मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

विल्हेवाट













नमस्कार मंडळी,

          आज थोडसं नवीन विषया बद्दल, हल्लीच मला सोशल मिडिया द्वारे समजलेला हा विषय तसा बऱ्याच जणांना माहीतही असेल? तरीही, फोटोतील या बाटल्या साध्यासुध्या नाहीत, खरं तर या साधारण प्लास्टिकच्याच, पण जरा खास आहेत. नाही समजलं? मंडळी, खरेदी केलेल्या बिस्कीट, चिप्स, कुरकुरे, चॉकलेट, वेफर्स इत्यादी खाद्यपदार्थां सोबत अनाहूत पणे घरात शिरलेले वेगवेगळ्या प्रकारचे शे-सव्वाशे रँपर्स पोटात घेऊन तट्ट झालेल्या या बाटल्या आहेत. आज जागभरात अशाप्रकारच्या बाटलीस पर्यावरणपूरक विट (Eco Brick) असे संबोधले जाते. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करून रस्ते, प्लेवर ब्लॉक, पत्रे इत्यादी वस्तू बनविल्या जातात.

             एरवी आपण असे अनेक रँपर्स, पिशव्या सहजपणे कचऱ्यात टाकतो, त्याचं पुढे काय होतं ते कालांतराने आपल्याला पावसाळ्यात समजतं, नाले, गटारं तुंबतात, हळूहळू नद्या, समुद्रात जावून जल प्रदूषण, जाळल्यावर वायू प्रदूषण वाढते आणि एकंदरीत निसर्गाचा तोल बिघडून ऱ्हास होतो जो भविष्याच्या दृष्टीने मानवासाठी, आपल्या साठी फारच घातक आहे. 

             अशा प्लास्टिकची वैयक्तिक स्तरावर विल्हेवाट लावणं आपल्याला सोपं आहे, फावल्या वेळात वा सवडीनुसार स्वच्छ व कोरडे असलेले प्लास्टिकचे रँपर्स, पिशव्यांचे छोटे तुकडे करून सहजपणे एका बाटलीत ठासून भरायचे व ती बाटली कालांतराने भंगारात किंवा असा सुका कचरा गोळा करणाऱ्यांकडे सुपुर्द करून द्यायची झालं...

             अप्रत्यक्षपणे का होईना, पर्यावरणाप्रती मी एक छोटसं पाऊल टाकलं आहे, आपण कधी सुरवात करणार? बघा जमतय का?

~शिवाजी सांगळे, बदलापूर ०९|११|२०२०




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा