सोमवार, २६ मे, २०२५

पाऊस फील

पाऊस फील

कोसळला पाऊस येवढा तरी तो फील आला नाही
गढूळ पाण्यात नळाच्या, अजून गारवा मुरला नाही

वेडावतो माणूस जेव्हा, ऋतू त्याची नक्कल करतो
सावरुन जरी घेतो ऋतू, तरी माणूस बदलला नाही

वाहतील नदी नाले, येईलही पूर अताशा कुठे कुठे
तुंबणाऱ्या शहरांना सुद्धा अद्याप तो कळला नाही

कोडकौतुक खरे त्याचे, नित्य शेतात राबणाऱ्यांना
म्हणून मनाजोगा त्यांच्या पाऊस तो बरसला नाही 

बदलू लागलेत आडाखे, सारेच हल्ली असे येथले
कुठे,कधी,किती पडावे?अंदाज हा पावसाला नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=56923.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा