शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

बेस्ट आऊट आँफ वेस्ट
































            "बेस्ट आऊट आँफ वेस्ट" किंवा "कचऱ्यातून कला", तसं तर नावातच सर्व काही आलं, आणि हे साध्य करण्यासाठी हवाय घरात कामी न येणारा थोडासा अनावश्यक पसारा सोबत बऱ्यापैकी वेळ, कल्पकता आणि महत्त्वाची ती इच्छाशक्ती. 

            तर झालं असं की सालाबादप्रमाणे यंदाच्या दिवाळीसाठी आकाश कंदील तयार करायचा बेत आखला आणि तयारीला लागलो, काही बांबूचे तुकडे होते, ते व्यवस्थित कापून, साळून घेतले खरे, पण या सर्व कामासाठी लागणारी काही छोटीमोठी हत्यारे काही एका ठिकाणी सापडत नव्हती मग पुन्हा त्यासाठी काही तरी करणं आलं. अर्थात प्राधान्यक्रम कंदिलाला होता तो तर तयार केलाच सोबत घरात अतिरिक्त असलेल्या जाडसर ग्लॉसी पेपर व जुन्या लग्न पत्रिका वापरून डिझायनर, टोटल बांबू व प्लास्टिक फ्री आकर्षक पारंपरिक कंदील देखील तयार केला म्हणजे करायला गेलो एक अन् झाले दोन, पण मजा आली, एक वेगळंच समाधान मिळालं, अर्थात स्वनिर्मितीचा आनंद काही औरच असतो नाही का?

            तर आता दुसरा मुद्दा, वर म्हटल्याप्रमाणे काही जुन्या लग्न पत्रिका निवडून एकत्र केल्या, डोक्यात स्टेशनरी बॉक्सचा आराखडा तयारच होता, प्रथम  बेस तयार केला, मोजमाप घेऊन अपेक्षित खण, त्यांचे आकार, कटींग झाल्यावर आतल्या बाजूस जुन्या लिफाप्याचा खाकी पेपर वापरला, नंतर भिंती आणि आतले खण गोंद व आवश्यक तेथे फेव्हीकॉल वापरून तयार केले व शेवटी आकर्षक अशा लाल व सोनेरी लग्न पत्रिकांच पद्धतशीर कटींग करून डकवण्याचं काम केल आणि घरच्या वापरासाठी सुबक असा स्टेशनरी बॉक्स तयार झाला.

            अगरबत्तीच्या गोल खोक्यांचा फ्लॉवर पॉट आणि पिस्त्याच्या टरफलांची फुलं कधीकाळी तयार केली होती, आताही पुठ्याचे काही मोठे गोल खोके हाती लागले आणि सजवायला पत्रिका होत्याच, मग त्यांना सुद्धा थोडासा साज चढवला, पैकी एक तर माझ्या एका स्नेह्यांना खुप आवडला, म्हटलं 'माझी छोटीशी आठवण भेट असु द्या तुमच्या साठी', म्हणून दिला, ते खूष आणि मी समाधानी. 

            माझं ठरलयं, असेच काही वेगळं 'बेस्ट आऊट आँफ वेस्ट' करीत वेळेचा सदुपयोग करायचा व नव निर्मितीचा आनंद घ्यायचा, तर लवकरच भेटू आणखी काही नव्या कलाकृतीसह...

~शिवाजी सांगळे 🦋 २१|११|२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा