रविवार, ८ जून, २०२५

"उतराई" ओळख काव्यसंग्रहाची…

ओळख काव्यसंग्रहाची…उतराई
आस्वादक......लेखिका- वंदना ताम्हाणे, मुंबई

वारी म्हणजे महाराष्ट्राचा श्वास. संताचा सहवास. संत साहित्याने गर्भश्रीमंत केलं महाराष्ट्राला. अभंग, श्लोक, आरत्या, भजन यांच्या परिमळाने ही भूमी पावन झाली.
या परीस स्पर्शाने अफाट, अद्वितीय ग्रंथ संपदा निर्माण झाली. अध्यात्माचा हा वारसा आपल्याला लाभला हे भाग्यच आपलं. मानवता कणाकणात, चराचरात पाहण्याची दृष्टी मिळाली. सामान्य माणूस असो वा कलावंत, लेखक, कवी या सर्वांनाच भुरळ घातली संत साहित्याने. 

विशेष म्हणजे आजच्या काळातही हे धन टिकण्याचं एकमेव कारण आपल्याला लाभलेली गौरवशाली संत परंपरा. हे शब्दांचं वैभव, ऐश्वर्य पिढ्यानपिढ्या पोहोचत आहे अखंड..याचा अभिमान वाटतो. या भावनेतूनच साकारला गेला ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, गझलकार श्री. शिवाजी सांगळे यांचा ‘उतराई’ हा काव्यसंग्रह. त्यांच्याच हस्ते सजलेल्या साध्या सुंदर मुखपृष्ठासह. हे ऋण चुकते करता येणार नाही असं प्रांजळ मत कवी आपल्या मनोगतात व्यक्त करतात. मनातील नम्र भाव, देवाठायी असलेली श्रद्धा, भक्ती यातूनच वाणीवर विराजमान झाले शब्द व निर्माण झाल्या ऐंशी कविता. 

सन्माननीय लेखक, अभ्यासक विश्लेषक, कवी श्री. अनुपम श्रीधर बेहेरे यांची विश्लेषणात्मक प्रस्तावना काव्यसंग्रहाचा गाभा उलगडते. 

गणेश स्तवनाने काव्यसंग्रहाचा शुभारंभ होऊन कवितांचं दालन खुले होते. आदिमाया आदिशक्तीची अर्चना करुन या प्रकृतीरुपाला वंदन करताना ‘तूच जननी साऱ्यांची’ असा 'आदिमाया आदिशक्ती' कवितेत तिचा गौरवपूर्ण उल्लेख कवी प्रकृतीची शक्तीची उपासना करतो. तर ‘तुज दारी’ कवितेत ‘श्वास चाले कानी पडता किर्तन अभंग’ म्हणताना देहभान विसरून दंग होण्याच्या अवस्थेचं वर्णन म्हणजे भक्तीत समाधीस्थ होणंच.. आपल्या श्वासाला हे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. अभंग किर्तनाच्या संस्कारानेच आपण पोसलो. मनाचे पोषण झाले. याची प्रचितीच जणू. 

कुळाचार, कुळधर्म याचं महत्त्व स्पष्ट करताना कुळदैवत खंडेरायाला ‘देव मल्हारी’ कवितेत... 

यळकोट करु घोष चढताना पायरी, 
सगळेच उधळू वाटेने भंडारा सोनेरी 

अशी आराधना करतात तेव्हा जेजुरी गड सोन्याचा भासल्याशिवाय राहत नाही. 

युगानुयुगे अमरप्रीत असलेल्या राधाकृष्णाला समर्पित बामसूरी, साद बासरी, मन सावळे, धून मुरलीची, रंग श्रीरंग, चक्रपाणी या कविता मन मोहकच. बामसुरी असा मोहक शब्दप्रयोग करत बामसुरी कवितेत,
 
असो पावा, मुरली, वेणू अनेक नावे
मंत्रमुग्ध सुरात बोले बामसूरी कान्हा
 
सूर आळवत ही धून मुरलीची रसिकांच्या कानी पोहोचते.
 
वेडावते राधा अन् रानात 
शहारे कालिंदी जळावरी 

या ओळी राधेची उत्कट प्रीत दर्शवतात. 
भक्तीरसात न्हाऊन निघणाऱ्या या कविता देवत्वाच्या जवळ नेऊन हृदयात तृप्ततेचं समाधान देतात. नामाचं महत्त्व सांगणाऱ्या कविता समर्थांचा महिमा, स्वामी नाम व नाम या आताच्या कलियुगात नामाला किती महत्त्व आहे व साध्या, सोप्या भक्तीचं रुप प्रकट करतात. तर एकादश स्तोत्र कवितेत ‘स्तोत्र एकादश, गात मनोमनी विठ्ठल चरणी आपले भाव समर्पित’ करतात. 

महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीविठ्ठलाला हृदयी पाहत वारी, दिंडी, वारकरी, देवाचं दर्शन, ताटातूट झाल्याने भूक वैष्णवांची अवस्थेचं कळकळीने, तडफडीने व्यक्त करणारे शब्द मनाचा ठाव घेतात व 'रे सावळ्या' ला मागणं मागतात,
 
भेदभाव अंतरी जो नांदतो 
धर्म जात कलह सारा जळू दे 

आशयगर्भ, अर्थपूर्ण, जीवनाचं सखोल तत्त्वज्ञान नकळत पोहोचवताना आरत्या, अभंग, भजन, स्तोत्र,प्रार्थना या स्वरुपात समोर येऊन पंचतत्वाची पंचारतीच करतात या कविता जणू! 

नित्य कर्म, ध्यान, गुूढ अर्थ कवितेत मन:शांतीसाठी, धारणेसाठी, मोक्षाकडे वाटचाल करताना व अंती मोक्ष मिळण्यासाठीच सारी धडपड हे सार शब्दा शब्दात प्रकट होते. 
'जीवन वारी' कवितेत... 
 
माझा विठ्ठल माझी वारी.. चाले या संसारी
कर्मकांड विठ्ठल माझे… श्वासांची उसनवारी
 
माझं स्वत:चं असं काय आहे? श्वासही माझा नाही. तो ही उसनाच. माझे कर्म विठ्ठललाच अर्पण..तोच कर्ता करविता असे सुंदर लीन भाव येथे जाणवतात. 
तर 'रेघोट्यांचा देह' या अप्रतिम कवितेत जाणिवा अधिक सखोल होत जातात व या नश्वर देहाचं सत्य स्वरुप या काव्य पंक्ती अधोरेखित करतात,
 
निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठती
अज्ञात गूढ पाताळी कधी उंच नभात जाती
कुठवर आता सांभाळावा देह हा रेघोट्यांनी 
धूसर आकाश पक्षी अवघे जाळे विणून देती

मनाची चंचलता, मनाच्या डोहाची गूढता उकलता उकलत नाही धूसरतेचं आकाश व्यापक होत आपल्या मनाचा पक्षी जाळे विणतो व त्यातच आपलं गुरफटणं होतं...मनाची ही नेमकी अस्थिरता येथे प्रकट झाल्यानंतर... 

आपण का जगतो हा प्रश्न कवीला पडतो, या अज्ञात वाटेवर पावले जात असता काय हाती लागते, काय आहे आयुष्य याचा शोध घेत असता कवी अनोळखी होतो व म्हणतो,
 
अजूनही 'अनोळखी' का असा मी स्वत:ला
शोध संपेना जीवनी कसा ओळखू स्वत:ला 

प्रत्येकाचा हा शोध आत्मचिंतन करणारा. मनाचा वेध घेणारा. आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करणारा. 

हे स्पष्ट करताना 'प्राक्तन' कवितेत झाडावरुन धरणीच्या भेटी गेलेलं पान, एकाकी फांदी या सुंदर रुपकात कवीने सहज स्पष्ट केलंय. 

घेऊन अंगी शुष्क रेषा 
जाता पान धरा भेटीला
विरह वेदना त्या क्षणी 
छळे एकाकी फांदीला 

पण 'मनात दाटले' कवितेत व्यक्त होताना…
 
जन्म, वृद्धी, मोक्ष प्राक्तन वृक्ष दलाचे
कुजनी खगाच्या विरक्त भाव सुखाचे  

ही संन्यस्तता येथे जाणवते. जीवनाचे सत्य सांगताना मर्म सांगताना ‘वहिवाट’ या कवितेत.. 

काळाचीच रीत । व्यवहारी भ्रष्ट। 
अंती करी नष्ट। ध्यानी असो ।। 
कोण नित्य येथे। थांबावया आले। 
जाणे ठरलेले। माघारीचे।। 

जाणं हे अटळ अंतिम सत्य असलं तरी ही 'वहिवाट' सुरु असताना आपले कर्म निष्काम होऊन करावे. आपला कवीचा जन्म कामी यावा अशी भावना कवी व्यक्त करतो.
 
प्रयत्ने रहावे। उद्धाराया तमा।। 
येवो जन्म कामा । कवी जैसा।। 
अदृश्य रुपात। तारतो सर्वांस। 
अहर्निश श्वास । देतो प्राण ।। 

कवीच्याच शब्दात सांगायचं झाल्यास गोमातेच्या नेत्री जसा पान्हा तसं वात्सल्य व करुणा हृदयी जपावी. वृक्षाच्या ठायी जसा सेवा धर्म असतो तसेच आचरावे कर्म सर्वा प्रती असा दाखला कवी देतो. निसर्गाशी तादात्म्य पावून, चराचराप्रती समर्पण भाव अंतरात जागृत करत वसा घ्यावा समतेचा असं आवाहनच कवी 'वसा' या कवितेत करताना दिसतो.
 
संतानी जो दिला। समतेचा वसा ।। 
पाळे जो खासा । त्यासी कळे।। 

भक्तीचं अवडंबर पाहून मात्र कवी व्यथित होतो व भोंदूगिरी विरुद्ध खडे बोल सुनावतो. फटकारे मारतो. 'तथ्य' या कवितेत.. 

वठविती सोंग करीत भक्त गोळा 
घालुनी त्या माळा दंभी बुवा 
ऐशा भोंदू लोकां पाडोनी उघडे 
जाहीर वाभाडे काढावेत 

'दश द्वार दिशा' कविता मानव शरीराचं सत्य आरशाप्रमाणे सांगते.. 

दश द्वारांनी वेध घेई 
देह हा दश दिशांचा 
व्यतित करुनी आयुष्य
बोध न हो दिशांचा 

आयुष्य जातं पण मानवी देह दिशाहीन होत भटकत राहतो. बोधापासून कोसो दूर दूर तळमळत   अनेक व्याधींनी ग्रस्त होत जीवन व्यतीत करतो. 

पण यातून सहीसलामत सुटण्यासाठी, भवसागर सहज पार करुन जाण्यासाठी.. 

पाप पुण्य सारे, पुनर्जन्मा योग
सत्कर्माचा वेग वाढवावा
 
सत्कर्म हीच चावी या कुलूपबंद विकारी देहाची असे कवी आवर्जून सांगतो. 
या काव्यसंग्रहातील ‘वाटसरू’ ही कविता जीवाकडून शिवाकडे जाण्याचा प्रवास कथन करते. हा प्रवास सहजसाध्य व्हावा म्हणून ध्यानाचा मार्ग अवलंबयास सांगून  याच मार्गाने परमेश्वर प्राप्ती निश्चित होते व जन्म मृत्यू फेरा वाचतो... वाटसरूची वाट सरते ही खात्री या ओळी दर्शवतात. 
 
जीवाकडून शिवाकडे
भक्तीचा वारु, 
ध्यानाच्या प्रवासाचा 
तू वाटसरू 
जन्म मृत्यूच्या त्या 
फेऱ्या आडून 
शोध परमात्म्याचा 
आत्म्याकडून

पथदीप, सार्थ जीवन, मोह, माया, दंभ भाव या कविता मनुष्यातील विविध विकारी भावावर घाला करतात. 

या काव्यसंग्रहातील'भय दु:खांचे' ही कविता प्रतिभेचं लेणं म्हणावयास हरकत नाही… 

दु:खानो या, या परतुनी 
मजला नशा तुमची हवी
सोसले खूप ज्यांनी तुम्हा 
त्यांची जरा सुटका व्हावी
भोग तुमचे, माझे सारखे 
द्यायचे तुम्ही मी घ्यायचे 
सहन कराल कितीक काळ? 
जीवन माझे धुम्र वलयांचे 

शाश्वत अस्तित्व जरी असलं तरी तुम्हास मोक्ष नाही ही दु:खाची यथार्थता कवीच्या शब्दात येथे स्पष्ट होते.

‘जन्माची वारी’ या कवितेत ही जन्माची वारी व्यर्थ न जावो म्हणून सदैव सत्याची कास धरावी ही जणू प्रार्थनाच कवी आपल्या शब्दांनी करतो. स्वर व्यंजन, अक्षरकारक गणनायक व स्वामी समर्थांच्या आरतीने 'उतराई'ची काव्यसंग्रहाची सांगता होते पण मनात अध्यात्माच्या ज्योतीच्या जागृतीने. शब्दांचा हा नंदादीप तेवत राहतो व अंतरीचा गाभा उजळतो व चैतन्य तिथे कायमचे वास्तव्यास येते. निराकार असं सतभावनेचं रुप शब्दांतून साकार होते. भक्तगणांच्या मनात ठसा उमटवत, अबीर व बुक्क्याचा मंगल टिळा भाळी तेजाचं वलय उभं करत.

कवी आपल्या अनुभवसंपन्न समर्थ शब्दांनी आपले भाव सुबोध शैलीत रसिकजनांपुढे व्यक्त करता तर झालाच. पण भाषेचं समृद्धीकरण, ज्ञानाची परिपक्वता या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे हा काव्यसंग्रह दर्जेदार होऊन ऐहिक जग, ऐलतीर, पैलतीर, द्वैत अद्वैत भाव, लौकिक पारलौकिक अशा अनेक तत्वांना मूळाशी ठेवून अधिकाधिक परमात्म्याच्या जवळीकीची अनुभूती देणारा झाला. परमेश्वर आपल्या हातून अशा अनेकानेक कलाकृती घडवत राहो व रसिकमन तृप्त होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

भक्ती काव्यसंग्रह - उतराई 
कवी - श्री. शिवाजी सांगळे
प्रस्तावना - श्री. अनुपम श्रीधर बेहेरे
प्रकाशक - साईश इन्फोटेक ॲण्ड पब्लिकेशन्स, पुणे २६
मुखपृष्ठ - श्री. शिवाजी सांगळे
मूल्य - १५०/-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा