यामुळे आपली विचारशक्ती सुद्धा सीमित होऊ लागली आहे. जरा विचार करा अगदी सकाळी उठण्यासाठी सुद्धा आपण अलार्म सारख्या यंत्रावर किंवा एखाद्या मशीनवर अवलंबून रहातो... काही सन्माननिय अपवाद असतीलही, त्यानंतर संपूर्ण दिवसाभराची तशीच अवस्था होऊन जाते. नैमित्तिक प्रवास, कार्यालय सर्व ठिकाणी संगणका पासून नोटा, चिल्लर मोजणे ते चहा कॉफी, पोळ्या बनविण्या पर्यंतची अनेक यंत्रे काळाची गरज म्हणून आली? आणि आपण ती सर्रासपणे वापरतोय. अर्थात मला त्या यंत्राच्या निर्मिती मागच्या मेहनतीची, कल्पनाशक्तीची किंमत आणि त्याबद्दल कौतुक आणि आदर नक्कीच आहे. 

कधी विचारतो का आपण आपल्या मनाला प्रश्न "की आपण आपलं जगणं सोप केलय की परावलंबी?" मला ते सहज परावलंबी झालेलं जाणवतं, कारण हल्ली साध्या साध्या गोष्टींसाठी आपण मशीन, यंत्रावर निर्भर राहू लागलो, साधं गणित करायचं म्हटलं तर आम्हाला कँलक्युलेटर हवा, त्यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागली. बारकाईने निरीक्षण केल्यास अशा अगणित छोट्या छोट्या गोष्टी समोर येतील आणि लक्षात येईल की अरे, ही कामं आपण या अगोदर स्वत:च तर करीत होतो... सोप्पी तर आहेत.

विषय जरा भरकटला वाटतं? तर मंडळी तसंं नाही, विषय तोच आहे म्हणजे आपण निसर्गाने बहाल केलेल्या उपजत गोष्टींपासून दूर होऊ लागलोय. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे एकदा का आम्ही इमारतीत शिरलो की आम्हाला दिवसभर सुर्यदर्शन होत नाही, मग सकाळचा रम्य  सुर्योदय कसा कळणार? मोकळी शुद्ध हवा नाही, समुद्राच्या खारट वाऱ्याची चव नाही, वृक्षवेलींचा स्पर्श नाही, स्पर्श होतो तो केवळ घरातल्या कोपऱ्यातील आणि तसबिरींवर असलेल्या प्लास्टिकच्या फुलांचा. तसंच कुणाशी मोकळा संवाद नाही, प्राण्यांशी खेळणं, दंगामस्ती करणं नाही. मान्य हे सारं खेड्यात आहे, पण हल्ली आधुनिकीकरणाच्या नावाने खेडी सुद्धा कात टाकू लागलीत. 

आधुनिकीकरण, शहरीकरण वाईट नाही, त्याच्या आहारी जाऊन त्या सोई सुविधांचा अतीवापर वाईट आहे. गरजेनुसार त्या त्या सुविधा वापरून अलिप्त राहता यायला हवं. बऱ्याचदा ते जमत नाही म्हणून सुट्टी घेऊन पर्यटन केले जाते, ते सुद्धा स्पर्धेतून किंवा चढाओढीतुन होताना दिसते, काहीही असो त्या निमित्ताने माणूस निसर्गाच्या जवळ जातोय हेही नसे थोडके. 

पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या या शरीराला आणि निसर्गाला एकरूप होउ द्या, ईतकी वर्षे तोच आपलं अनेक स्वरूपात भरण पोषण करतोय, त्याला नाकारून कसे चालेल? आपण त्याला नाकारून किंवा त्यावर कुरघोडी करू लागलो तर तो त्याचे रौद्र रूप दाखवतो जे मानवी क्षमते पलीकडे आहे याचं भान ठेवायला हवं. आजच एका कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की "लहानपणी गावी एक देऊळ बांधताना शेजारी वेगवेगळ्या प्रकारची पाच सहा झाडं लावली होती. खुप वर्षानी तिथे पाहिलं तर लक्षात आलं की ती झाडं मोठी झालीत, त्यांना फुलं फळ येतात, त्यावर अनेक पक्षी येतात, गुरं ढोरं, वाटसरू त्यांच्या सावलीला थांबतात, हा झाला त्यांच्यातला बदल, पण देऊळ तसचं आहे. माझ्या मते निसर्गच खरा देव आहे?" कीती स्पष्ट विचार आहेत नाही? तर मंडळी निसर्ग आपला आहे आणि आपण त्याचे, तर म्हणूयात...

"जोपासना करूया निसर्गाची, 
होईल सोपी वाट जगण्याची".

©शिवाजी सांगळे, मो.+९१ ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t31408/new/#new

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

शोध आणि बोध

शोध आणि बोध

आपण सगळे तिर्थाटन करतो, यात्रा करतो त्या दरम्यान मंदिरात जातो, का बरं जातो आपण? कारण परंपरेने काही धार्मिक गोष्टी आपल्याला वारश्यात प्राप्त झालेल्या आहेत, कधी त्याचे पालन करायचे म्हणून तर कधी श्रद्धा म्हणून, पण त्या त्या ठिकाणी खरोखरच परमेश्वर आपल्याला दिसतो, भेटतो का? यावर माझ्यामते उत्तर नाही असेच आहे... कारण परमेश्वर हा तुमच्या आमच्या ह्रदयात वसलेला आहे, अशाच काहीशा भावना गीतकार वंदना विटणकर यांनी आपल्या गीतातून व्यक्त केल्या आहेत... “शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा, आपुल्या अंतरी”

परमेश्वर हा आपल्या प्रेमळ स्नेहमयी आचरणातुन, व्यवहारातुन, परोपकारातून तुम्हाला आणि इतरांना दिसतो, जाणवतो... पंचमहाभुतांच्या प्रेरणेतून आपण जीवंत असल्या कारणाने मी स्वतः परमेश्वराला पुढील प्रमाणे  शोधायचा प्रयत्न करतो... योग्य अयोग्य काय हे नाही समजत तरीही...या भावना चुकीच्या नाहीत असं म्हणावे लागेल.

दया क्षमा भाव । मना चित्ती धरी । वसे जो अंतरी । रत्नगर्भे  ।।१।।
जगता असावा । निर्मळ स्वभाव । पारदर्शी भाव । जळा परी ।।२।।
प्रयत्ने रहावे । उध्दाराया तमा । येवो जन्म कामा । कवि जैसा ।।३।।
अदृष्य रूपात । तारतो सर्वांस । अहर्निश श्वास । देतो प्राण ।।४।। 
ह्रदयी जपावी । वात्सल्य करूणा । जसा नेत्री पान्हा । गो मातेच्या ।।५।।
वृक्षाचीये ठायी । जैसा सेवा धर्म । आचरावे कर्म । सर्वां प्रती ।।६।।

कुणी मानो अथवा न मानो परंतु निराकार, निर्गुण अशा सर्वव्यापक परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध अशा पाच कर्मेंद्रियां द्वारे जाणवत असतं आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं सहावं ईंद्रीय जे मन आहे असे आपण मानतो ते या सर्वांना कबूल करून मान्यता देते किंबहुना पुढील श्लोकात म्हटल्या प्रमाणे ...

"ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।"  (श्रीमद् भगवद्गीता १५:०७)

परमेश्वराचे अस्तित्व या सर्व ईंद्रीयांना स्वतः पर्यायाने प्रकृतीकडे आकर्षित करून घेत असते. मग अस्तिक नास्तिकतेचा प्रश्नच उद्भवत नाही कारण अणु रेणूने बनलेल्या शरीरात जोवर श्वास अर्थात जीव आहे, तोवर या सर्व गोष्टी तुमच्या आमच्या पासून वेगळ्या होऊच शकत नाहीत या न त्या प्रकारे प्रकृतिशी, निसर्गाशी मर्त्य जीवाला जुळवून घ्यावेच लागणार, भले कुणी मान्य करा अथवा न करो. इथे प्रश्न भावणाऱ्या, आकलन होणाऱ्या जाणीवांचा आहे, आणि नेहमी आपण म्हणतोच की त्याच्या इच्छे विरुद्ध झाडाचे पान सुद्धा हलत नाही, सर्व कर्ताकरविता तोच आहे.

आजवर अनेक संत महंतानी परमेश्वराला अनेक रुपात शोधायचा प्रयत्न केला, कुणाला तो मळ्यात, मातीत जाणवला, कुणाला साक्षात्कार झाला संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज आपल्या अभंगातून त्या परमेश्वराला निसर्गात केवळ शोधतच नाहीत तर त्याला आपला नातलग, सगा सोयरा मानतानां म्हणतात... 'वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें'... थोडक्यात काय तर प्रत्येक संतांनी आप आपले व्यवसाय करताना त्या परमेश्वराची सेवा करीत आहे असे समजून त्याचा शोध घेत राहिले आणि त्यातून आध्यात्मिक साहित्याचा अनमोल असा अपार ठेवा आपल्याला मिळाला. आधुनिक काळातील कवींनी पण अनेक पद्धतीने त्याला शोधायचा प्रयत्न केला आहे त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे गीतकार सूर्यकांत खांडेकरांना पडलेला प्रश्न, ते विचारतात...

"त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?"

कीती साधा परंतु अंतर्मुख व्हायला लावणारा प्रश्न आहे नाही? आणि अशाच लहान लहान प्रश्नांमधून त्याच्या अस्तित्वाचे गूढ हळूहळू उलगडत जाते, जसे फुलांची एक एक पाकळी उलगडत जावी आणि शेवटी केसरमंडल दिसावे, फुल तर तसे नश्वर आहे, परंतु सुगंध रुपाने ते कायम आपल्या स्मरणात राहते. इथे परमेश्वर तसा दृश्य नाही, तो निर्गुण निराकार आहे आणि म्हणूनच त्याचा अंतीम शोध लागत नाही त्यामुळेच कदाचित त्याला शोधता शोधता कविवर्य मंगेश पाडगावकर लोकांना विचारतात...

“कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी, हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी” असा विचार करीत असतांना त्यांची ईश्वरा बद्दलची आसक्ती कमी होत नाही, त्याची आळवणी करताना ते पुढे म्हणतात ...

“तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे” अशा प्रकारे प्रत्येकजण त्या निर्गुण निराकार परमेश्वराला शोधत असतो, कुणी आपल्या कृतीतून, कर्मातून प्रत्येकाची आपआपल्या धर्मानुसार, परंपरेनुसार पद्धत वेगळी मात्र ध्येय एकच.

प्रत्येकाच्या धार्मिक भावना व्यक्तिगत, वेगवेगळ्या असणार हे नक्की तरीही तीचे अंतिम स्थान, ध्येय एकच असणार जे शांतीकडे, मोक्षाकडे घेऊन जाते. आज आत्म उन्नती सोबत स्माजोन्न्तीचा विचार होणे काळाची जरज आहे, आणि हीच गोष्ट जवळपास सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या लक्षात आली असावी आणि त्या साठी “आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदान हे” असे म्हणत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी त्या परमेश्वराकडे असे सर्वश्रेष्ठ दान मागून महान कार्य केले, ज्याला कशाचीच उपमा देता येणे शक्य नाही. यातून समाजाने योग्य बोध घेणे गरजेचे आहे एकोप्याने राहून परस्परांच्या, समाजाच्या, विश्वाच्या कल्याणासाठी, हितासाठी झटायला हवे आहे. शेवटी सर्व धर्माचे तेच तर ब्रीद आहे, तरीसुद्धा हल्ली समाजात, जाती जातीमध्ये विसंवाद, असहकार दिसतो, असंतोष दिसतो जो तसा कुणाच्याही हिताचा नाही याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा, तसा सर्वांना बोध होवो हीच त्या परमेश्वराकडे नम्र प्रार्थना.

©शिवाजी सांगळे 🦋 
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

http://marathikavita.co.in/marathi-lekh/t31394/new/#new

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

फँड लागलं

१३ सप्टेंबर २०१८, श्री गणेश चतुर्थी, एव्हाना सगळ्यांचा उत्साह नुसता ओसंडून वहात असेल. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन सुरूही झाले असेल, आनंद आहे या साऱ्याचा, मित्रांनो, भक्तांनो एक विनंती आहे, देव सर्वत्र एकच आहे हि संकल्पना रूढ आहे आणि आपण ती मानतो. जर घरी दारी देव एकच आहे तर मग आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे रूप पाहून आपण त्यांच्यात का स्पर्धा लावतो?

अमका राजा, तमका महाराजा म्हणून त्या त्या ठिकाणचे स्तोम माजवतो व अनेक ठिकाणी बायको मुलांसह मंडपात जावून दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहतो, वेळप्रसंगी धक्काबुक्की सहन करतो, मंडपातील उद्दाम व अरेरावी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विनाकारण बोल व तिरस्कारयुक्त वागणे सहन करतो?

विचार करा गणपती घरचा असो वा सार्वजनिक तो एकच आहे, श्रद्धेने दर्शन घ्या, मनात भाव असेल तर तेच समाधान व शांती तशीच मिळेल.

|| गणपती बाप्पा, मोरया ||

फँड लागलं

फँड लागलं लोकांना नवं याड लागलं 
घरचा सोडून बाहेरच्याच याड लागलं ||धृ||

तो पण बाप्पा, हा पण बाप्पा
ठेवूनी श्रद्धा पुजा घरच्याला
शांती समाधान देईल तुम्हाला
राजा मानायचं, कुणी डोकं हो लावलं? -२

फँड लागलं लोकांना नवं याड लागलं
घरचा सोडून बाहेरच्याच याड लागलं || १ ||

उगाच नका तुम्ही लागू रांगेला
मना पासून भजा घरच्या देवाला
पावतो का नाही मग बघा तुम्हाला
श्रद्धेनेच तुम्ही बाप्पाला घरी नं आणलं-२

फँड लागलं लोकांना नवं याड लागलं
घरचा सोडून बाहेरच्याच याड लागलं || २ ||

माना देव तुम्ही सगळेच हो एक
परी असू द्या मनी श्रद्धा ती नेक
कशाला बाप्पाची स्पर्धा हकनाक
मी तर आपल्या घरच्यालाच मानलं-२

फँड लागलं लोकांना नवं याड लागलं
घरचा सोडून बाहेरच्याच याड लागलं || ३ ||

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t31222/new/#new

शनिवार, २६ मे, २०१८

जॉन

जॉन

डोक्यावर अस्ताव्यस्त वाढलेले केस, बाकी शरीर पुर्णपणे उघडं आणि लाज झाकण्यासाठी सुतळीच्या तुकड्यांनी कमरेला आवळलेली रंगहीन कळकट, मळकट पँन्ट, दोन्ही हातांच्या बोटांनी कसली तरी आकडेमोड करतोय अशा हालचालींसह अस्पष्ट, अतर्क्य बडबड करीत, मात्र रस्त्याच्या कडेने आपल्याच तंद्रीत झपाट्याने चालणारा, कधीकधी कचराकुंडी जवळ घुटमळत, काही बाही चीज उचलणारा 'जॉन' बरेच दिवस दिसला नाही...

तो कुठला? त्याचं खरं नाव काय? कुणालाच माहीत नव्हतं, तब्येतीने तसा तो उंचापुरा, भक्कम म्हणून कुणीतरी जॉन हाक दिली, तो पण मागे वळला... तेच त्याचं बारसं, लोक काहीतरी शिळंपाकं देण्यासाठी, तर कधी मुलं चिडवण्यासाठी, उगाच त्याला याच नावानं हाका मारायची. तो सुद्धा वळून पहायचा, कधी थांबायचा, पुढे केलेली वस्तू जवळ येऊन निमुटपणे घेऊन पहायचा, आवडली तर खायचा, नाही तर... शाहणी माणसं करणार नाहीत असं करायचा, 'ती वस्तू जवळच्या कचराकुंडीत अलगद सोडायचा'.

कधीकधी मनात विचार येतो, याचं पण कुणी तरी सख्खं असेल ना? कुठे असतील ते? त्यांना याची व याला त्यांची आठवण येत असेल का? असले ना ना प्रश्न मनात येतात आणि मन स्वतःलाच विचारू लागतं "तु सर्वांचा आहेस म्हणवतोस, पण ते मानतात का तसं? किंवा ते तसं म्हणत असतील तर, तु मानतोस का तसं?" काहीच उत्तर मिळत नाही याचं, पण कदाचित जॉनला याचं उत्तर सापडलयं! म्हणूनच का तो निर्धास्त हिंडत फिरत असतो, कुठेही आडोशाला झोपतो, जे मिळेल ते खातो? काय असावं बरं कारण?
जाणीवेच्या पल्याड गेलाय का तो?

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t30866/new/#new

शनिवार, १९ मे, २०१८

संध्यासुर्य...एक अस्त

संध्यासुर्य...एक अस्त

सहसा मी सकाळी घरी असताना भेट होत नाही त्याची, तो जरी नित्यनेमाने वेळेवर येत असला तरी आम्ही उठायला हवं ना? आणि चुकून उठलोच, तर ईमारतींच्या भिंती पार करूनही आमची दृष्टादृष्ट होणं तसं कठीणच. तशी कधीतरी संध्याकाळी होते खऱ्या अर्थाने नजरभेट. नजर भेटच अशा साठी कि एरवी दिवसभर जरी तो डोक्यावर रेंगाळत असला तरी त्याच्याकडे नजर उचलून पहायची कुणाची हिम्मतच होत नाही.

बऱ्याच दिवसांनी काल त्याला डोंगराच्या कड्यावरून मनसोक्त बागडताना पाहिलं, काय वर्णन करू त्याचं? निशब्द होऊन पहात होतो त्याला, कधी कड्याच्या उतारावरून घरंगळत दुडूदुडू पळत होता, कधी कपारी आड लपून प्रकाशाची तेजस्वी तिरीप देऊन दर्शन देत होता तेव्हा माझी नजर त्याच्या वरून जराही हटत नव्हती इतका जवळचा आपला वाटत होता तो. सात आठ मिनटांची आमची ती नजर भेट, मोठी ओढ लावणारी, नवी उमेद, विश्वास देणारी.

आज त्याला खुप दिवसांनी पाहताना जुने दिवस आठवले, संध्याकाळी कधीतरी समुद्र तटावरुन त्याला न्याहाळत बसणं म्हणजे समाधी सुख लाभायचं, मला आवडतं किनाऱ्यावरुन सुर्यास्त पाहण... कित्येकदा आठ दहा दिवस मुक्काम असायचा किनारा असलेल्या ठिकाणी, मग रोजची संध्याकाळ त्या सोहळ्यासाठी, त्या तेजोनिधी साठी असायची. एक सहकारी तर नेहमी म्हणायचा "काय रोज रोज सुर्यास्त पाहायचा? तोच सुर्य, तोच समुद्र आणि तेच पाणी त्यात नवीन ते काय?" मी गप्प रहायचो, शांतपणे सिगारेटचे झुरके घेत डोळे उघडे ठेवून त्या तांबूस केशरी सुवर्ण गोलाकडे पहात समाधिस्त व्हायचो, आणि सहकारी चरफडत नुसताच धुर काढत असायचा.

रोज उदय, रोज अस्त त्याचा ! निदान आपल्या नजरेला दिसणारा, हरलेल्या जीवाला नवसंजिवनी देणारा तो भानू, तपन, दिवाकर, रश्मीराज, संध्यामित्र फार मोठी शक्ती, उर्जा देऊन जात असतो? पाण्यावर प्रतिबिंब रुपाने चमकणारे त्याचे अनंत सुवर्ण अवशेष आपल्या जीवनाचे बदलणारे अशाश्वत असलेले खरे रूप दाखवत असतो, नकळत अंतर्मुख व्हायला शिकवतो, दिवसभराची सारी मानसिक मरगळ आणि थकवा दूर करण्यास मदत करतो. हळूहळू केशरी छटा सोडत जेव्हा तो लालसर होऊन नजरेआड जावू लागतो, सावळ सांज गडद होऊ सारा आसमंत आपल्या कवेत घेऊ लागते, जस जसा वाऱ्याचा आणि पाया खालच्या वाळूचा मऊ, तलम स्पर्श हलकेच शितल वाटू लागतो तेव्हा मन अधीरता, उदासीनता का का वाढत असते? हे कोडं अजुन पर्यंत तरी सुटलेलं नाही. एरवी आपण चंद्राला मनाचा कारक मानतो, परंतु अस्ताला जाणारा हा संध्यासुर्य पण मनावर परिणाम करण्यास काही कमी नाही याची खात्री पटते.

याच्या संगतीत संध्याकाळी कुणाला "सांज ढले गगन तले, हम कितने एकाकी" असल्याची जाणीव होते, तर प्रेमीकांना तो रोमँटिक वाटतो, कुणा कवी, चित्रकारास मोहवणारा, भुलवणारा भासतो, तर अर्ध्य देणाऱ्या साधूला वेगळाच, दिवसाचं दान पुर्ण करून देणारा वाटतो, पण माझ्या मते आपण ज्या मनस्थितीत त्याला पाहतो, तेव्हा तेव्हा तो तसाच वाटतो, तरीसुद्धा उद्याच्या नवपहाटेची जाणीव तो करून देणारा हा मार्तंड अस्त होता होता मनात प्रेरणणेची, आशेची नवी ज्योत प्रज्वलित करून देतो त्या सृष्टी चालक भास्कराला माझे शब्दरूपी अर्ध्य.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t30832/new/#new

शुक्रवार, ४ मे, २०१८

शिवकालीन घोडेबाव


 




कधीकाळी आपला महाराष्ट्र, इतिहास जपणारा, परंपरा पाळणारा होता असं म्हणावसं वाटतं आता, कारण बऱ्याच वर्षांनी परवा दिनांक १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या मध्यवर्ती भागात जुन्या शासकीय  विश्राम गृह व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात असलेला शिवकालीन ठेवा म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठा व्यास असलेली तसेच बारा महिने गोड्या पाण्याचा भरपूर पाणीसाठा व खास करून पाण्या पर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या असलेली #शिवकालीन_ऐतिहासिक_घोडेबाव_विहीर
पाहण्यासाठी गेलो, वाटलं होतं कि तीची अवस्था ठिकठाक असेल, परंतू विहीरीची दुरावस्था पाहिल्यावर पुरता भ्रमनिरास झाला. विहिरीत आता खूप मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेला आहे तसेच चौफेर झाडी वाढल्याने  विहिर भकास दिसते.

शेजारच्याच गोवा राज्यातील काही ऐतिहासिक स्थळं पाहिल्यावर मनात त्यांची नकळत तुलना होउ लागते, मात्र आपल्या कडील या व ईतर बहुतेक ऐतिहासिक स्थळांचा विचार करता खूप वाईट वाटतं. ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीकडे प्रशासना कडून होत असलेले दुर्लक्ष आणि उत्साही पर्यटकांकडून होणारे विद्रुपीकरण सुद्धा नाकारता येणार नाही.

प्रशासनाच्या संबंधित विभागाने व पर्यटकांनी गंभीरपणे विचार करून आपला ऐतिहासिक वारसा जपायला हवा व येणाऱ्या पिढीसाठी आपल्या थोर व आदर्श इतिहासाच्या खुणा जपाव्यात येवढीच माफक अपेक्षा.

© शिवाजी सांगळे
संपर्क:९५४५९७६५८९

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

रांजणखळगे (Potholes) निघोज

रांजणखळगे (Potholes) निघोज  

१९९० च्या दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने जागतिक पातळीवर नोंद घेऊन मानाचा दर्जा देऊन गौरवलेले ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील निघोज गावापासून केवळ दोन कि.मी. वर कुकडी नदीवरील जगप्रसिध्द व आशिया तील सर्वात मोठे पॉट होल्स अर्थात  रांजणखळगे पाहण्याचा योग शनिवार दि.१४ एप्रिल रोजी एका कार्यक्रमामुळे आला.

वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळ्या रूपातील सौदर्य पहावयास मिळणाऱ्या या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने नदि पात्रातील दगड या खडकांवर सतत घर्षण करीत फिरल्यामुळे अतिशय सुंदर असे रांजणाच्या आकारातले कोरीव खळगे निर्माण झालेले पहावयास मिळतात तसेच कितीही दुष्काळ पडला तरी येथील पाण्याची पातळी कमी होत नाही व हि परंपरा गेल्या कित्येक शतकापासून तशीच आहे असे स्थानिक सांगतात.

स्थानिक भाषेत या रांजणखळग्यांना "कुंडमाऊली" असे म्हणतात. निघोज गावामध्ये माता मळगंगा देवीचे सुंदर असे मंदिर आहे, तसेच या दोन्ही तीरांना जोडणारा एक झुलता पुल देखील असुन त्यावर चालतांना एका वेगवेगळ्याच अनुभवाचे आपण साक्षीदार होतो.

© शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

मला वाटते... चलती रहे जिंदगी...

मला वाटते... चलती रहे जिंदगी...

लांबच्या प्रवासात ट्रेनमधे दरवाज्या जवळच्या बर्थवर झोपणं म्हणजे पाळण्यात झोपल्याचं सुख, एकाच वेळी झोक्या सोबत लयबद्ध तालातली ट्रेनच्या आवाजातली अंगाई ऐकू येत होती, छान झोप लागलेली असताना आधेमधेच कुणीतरी खट्याळाने झोक्याला मुद्दाम धक्का दिल्या सारखे आचके सुद्धा बसत होते.

कुठेशी गाडी थांबली होती, झोप चाळवली अंगावरल्या जाड उबदार ब्लँकेट मधून हात बाहेर काढून घड्याळात किती वाजले हे पहायला सुद्धा मन होत नव्हतं, इतकं छान उबदार वाटत होतं, तरीही झोप लागत नव्हती...

किती वेगळे विचार येतात नाही मनात? एकांतात असताना? मला तर असा मस्त प्रवास आवडतो, आणि म्हणावसं वाटतं "हम भी चले, तुम भी चलो, चलती रहे जिंदगी...

=शिवाजी सांगळे, ग्वालियर (म.प्र.)

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

मला_वाटते... जबाबदाऱ्या

जबाबदाऱ्या

खांद्यावर हात ठेवणारं घरात कोणी वडिलधारं  नसेल तर आपण फार मोठं, पोक्त झालोत असं उगाच जाणवतं. मग जेव्हा वास्तविक जीवना पेक्षा व्यवहारीक जीवनातल्या लहान मोठ्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर येउ लागतात तेव्हा ते हळूहळू पटूही लागतं, आणि पुढे पुढे प्रयत्न करून त्या जबाबदाऱ्या निभावल्या पण जातात, परंतु खरी कसोटी तेंव्हा लागते जेव्हा एखादा महत्त्वाचा वा मोठा निर्णय घ्यावा लागतो.

काही जणांना वाटेल त्यात काय नविन आहे? सगळ्यांनाच तर यातून जावं लागतं., बरोबर आहे ते, अशावेळी परीस्थिती तुम्हाला आपोआप बळ व बुद्धी देते, आणि त्यातूनही तुमची वेळ चांगली असेल तर अवघड जबाबदारी सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडली जाते, निभावली जाते आणि त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढतो, जरी काही चुकीचं घडलंच तर कैक प्रकारचं नुकसानही वाट्याला येतं, तरीही त्यातुनही एक नवा धडा शिकायला मिळतो, नवा अनुभव मिळतो मोल देवून घेतलेला.

काहिंच्या बाबतीत या जबादाऱ्या फार लवकरच त्यांच्या खांद्यावर पडतात आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे त्या निभावल्या सुद्धा जातात तसेच काही वेळा फार मोठा अनुभव पण देऊन जातात. असे लोक नंतर पुढील आयुष्यात सहसा धीटपणे व आत्मविश्वासाने जीवन जगतात व आपल्या क्षेत्रात नावलौकीक प्राप्त करून यशस्वी होतात.

#मला वाटते...शिवाजी सांगळे©
३२/१४-११--२०१७ 🦋

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

मला वाटते...जाहिराती आणि जबाबदारी

जाहिराती आणि जबाबदारी

पुर्वी म्हणत चार वेद, सहा शास्त्रे, चौदा विद्या, अठरा पुराणे आणि चौसष्ट कला प्रत्येकाला माहित असायला पाहिजेत. बाकी वेद, विद्या, पुराणे यात काही बदल झाला नाही पण नंतरच्या काळात चौसष्ट कलांमधे पासष्टाव्या एका कलेचा भर पडली, ती म्हणजे जाहिरात.

हल्ली टीव्ही वर कोणत्याही चँनलवर सफर करा, तुम्हाला बातम्या, कार्यक्रम कमी व जाहिरातीच जास्त दिसतील. दाखवा बापडे, त्यामुळेच तर चँनल वाल्यांची दुकाने सुरू आहेत. परंतु कधी कधी या जाहिराती पाहताना त्या जाहिराती तयार करणाऱ्या कंपन्यांच्या कल्पकतेची किव येते.

एका साबणाच्या जाहिरातीत "तुझा रंग एवढा उजळ कसा" हा बिनडोक प्रश्न तो नवरा आपल्या बायकोला विचारतो (अरे, ए सी मधे रंग उजळच रहातो, तुझा साबणाने जर शेतात राबणाऱ्यांना कष्टकऱ्यांना उजळ करून दाखवलं तर आयुष्यभर तुझाच साबण वापरेल मी) पुढे अरे वा, मस्तच" काय अर्थ समजतो या वाक्यातून?

अशीच आणखी एक जाहिरात, तज्ञ डॉक्टर सांगतात "लहान मुलांजवळ कोणत्याही प्रकारची मच्छर मँट, रिपेलन्ट लावु नये, त्यातील केमिकल मुळे मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो", तरीसुद्धा त्या उत्पादनांची जाहिरात होते, बरं त्यात जी इतर लहान मुलं आहेत त्यांच्या तोंडचे संवाद सुद्धा उद्धटपणाचे आहेत, काय संदेश जातो यातून?

हि केवळ काही उदाहरणे आहेत, अशा भरपूर अर्थहिन जाहिराती अशा भरपूर अर्थहिन जाहिराती दाखवल्या जातात..

हे झालं जाहिरात कंपनीच्या कल्पते बद्ल, पुढील काही उदाहरणं जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकारां संबधी एका फेस क्रिमच्या जाहिरातीत शाहरूख खान दुसऱ्या एका क्रिमचा खोका, पँकिंग समोरच्या कलाकारा कडून घेऊन इतस्ततः फेकून देतो, अन्य एका तेलाच्या जाहिराती साक्षी तन्वर मुलीच्या केसात अडकलेली काडी काढून पाठीमागे फेकते, तसेच एका सँनेटरी नँपकीनच्या जाहिरातीत असाच प्रकार. जाहिरातीच्या दिग्दर्शकाला स्वच्छतेचं भान नाही का? यातुन त्यांची बेफिकीर वृत्ती मात्र दिसते.

सतत मारा होणाऱ्या या जाहिरातीतुन समाजाला सकारात्मक संदेश मिळावा अशी अपेक्षा आहे, परंतु तसं होत नाही, उलट यांचा बालिशपणा समोर येतो, यातील मान्यवर कलाकार सुद्धा केवळ स्वतःला मिळणाऱ्या पैशाचाच विचार करताना हे विसरून जातात कि अनेक लोक त्यांच अनुकरण करतात, त्यांनी अशा वेळी स्वतःच्या प्रसिद्धीचे भान ठेवून योग्य बदल सुचवून काम करायला हवं, पण दुर्दैवाने तसं होत नाही, एवढं मात्र खरं.

#मला वाटते...शिवाजी सांगळे© ११-०७-२०१७

गुरुवार, ६ जुलै, २०१७

आवर्तन

आवर्तन

किनार्‍यावर चालता चालता वाळूतील शिंपले उचलण्याची तुझी सवय अजुनही चांगलीच आठवते मला, आजही तशीच सवय आहे तुझी, फक्त किनारा असलेला समुद्र नाही आता, पण माझ्या मनाच्या गुढ डोहातील भाव बरोबर ओळखतेस, आणि पुन्हा आनंदाचे भरते आल्यासारखी बिलगतेस, जसा कधी सुंदर शिंपला मिळाल्यावर खुश व्हायचीस. किनार्‍यावरची बारीक रेती का चमकते हे तेव्हा कळलं मला, जेव्हा तु एक अख्ख खवलं (ज्याला तु अभ्रक आणि मी अर्भक म्हणायचो) माझ्या शर्टवर कुस्करलं होतस, मला तर भर दुपारी अंगावर चांदणं शिंपडल्याचा भास झाला होता तेंव्हा.

आठवणी मागे का उरतात?
अन् आयुष्याला का पुरतात?
कालौघात बरच काहि बदलतं म्हणतात, पण काही आठवणी कशा विसरता येतील? पडलेली सर्वच स्वप्ने नाही लक्षात रहात, पण काही कायमची घर करून राहतात मनात, जी विसरता म्हणता विसरता येत नाहीत... आठवतं, मंद धुंद दरवळणारा मोगरा अन् तानपुर्‍याचा स्वर, गारठवणार्‍या त्या गोड थंडीत उबदार रजईत झालेली तुझी संगमरवरी गुळगुळीत मुर्ती? त्या नीरव मंद अंधारात सुद्धा धगधले होते शृंगाराचे अग्नीकुंड, परस्परांना चेतवुन, अतृप्त देहाच्या किती समिधा अर्पण केल्या होत्या कुणास ठावुक? अन् भडकूनही शांत न होणार्‍या अशा अनेक ज्वाळा उसळल्या होत्या, ज्या पुर्णपणे शांत होतच नव्हत्या ते आठवतं, पण किती काळ ती आवर्तने सुरू होती ते नाही आठवत, फक्त आठवतो, तो पहाटे पहाटेे आलेला तृप्ततेचा थकवा, पुन्हा पुन्हा उसळू पाहणारा. सकाळी सकाळी त्या पहाट थंडीत जाणवत होता तो अंग प्रत्यांंगाला मोगर्‍याचा सुगंध, सुखावलेली तु तशी शांत होती, मी किलकिल्या डोळ्यांनी तुझ्या गालावरला तृप्तीचा रक्तिमा पहात होतो, हळूच तु माझा हात हातात घेतला व अलगद जवळ ओढलस, तेव्हा मला पुन्हा पुन्हा संगमरवर गुलाबी भासला हे विसरणं कस शक्य आहे?

जुना किनारा निरखतांना तो हरवलाय आता असं वाटतं, काळवंडले आहेत तेथील शिंपले आणि रेतीची चमक सुद्धा, मी सहन करतो हे परिवर्तन, हा बदल पण जेव्हा जेव्हा तुला पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात तोच स्वच्छ किनारा दिसतो आणि पापणीच्या उंबरठ्या पर्यंत तुडुंब भरलेले तुझे डोळे कधी ओसंडून वाहतील याचा भरवसा नाही रहात. एरवी तसा मी धीरोदत्त, पण तुला अशा अवस्थेत पाहिल्यावर माझा धीर सुटू लागतो, हे तुला समजतं, मग तु स्वतःला सावरत मलाही सावरतेस, माझ्या खांद्यावर हात ठेवुन डोळ्यातील उसळलेली लाट अलगद परतावून देतेस, कसं जमत तुला आणि कुठून येतो गं तुझ्यात एवढा सोशिकपणा?

=शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t28975/new/#new

सोमवार, २६ जून, २०१७

आठवतं !

आठवतं !

ढगांच्या गडगडाटांसह पागोळ्यातून पडणार्‍या पाऊस धारांचा कमी जास्त होत जाणारा लयबद्ध आवाज कानावर येत होता, मधेच वाट चूकलेल्या विजांची पळापळ खिडकीच्या काचेतून स्पष्टपणे अधोरेखीत होत होती. मध्यरात्र तशी उलटून गेलेली, पण आज डोळा लागत नव्हता. एक तर पावसाच्या धारांचा, गडगडाटाचा आवाज का कुणास ठावुक मनाला स्थिर होवु देत नव्हता.

अशा अवस्थेत विनाकारण मन फार मागे मागे जावु लागतं, नको इतक्या कुणाच्या तरी जवळ जावु पाहतं. सदमा चित्रपटातील एका दृष्यातील छतावरून, कौलांवरून ओघळणार्‍या पाण्याशी खेळणारी अल्लड, स्वतःत आकंठ हरवलेली श्रीदेवी आठवते? आणि आठवतो तीच्यावर जीवापाड जीव लावणारा कमल हसन? आठवतं! आपल्यात पण असा कुणीतरी एक असतो, जिव्हाळा जपणारा, काळजी घेत हळूवार प्रेम करणारा, आपण सुध्दा एकटेपणात शोधु लागतो त्याला, पण नाही सापडत तो, तो तर पार हरवलेला असतो डोंगराच्या कपारीवरून दूर पर्यंत दिसणार्‍या धुक्याच्या चादरी पल्याड, जाणवुन देत असतो स्वतःचं पुसटसं अस्तित्व. आजुबाजुला झाडं पण चिंब होवुन दव कुरवाळत उभी असतात, गवत फुलं दवाच्या ओझ्यानं मात्र वाकुन गेलेली, हळूहळू धुकं विरळ होवु लागतं, आपण चौकस पणे त्याचा शोध घेत असतो, मात्र तो कुठे गायब होतो ते समजत नाही.

त्याच नशेत वास्तव उजाडतं, वातावरणात अंधार तसाच भरून असतो, आता छतावर उरलेले पाऊस थेंब स्वतःला निथळत असतात, त्यांच्या पडण्याच्या कमी होत जाणार्‍या आवाजा सोबत एकाद पहाट पक्षाचा आवाज येतो आणि रस्त्यावर आँटो वगैरे वाहनांची चलती सुरू झालेली असते. रात्रभर शिणलेल्या मनाचा प्रवास हळू हळू संपवत, आळस देवुन स्वतःला ताजं करायचा प्रयत्न सुरू होतो, आजुबाजुला, शेजारी कुणीच नसतं, तेव्हा पाऊस पार थांबलेला असतो.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919545976589 Email:sangle.su@gmail.com
http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-28903/new/#new

गुरुवार, २२ जून, २०१७

नजर अन् हास्य भेट

नजर अन् हास्य भेट

डोळ्यात जेंव्हा सांज उतरते, मन उगाच हळवं होउ लागतं, कातर वेळ तीलाच म्हणतात ना?
आधीच पाणीदार असलेले डोळे वेगळेच भासु लागतात, अनेक गतस्मृतीना मौनात आठवू लागतात, शुन्यात शोधु लागतात, खरं तर सार्‍या दुःखाच्या, विरहाच्या, आत लपलेल्या नाजुक, मुक्या भावनांच्या.

अलगद उलगडू लागतो मग एक एक कप्पा अतंरातला, शोधू लागतो स्वतःची जागा. कुठे काय चुकलं याची गणितं करू लागतो, बराच उहापोह करूनही हाती काहिच लागत नाही, मग कधी उगाच वाळूवर रेघोट्या ओढीत बसतं मन. उभ्या आडव्या रेघा मारून काही काळ वाळू सरकते अन् हळूच नकळत पुन्हा जागेवर येते. आलेली लाट परत माघारी जाते तशी.

असचं असतं का आयुष्य आपलं? प्रश्न मनाला पडतो, पुन्हा तेच चक्र सुरू होत. पायाखाली केव्हा पाण्याचा थंड स्पर्श होतो ते सुध्दा कळत नाही. मग आवरतं घेतो स्वतःला, उठून आजू बाजूला पाहतो, तर काय येथे प्रत्येक जण असाच स्वतःला शोधायला आलेला.

चंद्रभागेच्या वाळवंटात आणि यात काहीच फरक उरत नाही. तीथे परस्परांचे चरण स्पर्श, गळा भेट होते, पांडुरंगाच्या शोधात, तर इथे हलकी नजर अन् हास्य भेट आपल्यातले आपण सापडलो म्हणून.

=शिवाजी सांगळे  २१.०६.२०१७

गुरुवार, ८ जून, २०१७

घड्याळाकडे पहायचं असतं!

घड्याळाकडे पहायचं असतं!

ढग दाटून आल्यावर आणि पाऊस पडून गेल्यावर, वेळेचं भानच उरत नाही. एरवी सावली सोबत पळणार्‍या आम्हाला पाया खालच्या व लांबत जाणार्‍या सावल्यां वरून वेळेचा अंदाज बरोबर घेता येतो.

अशा अंधार वेळी, मग नजर वारंवार घड्याळाकडे जाते, तेंव्हा हळूच कुुणीतरी म्हणतं "काय गडबड, सारखं घड्याळ पाहताय?" काय बोलणार अशांना? वेळेशी तुमचं सुत जमणं फार महत्वाचं असं मला वाटतं. दर वर्षाचा पहिला पाऊस सगळ्यांना हवा हवासा वाटतो, तसाच बेभरवश्याचा अंधार देखिल, नंतर काय तर सवय होउन जाते दोघांचीही.

आपण मस्त पणे चालत असतो, इतक्यात सुर्यावर चादर टाकल्या सारखे ढग पसरतात, अंधार दाटु लागतो, अन् अवचित टपटप सुरू होते, सोबत छत्री तर नसतेच, कौतुक भरल्या डोळ्यांनी पडणारा एक एक थेंब डोळ्यात साठवू लागतो, कुणाला तरी आठवु लागतो, विसरतो कि आपण भिजतोय, त्यात सुद्धा एक सुुख असतं, मागील काहि महिन्यांच्या दाहक उन्हातुन सुटतोय याचं.

एक भुक असते प्रियकर, प्रेयसीला भेटण्याची, मुक्त नाही पण एकाच छत्रीत खेटून भिजण्याची, दोस्तां सोबत गरमागरम कांदा भजी खाण्याची, टपरीवर वाफाळता चहा पिण्याची, खरचं हि वेळ असते पहिल्या पावसाची, पहिल्या अंधारलेल्या वाटांची, म्हणुन तीचं भान ठेवायचं असतं, घड्याळाकडे पहायचं असतं.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919422779941/+919545976589 Email:sangle.su@gmail.com
http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-28778/new/#new