लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

नजर


किती चमत्कारिक आहोत ना आपण? स्वत:च स्वत:वर नजर ठेवू लागलोत. हल्ली पाहावं तिथं सीसीटीव्ही लावतो. रेल्वेस्टेशन, बाजार, चौक, ऑफिस, राहतो त्या इमारतीत, वगैरे सार्वजनिक ठिकाणी समजू शकतो, पण काही लोक स्वत:च्या घरातसुद्धा सीसीटीव्ही लावून घेतात. याला काय म्हणायचं? सुबत्ता की एकदुसर्‍याबद्दलचा अविश्‍वास?
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व गरज म्हणून खरं तर सीसीटीव्हीची संकल्पना पाश्‍चात्त्य देशात सुरू झाली व जगभर पसरली. तशी ही सोय चांगलीच आहे. एखाद्या अपराधिक घटनेनंतर याचा उपयोग करून अपराधी पकडले गेलेले आहेत व न्यायदानातपण याचा उपयोग होतच आहे. आज बर्‍याच क्षेत्रात त्याचा वापर सोयीनुसार वाढत गेला. परस्परांच्या विश्‍वासावर अवलंबून असणारे आता सीसीटीव्हीच्या फुटेजवर विश्‍वास ठेवू लागलेत.
हल्ली एकत्र कुटुंब पद्धती तशी बाद झाल्यातच जमा आहे. आटोपशीर कुटुंब संज्ञेतून ‘हम दो हमारा एक’ हाच मंत्र जपला जातोय्. लोकसंख्येचा विचार करता याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. कारण लोकसंख्या फुगतच चालली आहे. या काळात आईवडील दोघं कामानिमित्त बाहेर, घरी मुलं एकटी, त्याला सांभाळणारी आया वा नोकर, मग हे लोक आपल्या अपत्याशी कसे वागतात, यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाते आणि त्याचे आश्‍चर्यकारक निकाल काही बाबतीत दिसून आले.
माणसाच्या स्वभावाचे, वागणुकीचे विविध पैलू दिसून आले. त्यात खास करून अपराधिक बाबीच जास्त समोर आल्या. लहानग्याचे दूध पिण्यापासून ते त्याला अमानुष मारहाण करण्यापर्यंतचे विविध फुटेज समोर आलेले आहेत. याव्यतिरिक्त घरमालकाच्या गैरहजेरीत चोर्‍या करणं, चोरून खाणं इत्यादी घटनासुद्धा समोर आल्या आहेत.
पूर्वी बरं होतं. एकत्र कुटुंबात बरीच माणसं असायची. घरातील कर्त्या पुरुषावर घरी लक्ष ठेवण्यासाठी एवढा ताण येत नसे. कारण घरातील इतर सदस्य ते काम व्यवस्थित करीत असत. मुलं अभ्यास करतात की नाही? शेजारीपाजारी जातात का? कुणाशी बोलतात? बाहेरील परके लोक, फेरीवाले वगैरे आजूबाजूला फिरताहेत का? इत्यादी बाबींवर घरातल्यांचं, शेजारपाजार्‍यांचं लक्ष राहायचं. एखाद्याने काही चूक केली वा अन्य काही घटना घडलीच, तर त्या वेळेस हस्तक्षेप करून समोरच्याला दटावणी देत असत, वेळ प्रसंगी मुलांवर रागावतसुद्धा असत आणि त्या रागावण्याचा बाऊ पालक कधी करीत नसत. अशा वातावरणामुळे अपराधांच्या घटना कमी होत्या, बलात्कारासारख्या गोष्टी तर क्वचित ऐकू येत असत.
एकंदरित समाजव्यवस्था अशी होती की, सार्‍या परिसरात चालतेबोलते सीसीटीव्ही होते! याव्यतिरिक्त आपसातलं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग असायचं की, बातमी वार्‍यासारखी पसरायची, तेही व्हॉट्स ऍप वगैरे नसताना! महत्त्वाचं म्हणजे परस्परांबद्दल विश्‍वास व आपलेपणा होता आणि त्या आपलेपणामुळे येणारे राग, लोभ, द्वेष वगैरे संमिश्र भावनापण असायच्या. परंतु या उलट परिस्थिती आज दिसते. फ्लॅटकल्चरमुळे अपवादात्मक स्थितीत शेजारी वा बिल्डिंगमध्ये वर किंवा खाली काय घडतंय वा घडलंय, याचा कुणाला पत्ता नसतो. यामुळे अपराधी मानसिकता असणारे याचा सारा विचार करून अपराध करीत असतात. थोड्याशा पैशांसाठी वयस्कर व्यक्ती, एकटीदुकटी महिला पाहून चोर्‍या करण्यापासून ते खून करण्यासारखे गुन्हे करतात आणि असे अपराधी पुराव्याअभावी मोकळे राहतात आणि दिवसागणिक या प्रकारच्या घटना वाढतच आहेत. कुणाला दोषी ठरवायचं? बदललेल्या समाजव्यवस्थेला की योग्य संस्काराअभावी वाढत चाललेल्या विकृत, गुन्हेगारी प्रवृत्तीला?
– शिवाजी सांगळे 
९४२२७७९९४१

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

मकर संक्रांत सण स्नेहाचा'


http://tarunbharat.net/archives/13507
'मकर संक्रांत सण स्नेहाचा'

आपला भारत देश सण उत्सवांचा देश आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अनेक जाती परंपरा नुसार विविध सण साजरे करण्याची परंपरा इथे आहे. येथे प्रत्येक सणाशी संबंधित चांगल्या प्रथा परंपरा आहेत व  या प्रथा परंपरा खूप विशेष मानल्या जातात, बऱ्याच प्रथां परंपरा मागे धार्मिक तर काही परंपरा मागे वैज्ञानिक कारणे आहेत. हिंदू पंचांगातील तिथी प्रमाणे आपल्या कडे साजरे होणारे सर्व सण, व्रत वैकल्ये हे नक्कीच हवामान, आरोग्य व आयुर्वेदाचा सखोल विचार करून धर्मशास्त्रकारांनी त्या त्या काळात प्रयोगात आणले आहेत. अनेक सणां पैकि ‘मकर संक्राती’ हा देशात साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण म्हणायला हवा.

हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे. वर्षभरात सूर्याची मेष, वृषभ, मिथुन इत्यादी बारा राशीत संक्रमणे क्रमाक्रमाने होत असतात. यांतील सर्वात प्राचीन काळापासून ओळखली गेलेली संक्रमणे म्हणजे कर्क आणि मकर; असे का? त्याचे कारण ते दिवस वर्षातले वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहेत. कर्क संक्रमणाच्या दिवशी आपल्याकडे (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठा दिवस आणि लहान रात्र असते; तर मकर संक्रमणाच्या दिवशी सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असते. त्याबरोबरच, सूर्याचे उत्तरेकडे मार्गक्रमण मकर संक्रमणापासून सुरू होते. कारण त्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो. म्हणजेच सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करता होतो, यालाच उत्तरायणारंभ म्हणतात आणि त्या दिवसापासून दिवसाची लांबी वाढू लागते व उन्हाळ्याची सुरूवात होते  व सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसें दिवस उत्तरेकडे सरकते हे लक्ष पुर्वक पाहिल्यास आपल्याला समजु शकते.

संपुर्ण देशात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते, जसे पंजाब, हरियाना येथे लोहडी, लोहळी म्हणतात, उत्तर भारतात या सणाला ‘खिचडी संक्रांत’, उत्तर पुर्व प्रांतात बंगाल, आसामध्ये ‘भोगाली बिहू’ म्हणत तो दिवस त्यांच्या वर्षारंभाचा देखील असतो, दक्षिण भारतात ‘पोंगल’, गुजरात मध्ये ‘उत्तरायण किंवा पतागांचा’ सण म्हणतात. या काळात देशभर अनेक यात्रांची सुरवात होते, यात प्रमुख म्हणजे प्रत्येक बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होणारा कुंभमेळा होय. कोलकाता शहरा जवळ जेथे गंगा नदीचा बंगालच्या उपसागराशी संगम होतो तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते, तसेच दक्षिणेत शबरीमला, केरळ येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्या साठी सुध्दा असंख्य भाविकांची गर्दी होते. महाराष्ट्रात कोकणात मकर संक्रांतीलाच मार्लेश्वराची यात्रा भरते व  त्या दिवशी शंकर-पार्वतीचा शुभविवाह केला जातो.

महाराष्ट्रात संक्रांतीचा सण तीन दिवस १३ ते १५ जानेवारी पर्यंत अनुक्रमे गी, संक्रांती व किंक्रांती म्हणुन साजरा करतात. तिळाचे महत्त्व असण्याचे कारण म्हणजे मकर संक्रांत हिवाळ्याच्या मध्यावर साजरी होते व तीळ उष्ण प्रकृतीचे आहेत अन् तिळाच्या वापराने थंड आणि उष्ण यांचा समतोल राखण्यास मदत होउन आरोग्यास हितावह ठरतात.

१. तीळ पाण्यात घालून त्या स्नान करणे, २. तीळ भक्षण करणे, ३. तीळचे दान करणे.

वरील प्रमाणे तिळाचा उपयोग हे संक्रांतीचे खास वैशिष्टय मानावे लागेल, संक्रांतीला तिळाचे व गुळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळ गुळाची देवाणघेवाण करून स्नेह वाढवायचा.

महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, मूगाची डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी असा स्वयंपाक केला जातो. संक्रांतीला गुळाची, तसेच तिळाची पोळी करतात. मकर संक्रांतीपासून रथसमाप्तीपर्यंत एकमेकांना तिळगूळ देऊन 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्या साठी शुभेच्‍छा देतात. सुगडात (सुघटात) हळद-कुंकू, ऊसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, तीळ-गुळ घालून घरच्या देवांसह पाच ‘वायने’ अर्थात वाण द्यायची रूढी आहे. विवाहानंतर पहिली पाच वर्षे अनुक्रमे हळद-कुंकू, तीळ-गुळ, कंगवा, बांगड्या लुटण्याचीही म्हणजेच वाटण्याची पद्धत खूप ठिकाणी आहे. महिला हळदीकुंकू करून उपयोगी वस्तूचे वाण लुटतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा दोन्हीही घरी हौसेने सणही करतात. सुनेला हलव्याचे दागिने, काळी साडी घेतात व जावयांना हलव्यांचा हार, गुच्छ देतात. लहान मुलांचे बोरन्हाणही केले जाते.

आपल्या सर्वांना माझ्या कडून मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला'.

=शिवाजी सांगळे, बदलापूर,
९५४५९७६५८९ – ९४२२७७९९४१ 

गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

हाक अंतरीची

हाक अंतरीची

       अस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषा कुणी का ओढल्यात? माहित नाही? मी नाही मानत उगीच काही परंपरा. मनात नसता कुणाच्याही पाया पडणं किंवा चार लोक जातात म्हणून त्यांच्या मागे देवळात जाणं मला नाही पटत, भले मग कुणी मला नास्तिक म्हणो. माझ्या बाबतीत खुपदा असं होतं, का ते माहीत नाही. पुर्वी कामानिमित्त दौर्‍यावर जावं लागत असे, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी भटकंती व्हायची, काम संपल्यावर त्या त्या वेळी व ठिकाणानुसार सोबतीचे कधी मंदिर, पार्क किंवा अन्य प्रेक्षणिय व प्रसिध्द स्थळांना भेटी द्यायचा बेत करीत, मलाही आवडायचं, एरवी सर्व ठिकाणी मी जायचा पण मंदिर वा अन्य धार्मिक ठिकाणी मी खुपदा जात नसे, याचं कारण मला आजही सांगता येत नाही परंतु बाकि लोकांच्या मते तेव्हा मी नास्तिक ठरायचो.

       एकदा सोलापूर दौर्‍यावर असतांना सोबत्यांच्या हट्टाखातर श्री सिध्देश्वर मंदिरात पोहचलाे, सुरेख नक्षीकाम केलेलं दगडी हेमाड पंथी बांधकाम, चहुबाजुला बसविलेल्या किंवा कुणी भक्तांनी आणुन ठेवलेल्या वेगवेगळ्या आकारातील अनेक शिवलिंग प्रतिमा फारच विलोभनीय, मंद दरवळणारा कर्पुर, अगरबत्ती व धुपाचा सुगंध सोबत नित्य नविन येणार्‍या भक्तांकडून होणारा घंटानाद खुप छान वातावरण होते, तरीही मी काही तरी वेगळ शोधत होतो. एका विस्तृत अशा दगडी महिरपी असलेल्या सभामंडपात कुणा बाबांचे कानडी भाषेत प्रवचन सुरू होते, आम्हा सर्वांचे दर्शन सोपस्करही उरकले होते, काही काळ बसावं म्हणुन आम्ही तेथे कठड्यावरच बसलो. माझं ध्यान त्या बाबांच्या शब्दांवर, ते मी एकाग्रतेने ऐकत होतो, काय झालं ते समजलं नाही, त्या बाबांची भाषा कळत नव्हतीच परंतु त्यांच्या शब्दांत इतकं माधुर्य होतं कि मी तीथं गोठल्यागत झालो, अर्धातास उलटला, सोबती म्हणु लागले चल निघु, पण मी हललो नाही. काय होतं ते? त्यांते शब्द माधुर्य, वातावरणाचा प्रभाव? कि अंतरीची हाक? आजपावेतो न उमगलेलं कोडं, तसाच अनुभव श्री स्वामी विवेकानंद मेमोरीयल, कन्याकुमारी येथला आरपार भारून टाकणारा.

       परमात्म्याचा अंश कधी नादातून, कधी स्वरातून तर कधी गंधातून जाणवतो, तेंव्हा आत्मा बरोबर तिथे ओढला जातो, मग ठिकाण मंदिर, दर्गा वा चर्च कोणतेही असो, स्वर उमजणारा,समजणारा जरी नसला तरीही तो मनाला भावतो व पर्यायाने आत्म्याला तेथे आेढून नेतो, कदाचित जीवा शिवाची भेट अशीच होत असावी? परम शांततेचा स्वर ॐकार असो किंवा मंदिरातल्या घंटेचा नाद, पहाटे पहाटे कानावर पडणारे अजानचे अविट स्वर नाहीतर चर्चमधे घुमणारा धीर गंभीर चर्चबेलचा आवाज असो, नकळत मनाला शांत करीत असतात, ही स्पंदणं हृदयाशी एकरूप होतात, काही वेळ तरी स्वतःला विसरायला लावतात.

       चौदाएक वर्षांपुर्वी दक्षिण भारतात दौर्‍यावर गेलो होतो, निटसं लक्षात नाही बहुतेक रामेश्वरचा बस स्टँंड असावा, वेळ पहाटे सव्वा ते साडे चारची, डिसेंबरातली बोचरी थंडी, कोपर्‍याला शेकोटी करून ड्रायव्हर, कंडक्टर असे जोडी जोडीने शेकोटीच्या भोवती बसलेले, टेप रेकाँर्डवर कुठलसं दाक्षिंणात्य सुरावटीच भजन सुरू होतं, संगीताच्या त्या सुरांची काय जादू झाली कुणास ठावूक? मी आपसुक त्या शेकोटी कडे वळलो त्यांच्या पाठीमागे शांतपणे ऐकत उभा राहीलो, माहित नाही एक विलक्षण अनुभुती जाणवत होती, भजनातील एकही शब्द समजत वा कळत नव्हता, पण सुरांनी बांधुन ठेवलं होतं मला, कसा मग्न झालो त्यात समजलंच नाही, काही वेळने बरोबरचे लोक विचारू लागले काय झालं? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते, ज्या टोळक्यात उभा होतो ते सुध्दा चक्रावलेलेे, त्यातील एकाने विचारलंच "मल्याली?" मी नकारार्थी मान हलवित म्हटलं "महाराष्ट्र".

       बहुदा असाच असावा आतला नाद, परम्यात्म्याशी नकळत कधी तरी जुळणारा, स्वतःतल्या "स्व" ची ओळख करून देणारा, म्हणुनच असावं कि सुर, स्वर, व नादाला जात धर्म नसतो, प्रांत वा देश नसतो, असतो तो केवळ जीवाशिवाचा ॠणानुबंध न दिसणारा न उमजणारा कुठेतरी निराकार ईश्वराच्या नाळेशी जोडलेला.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26772/new/#new

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" (नाटिका)

नमस्कार मित्र हो,

माझ्या एका छोटूश्या मैत्रीणीच्या आग्रहाखातर लिहीलेली एक छोटीशी नाटिका "चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" सादर करीत आहे, सदर नाटिकेला माननिय बाल साहित्यिक व कथाकार श्री एकनाथजी आव्हाड यांचे पुढील प्रमाणे मनोगत लाभले आहे...

"पर्यावरणाचा संदेश देणारी तसेच मुलींचा सन्मान वाढवणारी आजच्या समाजमनाला सहज भिडणारी ही बालनाटिका मुलांना सादर करायला तर आवडेलच शिवाय त्यांना खूप काही शिकवून जाईल. अभिनंदन आपले."

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा"

1. (झाड क्र. 1 – 2 – 3) झाडांच्या रुपात तीन मुली दिड ते दोन फुट अंतर ठेऊन उभ्या आहेत.
2. (मुलगी क्र. 1) हातात पाण्याचं भांड व दाणे/धन्य ते आजूबाजूला टाकते व पाण्याचं भांड ठेवते.
3. (चिमणी क्र. 1) पंख हलवीत येते व झाडा शेजारी उभी राहते.
4. (मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे हातात घेऊन येते व (मुलगी क्र. 1) च्या शेजारी उभी राहते.
5. (चिमणी क्र. 2 व 3) पंख हलवीत विरुद्ध दिशेने  त्याच वेळी तेथे येतात.
               ----- xx X xx -----
झाड-१ : काय उकडतंय नाही?

झाड-२ : हो न. सुर्य नुसता आगच ओकतोय, कधी पाऊस पडतोय असं झालय?

झाड-३ : एवढयात कसला येतोय पाऊस? आधी उन्हाळा तर जाऊ दे!

झाड-२ : मग काल एवढे ढग कशाला आले होते?

झाड-१ : हो. तुझ्या डोक्यावर सावली धरायला आले होते.

चिमणी क्र. १   पंख हलवीत झाडां मागे जाते व मान बाहेर काढून अवतीभोवती पहात झाडांशी बोलू लागते.

चिमणी क्र १ : बाई गं, खूप दमले मी, जरावेळ सावलीत बसू का? करू का थोडा आराम तुमच्या खांद्यावर बसून?                       (सर्व झाडे एकमेकाकडे पाहून हसतात)
त्याच वेळी तीची नजर दाणे टाकलेल्या ठिकाणी जाते व ती ईतर चिमण्यांना सुध्दा बोलावते. तिघी दाणे टाकलेल्या जागी गोल फिरून दाणे शोधू लागतात.
(मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे जमिनीवर ठेवते, व मोबाईल टावर सारखी उभी राहते.

चिमणी क्र १ : थांबते, हे बघा इथेच आहेत दाणे, या खायला.

चिमणी क्र ३ : (विरोध करीत) खात्री केल्या शिवाय खाऊया नको, हल्ली खरं नाही या माणसांच!

चिमणी क्र १ : मला तर बाई खूप भूक लागली आहे.

चिमणी क्र २ : तुला सांगते, या मोबाईल टावरच्या लहरीमुळे खूप त्रास होतो, डोकं गरगरतं नुसत.

चिमणी क्र १ : तू काय सांगतेस? मी तर त्या मोबाईल टावरचं घरट बांधलं होतं, हा  आता आलं लक्षात त्या टावरच्या लहरीमुळे थकायला होतं मला.

चिमणी क्र २ : हो गं, नाहीतरी या माणसांनी कौलारू घरं तोडून सगळीकडे टावर बांधले. कौलारूघरामध्ये त्या माणसां सोबत आपल्याला पण जागा मिळत होती थोडी फार.

चिमणी क्र ३ : ते झालच, ही माणसं बिल्डिंगला काचा लावतात, सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने किती उकडतं? त्यात भर म्हणुन रस्त्यावरच्या गाड्या, त्या मुळे काय कमी गरम होतं? तरी बरं ही झाडं आहेत. ( सर्व झाडे एकमेकाकडे पाहून आनंदाने हसतात)

चिमणी क्र १ : अगं. पण ते दाणे कधी खायचे आपण? बसलो आपण गप्पा मारीत, आपल्याला पण त्या बायकांचीच सवय लागली.

चिमणी क्र ३ : दाणे खायचं ठीक आहे, सापळा तर नसेल ना तीथे? आधीच आपली चिवचिव संख्या कमी झाली आहे, त्यात हे टपोरी कावले नेहमी छेड काढत असतात.

चिमणी क्र २ : तसं नाही, त्यांनी म्हणजे माणसांनी आपली रहायची सुद्धा सोय केली आहे, ते बघ घरट. (घरट्या कडे इशारा करते)

चिमणी क्र ३ : चला मग दाणे खायला... तिघी दाणे खायला जातात.

झाड क्र. १: पाहिलंत, कित्ती विश्वास आहे त्यांना आपल्यावर? नाहीतर ही माणसं, पार तोडून तोडून आपली संख्या कमी करीत सुटले आहेत.

झाड क्र. ३: हो खरं आहे, काही समजतं कि नाही त्यांना?

झाड क्र. २: हो, हों अगदी खरं आहे, बघा आजूबाजूचा सारा परिसर कसा उघडा बोडका झालायं यांच्या मूळ, स्वतः साठी पण सावलीला जागा ठेवली नाही त्यांनी.
(मुलगी क्र. 1) स्वतः कडील मोबाईल फोन काढून बोलू लागते.... हलो हलो.... काही बाही बोलत राहते, त्याच वेळी मोबाईल टावर झालेली मुलगी डोलू लागते.

चिमणी क्र ३ :  पळा, झाला टावर सुरु ...

चिमणी क्र २ : चला झाडावर बसूया, तिथे आही धोका नाही आपल्याला.

चिमणी क्र १ : खरचं, ही झाडचं आपल्या कामाला आली, माणसांना कधी कळणार कि झाडे वाचवा, पशु पक्षी वाचवा? निसर्ग वाचवा? अजुनही वेळ गेलेली नाही सावध व्हा, निसर्ग वाचवा असच ऐकत मोठे  झालो ना आपण?
हिच माणसं, मुलगी झाली तर.. माझी चिऊ म्हणत उराशी कवटाळत असतात ना तीला? मी तर आता असं म्हणेन कि...

    “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा “
       आणि
    “मुलगी वाचवा, समाज वाचवा “

(सर्व जणी एका रेषेत उभ्या राहून प्रेक्षकांना अभिवादन करतात व पडदा पडतो)

 लेखक : शिवाजी सांगळे ©

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

रिटायर्ड झाल्यावर

रिटायर्ड झाल्यावर

       दिड एक वर्षभरापुर्वी रिटायर्ड झालेला मित्र परवा भेटला, तसाच पुर्वी सारखा हसतमुख, खट्याळ व बोलका, काही बदल नव्हता त्याच्या वागण्या बोलण्यात, बरं वाटल त्याला पाहुन. त्याही पेक्षा एक नवी दिशा सापडली त्याच्या बोलण्यतुन.

      चार पाच जण सहज गप्पा करीत असतांना कुणी तरी त्याला विचारले, "काय करतोस रे हल्ली? कुठे पार्ट टाईम जातोस कि नाही? यावर तो जे काहि म्हणाला त्यातुन सर्वांनी बोध घ्यावा असं होतं ते...

       अरे काहीच करीत नाही, मस्त पेपर वाचतो, बायको सोबत गप्पा मारतो, वेळ प्रसंगी कामात मदत सुद्दा करतो, मित्र मंडळी व नातेवाईकांना ईतके दिवस जो वेळ देउ शकलो नव्हतो तो देतोय, देवळात जातोय, मस्त मनाला आवडतात ती गाणी ऐकतो, पहायचे राहून गेलेले जुने चित्रपट पाहतो, छान एन्जाँय करतोय सारं. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं वाढवायची जी उणिव राहिली होती ती नातवंड वाढवताना घेतोय, तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? सगळे जण तेच तर करतात रिटायर्ड झाल्यावर; तरीही त्यात वेगळी गंमत आहे. अरे, आपली मुलं कशी मोठी झाली आठवतं का तुम्हाला कोणाला? यावर दोघांनी नकारार्थी माना हलवल्या, बाकीचे गप्प होते.

       तो पुढे सांगु लागला अरे, आम्ही दोघं नोकरी करणारे, रोज सकाळी घाई घाईत आवरून ट्रेन पकडायला बाहेर पडायचो, त्या दरम्यान मुलांच आवरण, त्याचे कपडे, खाणं वगैरे डब्यात भरून त्यांना बेबी सिटींग मधे सोडाची घाई असायची. दिवसभराचं सर्व उरकुन घरी आल्यावर साहजिकच पहिलं लक्ष मुलां कडेच द्यावं लागायच. पुढे मुलं मोठी झाली तरीही परीस्थितीत काही विशेष फरक पडला नव्हता, त्या काळात खरोखर मुलांचे हट्ट, लाड पुरवता आले नाही, बाकि लौकीक अर्थाने त्यांच्या गरजा पुरवित होतो ईतकच, कधी कधी त्यांच्या लहान सहान गोष्टीकडे, हट्टा कडे दुर्लक्ष करावं लागलं. नोकरी पेक्षा प्रवासाने जास्त थकुन जायचो, शरीरात त्राण उरत नव्हते, त्यामुळे चिडचीड व्हायची, जे हाल माझे तेच बायकोचेही व्हायचे.

       मुलांच बालपण खऱ्या अर्थाने अनुभवलं नाही आम्ही व मुलांनी सुद्धा. खरचं आता ती खंत जाणवते, घर, संसार चालवण्याच्या चक्रात त्यांच बालपण हिरावून घेतलं व स्वतःच तारूण्य शर्यतीला जुंपलं, नाहीतर काय? दिवसेंदिवस हा जीवन संघर्ष कठीणच होत चालला आहे. अरे, आपला काळ तर कसातरी सरला, पण आजची पिढी! लांब कशाला, माझ्या मुलाच व सुनेचच उदाहरण घ्या, आपल्या पेक्षा जास्त धावपळ, दमछाक होते अश्या नोकऱ्या, त्या करता करता येणरी वेगवेगळी टेंन्शस्, कंप्युटर असुन सुद्धा कामाचा म्हणावा तसा उरक नाही हल्लीच्या पिढीकडे. खैर, काळा नुसार हे होतचं रहाणार व त्या प्रमाणे जगावे लागणार, आणि ते जगता जगता मुलांची गरज म्हणा कि आपली? सोबत रहायचं सुख तर मिळत, दोघांनाही.

       मुलांसाठी जे जे करायचं राहिलं होतं ते आज नातवंडाच करून ती कसर भरून काढतो आम्ही दोघं, नातवंडाशी खेळतो, त्यांना गोष्टी सांगतो, अभ्यास घेतो फार समाधान मिळतं त्यातुन. तरीही घर म्हटलं कि भांड्याला भांड लागायचंच, पण तेही तेवढया पुरतचं राहतं, शेवटी कुणासाठी केली होती इतक्या वर्षांची धडपड? केलेल्या धावपळीत सुख म्हणजे काय हे समजल नव्हतं ते आता समजतय, नातवंड वाढवताना, आपलचं रूप आपण घडवतोय असं वाटतं, कुणी तरी म्हटलंच आहे कि दुधा पेक्षा दुधावरची साय जास्त आपलीशी वाटते. दोस्तो, हेच खरं.
     
       मी तर माझ्या मुलांना सांगीतलयं खुप धावपळ करू नका, केवळ पैसा कमावणं हाच शेवट नाही, आपल्या मुलांना, कुटुंबाला, माणसांना वेळ द्या, त्याच्याशी बोला, संवाद साधा, मान्य कि आजची महागाई, शिक्षणाचा, औषध पाण्याचा खर्च पाहता पैसा कमी पडतो, त्याची आवश्यकता आहे, तरीही अनावश्यक स्पर्धा व त्यातुन येणारे खर्च टाळा. योग्य नियोजन करूनही चांगल व सुरक्षित जीवन जगणं आपल्याच हाती आहे. आम्हाला नाही जमलं ते नीट पणे, पण आता तुम्ही ते जमवु शकता, किंबहुना तसा प्रयत्न करू शकता तेवढा आधार आहे तुम्हांला आमचा.

       इतकं सारं तो भरभरून व कौतुकाने सांगत होता व आम्ही मुग्ध होउन ऐकत होतो, अर्धा-पाउन तास केव्हा उलटला हे सुद्धा कळल नाही. कुणी तरी म्हटलं "अरे चला कामं नाहीत का?", तेंव्हा त्याचा निरोप घेउन एक एकजण मार्गस्थ झाला, मी सुध्दा निघालो, पण मनात त्याचे शब्द पिंगा घालीत होते. खरचं आपण सुद्दा या पेक्षा वेगळ काय केलं? हा प्रश्न काही केल्या मनातुन तेवढा जात नव्हता.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26182/new/#new 17-11-2016

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

चौकट

चौकट

जन्म झाल्यावर प्रत्येक जीव धर्म, जात, पोटजात आणि कुळ यातच वाटला जातो, एक सामाजिक चौकट घेउन जगु लागतो. पुढे आई बापाच्या कुवती नुसार शाळेत माध्यम निवडलं जातं व पुढील दहा बारा वर्षा साठी पुन्हा चौकट तयार होते, त्यानंतर अनेक अभ्यासक्रमांच्या चौकटी पैकी आजुबाजुला सुरू असलेल्या शर्यतीत सामिल होण्यासाठी एक निवडली जाते, डोनेशन, कँपिटेशन फी वगैरे भरून झेपत असो नसो, तरी या चौकटीत टिकुन रहायचा केविलवाणा प्रयत्न करतात.

स्वतःला मान्य असो वा नसो, तरी जगताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक वेगवेगळ्या चौकटी भेदाव्या लागतात, अगदि शिक्षण, नोकरी, घर एवढच काय तर लग्न सुद्धा चौकट पाहूनच कराव लागतं. कधी नवरा, कधी बाप अश्या भुमिका पार पाडीत जगावं लागतं. बरं पुरूषांच्या बाबतीत जबाबदार्‍या काही प्रमाणात कमी आहेत, परंतु स्त्रियांच्या संबंधात असं होत नाही, त्यांना लहानपणा पासुन अनेक बंधनांच्या चौकटीत राहून सोशीकपणे जगावं लागतं. मला स्त्री पुरूष असा भेदभाव नाही करायचा, ना स्त्री मुक्ती वगैरे बद्दल बोलायचं, तरीही जे सत्य आहे ते नाकारता येत नाही.

चौकटीत जीव स्थिरावतो, काहीसा थांबतो, तेच वर्तुळात तो फिरत राहतो. कदाचित तेच कारण असेल म्हणुन आपले फोटो आयताकृत असतात, अपवाद म्हणुन कधी वर्तुळातही असतात, पण प्रचलित असतात ते आयतातलेच. काय किमया असावी चौकटीची? चौकट घडवते, चौकट बिघडवते चांगल्याला वाईट तर क्वचित प्रसंगी वाईटाला चांगलं बनवते.

चौकटीत जे काही असतं ते वेगळ दिसतं, या संदर्भात १९८१ साली धारवी झोपडपट्टीतील कथेवर प्रदर्शित झालेला चित्रपट "चक्र", ज्याचं स्मिता पाटिल यांच उघड्यावर अंघोळ करतानाचं पोस्टर जे रेल्वे, बस स्टाँप लगतच्या भिंतीवर लावलेलं, खुप वेळा पाहिलं होतं, माहित नाही तेव्हा त्या पोस्टरची चर्चा का झाली होती ते? खरं तर रेल्वे लगतच्या झोपडपट्टीतलं ते वास्तव होतं, सामान्यपणे रोज सकाळी अश्या अंघोळ करणार्‍या स्त्रीया, मुली अनेकांना दिसल्या असतील, पण त्या पोस्टरची चर्चा खुप झाली ती केवळ त्या पोस्टरला असलेल्या चौकटी मुळे, एका चौकटीने लोकांचा दृष्टीकोणच बदलला होता तेव्हा हे खरं.

पुर्वी आपल्याकडे अशी फँशन होती कि घरात देवादिकांचे फोटो फ्रेम भिंतीवर लावले जात व पुजाअर्चा केली जात असे कारण तशी मानसिकता बिंबवली गेली होती, तरी शेवटी प्रश्न श्रध्देचा असल्यामुळे निमुटपणे संस्काराची चौकट पाळली गेली.

जन्म ते मृत्यु असं एक चक्र पुर्ण करणारी चौकट प्रत्येकाच्या वाट्याला येते, कुणाचाही जीवनपट उलगडून पाहिला तर लक्षात येईल कि जन्मा पासुन सुरू होणारी चौकट मरणा नंतर सुध्दा चौकटीतच नेते, या दोन चौकटीतला फरक एवढाच उरतो तो म्हणजे या चौकटीला हार असतो.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26145/new/#new

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

पुणे न् उणे?

पुणे न् उणे?

     पुण्यातील ट्राफिक हा भारत पाकिस्तान मुद्द्या पेक्षा मोठा विषय आहे, चार दिवसांपूर्वी पुण्यात प्रवास करण्याचा योग आला, फार मजेशीर प्रसंग अनुभवायला मिळाले. इथला एम् एच १२ व १४ चा चालक त्याच्या आजु बाजुला असलेल्या अन्य कुठल्याही एम् एच वाल्यां चालकांना परग्रहावरील ऐलियन पाहिल्या सारखे आश्चर्याने का बघताे कुणास ठाऊक? कदाचित पुण्यात येउन हे लोक एवढं शिस्तीत ड्रायव्हिग कसं करू शकतात हे कारण असु शकेल!

     दुसरं, इकडचा दुचाकी स्वार नेहमी घोड्यावर स्वार असल्यागत का वागत असतो? दिसला गँप कि दामटा घोडं! अरे रस्त्यावरील लोक बिचारे हात दाखवून थांब म्हणत असतात, तरी हे मात्र लढाईला निघाल्या प्रमाणे वागतात, तसा लढायांचा आणि पुण्याचा संबध जुनाच आहे म्हणा; वेळ कोणतीही असो, सिग्नलवरचा यु टर्न असो कि डिवायडरचा गँप असो, हे नेहमी घाईत असल्या सारखे वागणार, प्रत्येकाला कुठे जायचं असतं कुणास ठावुक?

     तसं पुणं म्हणजे एक संस्कृती, एक वारसा, एक परंपरा, एक विद्यानगरी एक उद्योग नगरी, एक आय टी हब व आणखी बरचं काही, तरीही मागील काही वर्षां पासून पुण्याची लोकसंख्या जोमाने वाढली, महाराष्ट्रा व्यतिरीक्त सार्‍या देशभरातून नोकरी धंद्या निमित्त लोक इथे आले व इकडचेच झाले. पुर्वी पेंन्शनरांचे म्हणुन ओळखले जाणारे पुणे आता चारही बाजूनी बेफाम फोफावले गेले आहे. वाढत्या लोकसंख्ये नुसार चांगल्या वाईट प्रवृत्ती, त्यातही वाईट प्रवृत्ती खूप वाढल्या पर्यायाने गुन्हेगारीचा आलेख पण वाढता आहे. बाकि काहीही म्हणा आताशा पुण्याचं मराठीपण कमी जाणवलं, खैर म्हणतात ना...

पुणे तिथे काय उणे?
मुंबई प्रमाणे इथेही
लागले आहेत फुटूू
परप्रांतियांचे पान्हे !

     उगीच अन्य कुठल्या शहराशी तुलना वगैरे म्हणुन नाही केली, आलेला अनुभव शेअर करावा वाटला ईतकचं.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26243/new/#new

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

सी सी टीव्ही व लक्ष

सी सी टीव्ही व लक्ष

     किती चमत्कारीक आहोत ना आपण? स्व:ताच स्व:तावर नजर ठेवु लागलोत, हल्ली पहाव तीथं सी सी टीव्ही लावतो, रेल्वे स्टेशन, बजार, चौक, आँफिस, राहतो त्या ईमारतीत वगैरे सार्वजनिक ठिकाणी समजु शकतो, पण काही लोक स्व:ताच्या घरात सुध्दा सी सी टीव्ही लावून घेतात, याaaadcला काय म्हणायचं? सुबत्ता कि एकदुसर्‍या बद्लचा अविश्वास?

     तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे व गरज म्हणुन खरं तर सी सी टीव्हीची संकल्पना पाश्चात्य देशात सुरू झाली व जगभर पसरली, तशी हि सोय चांगलीच आहे, एखाद्या अपराधिक घटने नंतर याचा उपयोग करून अपराधी पकडले गेलेले आहेत, व न्यायदानात पण याचा उपयोग होतच आहे. आज बर्‍याच क्षेत्रात त्याचा वापर सोयी नुसार होत व वाढत गेला. परस्पराच्या विश्वासावर अवलंबुन असणारे आता सी सी टीव्हीच्या फुटेजवर विश्वास ठेवु लागलेत.

     हल्ली एकत्र कुटुंब पध्दती तशी बाद झाल्यातच जमा आहे, आटोपशीर कुटुंब संज्ञेतुन हम तीन हाच मंत्र जपला जातोय, लोकसंख्येचा विचार करता याचा किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे, कारण हम तीन करून सुध्दा लोकसंख्या फुगतच चालली आहे, खैर, हम तीनच्या या काळात आई वडील दोघं कामानिमित्त बाहेर, घरी मुलं एकट, त्याला सांभाळणारी आया वा नोकर, मग हे लोक आपल्या अपत्याशी कसे वागतात यावर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टीव्हीची मदत घेतली जाते आणि त्याचे आश्चर्यकारक निकाल काही बाबतीत दिसुन आले.

     माणसाच्या स्वभावाचे, वागणुकिचे विविध पैलू दिसुन आले त्यात खास करून अपराधिक बबीच जास्त समोर आल्या, लहाणग्याचे दुध पिण्या पासुन ते त्याला अमानुष मारहाण करण्यापर्यंतचे विविध फुटेज समोर आलेले आहेत. या व्यतिरीक्त घरमालकाच्या गैरहजेरीत चोर्‍या करणं, चोरून खाणं इत्यादि घटना सुध्दा समोर आल्या आहेत.

     पुर्वी बरं होतं एकत्र कुटुंबात बरीच माणसं असायची, घरातील कर्त्या पुरूषावर घरी लक्ष ठेवण्यासाठी एवढा ताण येत नसे, कारण घरातील ईतर सदस्य ते काम व्यवस्थित करीत असत, मुलं अभ्यास करतात कि नाही? शेजारी पाजारी जातात का? कुणशी बोलतात? बाहेरील परके लोक, फेरीवाले वगैरे आजुबाजुला फिरताहेत का?इत्यादि बाबींवर घरातल्यांच, शेजारपाजार्‍यांच लक्ष रहायचं, एखाद्याने काही चुक केली वा अन्य काही घटना घडलीच तर त्या वेळेस हस्तक्षेप करून समोरच्याला दटावणी देत असतं, वेळ प्रसंगी मुलांवर रागावत सुद्धा असतं आणि त्या रागावण्याचा बाउ पालक कधी करीत नसत. अश्या वातावरणामुळे अपराधांच्या घटना कमी होत्या, बलात्कारा सारख्या गोष्टी तर क्वचित ऐकु येत असतं.

     एकंदरीत समाज व्यवस्था अशी होती कि सार्‍या परिसरात चालते बोलते सी.सी. टीव्ही होते, या उप्पर आपसातलं नेटवर्क एवढं स्ट्राँग असायचं कि बातमी वार्‍या सारखी पसरायची, तेही वाँट्स अँप वगैरे नसतांना. महत्वाचं म्हणजे परस्परांबद्ल विश्वास व आपलेपणा होता आणि त्या  आपलेपणाणुळे येणारे राग, लोभ, द्वेष वगैरे संमिश्र भावना पण असायच्या, परंतु या उलट परिस्थिती आज दिसते, फ्लँट कल्चर मुळे अपवादात्मक स्थितीत शेजारी वा बिल्डिंग मधे वर खाली काय घडतय वा घडलंय याचा कुणाला पत्ता नसतो. या मुळे अपराधी माणसिकता असणारे याचा सारा विचार करून अपराध करीत असतात, थोड्याश्या पैशांसाठी वयस्कर व्यक्ती, एकटी दुकटी महिला पाहून चोर्‍या करण्या पासुन ते खुना सारखे गुन्हे करतात. विकृत मानसिकता असलेले लोक तर कुठल्याही वयाच्या स्त्रीवर बलात्कार करतात, अगदि दिड वर्षाच्या बालिके पासुन ते सत्तरीतल्या आजींचा विचार सुध्दा या नराधमांच्या मनात येत नाही, तसं तर बलात्कार वाईटच, तरीही असे अपराधी पुराव्या अभावी मोकळे राहतात आणि दिवसागणिक या प्रकारच्या घटाना वाढतच आहेत. कुणाला दोषी ठरवायचं? बदललेल्या समाज व्यवस्थेला कि योग्य संस्कारा अभावी वाढत चाललेल्या विकृत, गुन्हेगारी प्रवृत्तीला?

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25570/new/#new

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

लोकल ट्रेन - जीवनवाहिनी



लोकल ट्रेन - जीवनवाहिनी

          मुंबई व तीच्या उपनगरातील लोकांची जीवनवाहिनी, अर्थात मुंबईची लोकल ट्रेन. अगदि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते खोपोली, सीएसटी ते पनवेल तसेच चर्चगेट ते डहाणु पर्यंत राहणार्‍या चाकरमान्यांची हि लाईफ लाईन.

          उद्या दसरा सर्वांना सुटी असल्या मुळे एक दिवस अगोदरच मुंबईचा लोकल प्रवासी या लाईफ लाईनचं कौतुक करतो, तीची पुजा करतो, एक प्रकारे तीच्या बद्लची कृतज्ञता व्यक्त करतो. वर्षभरात जरी कधी ती उशीरा धावली, रद् झाली तरी तेवढ्या वेळापुरता तीच्यावर रागवणारा, वेळ प्रसंगी शिव्या देणारा, तीची अडवणूक करणारा प्रवासी दसर्‍याच्या दिवशी सर्व विसरून तीला सजवतो, नारळ, हार व प्रसाद अर्पण करतो तसेच त्या वेळी ड्युटीवर असलेले मोटरमन व गार्ड यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करतो, प्रत्येकजण आपआपल्या कंपार्टमेंट मधे सजावट करून देवीप्रतिमेला गंध, पुष्प वगैरे अर्पुण आरती करतो नंतर प्रसाद दाखवुन अल्पोपहार व भेट वस्तुंचे वाटप करतो.  

          प्रवास संपता संपता पुढच्या वर्षी येणार्‍या दसर्‍याचे मनसुबे करीत आप आपल्या कामाला निघुन जातो. इतक्या दोन विरूद्ध टोकाचे स्वभाव दर्शन घडते मुंबईच्या लोकल प्रवाश्याचे. हि कहानी आहे मुंबईच्या धावत्या लोकलची व तीच्या प्रवाश्याची ...

          आम्ही पण आज सालाबाद प्रमाणे आमच्या सकाळच्या ८.११ बदलापूर ते सीएसटी लोकलची गाडीच्या अन्य प्रवाश्यासारखी पुजा केली व सर्व सह प्रवाश्यांसोबत अल्पोपहार करून आप आपल्या कामाच्या गंतव्य ठिकाणी उतरून मार्गस्थ झालो, पुढील दसर्‍याची वाट पाहण्या साठी.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25689/new/#new

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

टूर टु ग्वालियर...एक प्रवास

टूर टु ग्वालियर...एक प्रवास

!! गणपती बप्पा मोरया !!

     तीस वर्षात प्रथमच गणपती उत्सवात काहि विशेष निमित्ताने ग्वालियर (म.प्र.) येथे सासुरवाडीला येण्याचा योग आला, ज्या कामासाठी आलो ते काम सुखकर्ता दु:ख हर्ता गणपती बाप्पा सुखरूप पार पाडील अशी आशा करतो. 

     ग्वालियर, (म.प्र.) येथे खास करून सर्वच मराठी कुटुंबात पुणेरी विशेषत: पेशवे परंपरेचा पगडा जाणवतो, तस तर या शहराला एैतिहासिक संदर्भ व परंपरा आहेतच. लहान लहान रस्ते, गल्ल्या असलेल्या शहरात प्रत्येक नाक्यावर, गल्लीच्या कोपर्‍यांवर शक्तीदेवता हनुमानाची मंदिरेे जागोजगी दिसतात, या व्यतिरिक्त इतर अन्य देव देवतांची सुध्दा खुप मंदिरे आहेत, त्यामुळे इथे सतत उत्सवाचे वातावरण असते. 

     इथल्या मराठी लोकांमध्ये सण उत्सव साजरे करण्यात व विशेष करून खाद्द संस्कृतीत पुणेरी प्रभाव जास्त जाणवतो. ऐतिहासिक वारसा असलेलं शहर असल्यामुळे आजही येथे जुन्या परंपराची जपणुक केली जात आहे, पिढी बदलानुसार आधुनिकते कडे झुकत चाललेलं शहर अशी ओळख होवु लागली आहे. नविन नविन गृह प्रकल्प येवु लागल्या मुळे शहरात आता मल्टीस्टोरेज ईमारतींचे निर्माण होत असल्यामुळे एक नवेच वेगळे रूप शहर घेवु लागले आहे. इथे प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते, या सोबत अचलेश्वर नामक प्रसिध्द विभागात एका पुरातन स्वयंभु शिवमंदिरा समोर गेल्या पन्नास एक वर्षाची परंपरा असलेल्या गणेश मंडळाकडून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा या शहरात सुरू केली असे चौकशीत समजले. 

    गणपती उत्सवानंतर इथे दुर्गा उत्सव व दिवाळी फार जोरदार साजरी केली जाते, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या अठरापगड सामजाच्या अनेकविध परंपरेनुसार साजरे केले जाणारे बरेच सण, उत्सव वर्षभर सुरू असतात. बाकि व्यापारी वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फार मोठी उलाढाल येथे चालते. इतर शहरांप्रमाणे इथे सुध्दा शहराचा विस्तार होउ लागलाय, जुने व नवे असे दोन भाग स्पष्ट दिसतात. एकंदरीत एकदातरी भेट देण्याजोगे शहर आहे, आजुबाजुला फारच सुंदर ऐतिहासिक परंपराची अन्य शहरे आहेत जसे शिवपुरी, मथुरा, आग्रा, खजुराहो वगैरे. बर्‍याच वर्षां पासुन या शहराबद्ल काहितरी लिहावं असं मनात होतं तो योग आता आला एवढंच.

      खरं तर इथे आलो होतो ते काही वेगळ्याच कामासाठी, परंतु ते कार्य परमेश्वर कृपेने व्यवस्थित पार पडले. या प्रकारे प्रवास 
वर्णनात्मक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, कही चुकलं असेल तर सर्व वाचक सहकारी सांभाळुन घेतील हि अपेक्षा.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25418/new/#new

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1091497450904906&id=100001339833771

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

रीत

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

         असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

          पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

          किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

          पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

          विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25347/new/#new

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मला वाटते.... रीत

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25347/new/#new

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

मला वाटते... पेरण्या पर्याय

मला वाटते... पेरण्या पर्याय

काल पेपरात एक बातमी वाचली, "कांद्याचे भाव गडगडले, कांदा फक्त पाच पैसे किलोने विकला गेला", खरचं फार दयनिय अवस्था झाली आहे शेतकर्‍याची. काय करावे त्याने? हमी भाव सुध्दा मिळत नाही.

एकिकडे पिक कमी झालं तर भाव वाढीमुळे हाच कांदा सामान्यांना रडवतो, व पिक अमाप झाले तर शेतकर्‍याला रडवतो. कांदा मात्र आपला रडविण्याचा गुणधर्म सोडत नाही.

या नेहमीच्या अडचणीवर तज्ञ मंडळींनी शोध घेउन उत्तर शोधावे व यातुन सर्वांची सुटका करावी. मी काही शेती तज्ञ वा जाणकार नाही तरी मला सुचलेला एक उपाय मांडत आहे, बाजाराचा अंदाज घेवुन गावात विचार विनिमय करून प्रत्येकाने वेगवेगळी पीके घेवुन सामुहीक पध्दतीने शेती केली जाउ शकते, अर्थात हा उपाय किती व्यवहार्य आहे हे तज्ञ मंडळी सांगु शकतील, तर काहींना हा पर्याय पटणार देखिल नाही, तरीही सुचवावासा वाटला, वाँट्सअँप वरील एका पोस्टने प्रेरीत होउन सुचलेला हा...

"पेरण्या पर्याय"...

करोन विचार
शेत ते पेरता
शक्य होते घेता
दुजे पिक

कुणी लावा कांदे
कुणी ते टमाटे
उरल्यां बटाटे
लोवोनिया

पर्याय असता
अन्य पिका साठी
दौड का ती मोठी
कांद्या साठी

वैविध्याचा मंत्र
ठेवोनिया ध्यानी
सर्व त्या बळींनी
पिकां साठी

विचार पुर्वक
घेता समजुन
हाटा उमजुन
घ्यावे पिक

हिणवण्या कोणा
नाही ईथे डाव
कल्याण ते व्हाव
कुणब्याचं

ईश्वरा प्रार्थना
करोनी वंदन
दे भरभरून
धान्य पाणी

होईल स्वयंभु
शेतकरी राजा
विश्वास तो माझा
म्हणे शिवा

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25155/new/#new

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

मला वाटते... आँलिम्पिक निमित्त

मला वाटते...
आँलिम्पिक निमित्त

पी व्ही सिंधु व साक्षी मलिक यांनी त्याच्या क्रिडा प्रकारात अव्वल खेळ करून देशाचं व स्वतःचं नाव मोठं केलयं या साठी त्या दोघींचं व त्याच्या प्रशिक्षकांच मनःपर्वक अभिनंदन.

आज त्यांच्यावर अनेक राज्यांतुन नानाविध बक्षिसांची घोषणा आता होउ लागली आहे, हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे, त्या दोघींनी आज जगभरात भारताचे नाव मोठे केलंय, त्याच कौतुक निश्चितच व्हायला पाहीजे व ते होत आहे.

दुसरा एक विचार करता असं वाटतं कि आज जी बक्षिसं त्यांना दिली जात आहेत, तीच रक्कम जर यापुर्वी त्यांच्या चांगल्या प्रशिक्षणावर, सुविधांवर खर्च केली गेली असती तर? आज जे यश त्यांनी मिळवलं आहे त्या पेक्षा अजुन मोठं, उत्तुंग यश त्या मिळवू शकल्या असत्या, तसेच त्याच्या सारख्या अन्य खेळाडूना प्रशिक्षण घेण्यासाठी सुविधा झाली असती व आणखी नवे खेळाडू निर्माण झाले असते.

प्रत्येक राज्याने केवळ स्पर्धे उपरांत बक्षिसांची घोषणा करण्या ऐवजी होतकरू व मेहनती खेळाडूंना दत्तक घेवुन त्यांना उच्च प्रतिचं प्रशिक्षण पुरवुन जागतिक स्तरावर चमकण्याची संधी द्यायला हवी, योग्य क्रिडा धोरण अवलंबुन त्यात कोणाताही हस्तक्षेप न होउ देता सकारात्मक पणे राबवायला हवे, मग पहा किती पदकं आपल्या देशाला मिळतात ते.

मी एक सामान्य क्रिडा प्रेमी आहे कुणी क्रिडा तज्ञ वा जाणकार नाही, तेंव्हा सहज  मनात विचार आला कि जर अमेरिका, चीन, ब्रिटन व अन्य पदक तालिकेतील उच्च स्थानावर असलेल्या देशातील राज्यांनी अशाप्रकारे बक्षिसे दिली तर काय होईल? मलां वाटलं त्या त्या राज्यांना इतरांकडून कर्ज घेवुन बक्षिसं द्यावी लागतील इतके विजेते खेळाडू आहेत त्याच्या कडे आहेत.

भारतिय खेळाडू खुप प्रतिभावंत आहेत, फक्त योग्य सकारात्मक पोषक क्रिडा धोरण ठरवलं व त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली कि मग पहा पुढच्या स्पर्धे वेळी आपली पदक संख्या वाढते कि नाही.

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25116/new/#new

रविवार, २६ जून, २०१६

तुझे गीत गाऊ दे...

तुझे गीत गाऊ दे...

दर वर्षी तु येतोस, सर्वांना सुखावतोस, पण मागील काही वर्षांपासून तू जरा रूसलास तरीही नको तेव्हा बरसलास. का रे तू असा वागलास? तुला माहीत आहे तुझ्यावाचून आम्हीच काय, सारी सृष्टी काहीच करू शकत नाही.

पृथ्वीवरील सारे जीव तूझ्या वाचून शुन्य आहेत, तूझ्या अमृतमयी थेंबानी सारी धरा शहारून येते, तीचं स्वतःचं रूप तुझ्या केवळ जाणिवेने बदलून जातं, पशु,पक्षी सारं काही नवसंजीवनी मिळाल्या सारखे ताजे तवाने होउन जातात. काल तुझं अस्तित्व जाणवलं, खिडकीत येउन तुला नमस्कार केला, मनातुन प्रार्थना केली कि "बाबा रे यंदा तु थोडासा लेट झालासं, काही हरकत नाही, तसा तु लहरी नाहीस, पण आमच्याकडचे हवामान खात्याचे जे लोक आहेत ना, त्यांचे अंदाज मात्र नेहमी चुकिचेच ठरतात, आता हे तुला आणि त्यांनाच ठावूक, कि कोण कुणाची फिरकी घेतयं ते? असो, तरी यंदा तुला अशी नम्र विनंती कि जरा मन मोकळा ये, आणि सर्व दूर ये, नाही तर काही ठिकाणी खुप दिवस तु मुक्काम करतोस, पार दैना होते रे सार्‍यांची, आणि ज्या ठिकाणी नाही येत त्यांची पण अवस्था चांगली नसते रे, समजुन उमजुन ये जरा, कारण तुला माहितच आहे कि तुझ्या शिवाय कुणाचेच पान हलणार नाही.

मला माहित आहे, मी तुला एवढं सागळं सांगतोय तरीही आमच्या पण काही चुका आम्हाला मान्य करायलाच हव्यात, आम्ही तुझा, तुझ्या निसर्गाचा सारा ढाचाच बदलून टाकला, नको इतकी जंगलतोड केली, शहरीकरणाच्या नावा खाली डोंगर फोडून तुझ्या हक्काचा थांबा हिरावून घेतला, तू जर थांबलाच नाहीस तर बरसणार कसा? याचं सुध्दा आम्हा मुर्खांना भान राहिलं नाही.
नुसत्या ईमारती बांधत राहीलो, त्या साठी अमाप झाडे तोडली, पर्यायाने जमिनीची धुप होउन तुझे जमा होणारे पाणी सुद्धा समुद्राकडे निघुन जाउ लागले, परिणाम स्वरूपी माळीन, ॠषीकेश वगैरे सारख्या घटना घडून गावेच्या गावे वाहून, गायब होउन गेली, म्हणजे तु व्यवस्थित बरसुन सुद्धा आमचे नियोजन नसल्या मुळे व कळत असुन वळत नसल्या मुळे, तुलाच दोषी ठरवायची खोड आम्हाला लागली. हे वरूण राजा आमची हि कृत्ये एकदा विसरून आम्हाला क्षमा कर.

यंदा येउन सारा जुना हिशोब चुकता कर आणि सार्‍या जगताला शांत कर, पुन्हा एकदा हि धरणी सुजलांम् सुफलांम् होउ दे, सगळ्यानी आनंदाने तुझे गीत गाउ दे.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t24323/new/#new

शुक्रवार, १० जून, २०१६

एक प्रवास आगी सोबत...


एक प्रवास आगी सोबत...

          २६ जलै २००५ च्या महाभयंकर पुरातुन नुकतेच सर्वजण सावरले होते, त्या आठवणी ताज्या असतांनाच पुन्हा तशीच वेळ येते कि काय असा प्रसंग ओढवला...

          घटना, बरोबर १० वर्षा पुर्वीची, ६ सप्टेंबर २००५ ची संध्याकाळची वेळ, मुंबई सी.एस.टी वरून सुटणा-या ५.५५ च्या बदलापूर लोकल मधे आम्ही सर्व ग्रुप मेंबर्स स्थानापन्न झालो. नेहमी प्रमाणे  गाडी सुटल्याबरोबर आमची गाण्याची मैफल सुरू झाली, ज्या मैफलीला डब्यातील परीचित, अपरीचित प्रवाशांकडून उस्फुर्त दाद मिळत होती. आमच्यापैकी बहुतेक सर्वजण चांगले गायक असल्याने एका पेक्षा एक सुरेल गाण्यांची मैफल नेहमीच रंगत असे, गाणी गाता गाता प्रवासातला वेळ कसा जात असे हे अजिबात कळत नसे.
नोकरदारांना कोणत्याही परीस्थितीत घराबाहेर पडावेच लागते, त्या दिवशी सकाळ पासुन सारखा पाऊस पडत होता, आता सुध्दा बाहेर विजांच्या कडकडाटा सह पाऊस ब-यापैकि बरसत होता आणि आत डब्यात एकापेक्षा एक सुर बरसत होते, आमची गीत मैफल उत्तरोत्तर रंगत होती, एक तास दहा मिनिटांचा सी.एस.टी. ते अंबरनाथ हा प्रवास  कसा संपला हे कुणालाच समजले नाही, अंबरनाथ स्टेशनला गाडी नेहमी पेक्षा जरा जास्त वेळ उभी राहिल्याने सर्वाची चुळबुळ सुरू झाली होती, प्रत्येकजण काय झालं असेल याचे आडाखे बांधत होता, बाहेर पाऊस चांगलाच कोसळत असल्यामुळे प्रत्येकाने दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या होत्या त्यामुळे बाहेरची काहीच खबर कळत नव्हती, दरम्यान कशीबशी गाडी सुरू झाली होती.

        ज्या ठिकाणी आम्ही बसायचो तो अकरावा डबा बदलापूरच्या दिशेकडचा प्लँटफाँर्म सोडायचा बाकी होता, पुढील दहा मिनिटात बदलापूरला उतरायचे या विचारात आम्ही सारे असतांना एका झटक्या सोबत जोरदार धमाका झाला, आणि डब्यासह प्लँटफाँर्म वरील सर्व दिवे गेले, सगळीकडे गर्द अंधार झाला आणि आगीचा एक भला मोठा लाल पिवळा लोळ उठला, आगीची तिव्रता एवढी होती कि खिडक्या दरवाजे बंद असतांना सुध्दा बाहेरचा सारा परीसर त्यात उजळुन गलेला आम्हाला दिसला व पापणी लवेस्तोवर पुन्हा मिट्ट काळोख पसरला, क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला, "आपुले मरण पाहीले म्या डोळा" अवस्था झाली होती, पण पुढच्या काही मिनिटातच सावरलो,  कसलाही अंदाज येत नव्हता, बाँम्बस्फोट झालाय कि काय अशी काळीज हादरवणारी शंका मनाला वाटली. इथे डब्यात नुसता गोंधळ, आरडा ओरडा ऐकू येत होता, त्यातच पुन्हा एक आगीचा लोळ दिसला, आमच्या डब्यावर जणु कुणीतरी दिवाळीतला अनार फोडतोय कि काय असाच भास होत होता, भिती मिश्रित आश्चर्य अशी काहीशी अवस्था बाकी मित्रांची सुध्दा झाली होती, बाहेरून कुणीतरी सागितले कि गाडीच्या पेंटोग्राफला आग लागली आहे, त्याचेच स्फोट होत होते, इकडे मनातुन मात्र सगळ्यांचीच पार तरतरली होती.

          काही लोकांनी चालत्या गाडीतुन उडया टाकल्या, कुणी रडू लागले, काय न काय, परंतु आम्ही सारे समंजस पणे वागलो, मनातुन आठवतील त्या देवांचा धावा आम्ही करीत होतो. एकीच बळ काय असतं ते सर्वानी दाखवुन दिल, एकानेही उडी मारण्याची वा पळण्याची घाई केली नाही, महत्वाचं म्हणजे कुणीही पँनिक झाले नाही किंवा तसं कुणी दाखवल नाही, उलट एकदुस-याला धीर देवुन सावरत होते. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, सोबत विजांचा कडकडाट आणि टपावर छोटे छोटे स्फोट सुध्दा.

          वातावरण गंभीर झालं होतं, परंतु प्रत्येकजण खुप धीराने वागला, सर्वप्रथम मोबाईल व छत्र्या बंद करायला सांगीतल्या, कारण बाहेर विजांचा चांगलाच नाच सुरू होता, दरम्यान पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या चुकवत चुकवत आम्ही सारे पुलाच्या सहाय्याने सावकाश प्लँटफाँर्मच्या उलटया बाजुला उतरलो, खरच त्या दिवशी नशिब बलवत्तर म्हणुन आम्ही सारे एका अनर्थातुन बचावलो.

          पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या पासुन दूर जाण्यासाठी आम्ही मानवी साखळी करून उलट चालु लागलो होतो, गाडी पासुन ब-यापैकी अंतरावर असतांना पुन्हा एक धमाका झाला, पुन्हा एक लोळ व ठिणग्या उसळल्या, त्याचा फटका काही लोकांना बसला, कित्तेकांना त्या ठीणग्यांमुळे चटके बसले, कुणाचे कपडे जळाले, गाडीतुन उडया मारल्या मुळे काहीना खरचटले, किरकोळ दुखापती झाल्या. त्या गडबडीत आमच्यातील एकाचे घडयाळ हरवले, याची हळहळ सा-यांनाच लागली होती.

          आम्ही सुखरूप एका टपरीजवळ पोहचलो, चहाची आँर्डर देतांना लक्षात आले कि आमच्यातील एकजण गायब आहे, पुन्हा ग्रुप मधे टेंन्शन वाढले, त्याला फोन लावायचा प्रयत्न केला तर त्याचा फोन बंद लागत होता, दरम्यान लक्षात आले कि विजा चमकत असल्या मुळे त्याने मोबईल बंद ठेवला असणार! कसाबसा चाहा घेतला व पुन्हा टपरीवर भेटायचे ठरवुन दोन दोनच्या गटाने आम्ही त्याला शोधायला निघालो, बराचवेळ शोधुन त्याचा पत्ता नाही लागला, त्या आधी एका दुकानदाराला विनंती करून त्याच्या फोनवरून एक दोघांच्या घरी सुखरूप असल्याचा निरोप दिला व तसा निरोप ग्रुपमधील सर्वांच्या घरी दयायची व्यवस्था केली. पुढे काय करायचे हे ठरवत असतांनाच समोर तो दिसला, प्रत्येकाच्या मनात भयंकर राग, उस्तुकता, आश्चर्य अशा सगळ्या भावना आल्या होत्या. शेवटी त्याने सांगीतले कि "मी घडयाळ शोधायला परत गेलो, बरीच शोधाशोध केल्यावर सापडले", हे घे... म्हणत त्याने घडयाळ समोर केले... तेव्हा मात्र सगळ्यांचा राग गायब झाला.

          येवढया सा-या गोंधळामुळे आधिच घरी जायला खुप उशिर झाला होता, सगळयांना भुका सुध्दा लागल्या होत्या, आमच्या सारखी स्थिती सा-याची झाली होती, प्रत्येकाला घरी जायचे होते, रिक्षा, बस जे वाहन मिळेल त्याने लोक जात होते, अखेरीस खुप मिनतवारी करून आम्ही एका रीक्षावाल्याला बदलापूर पर्यंत आणले व सारे जण आपआपल्या घरी सुखरूप पोहचलो.

         मैत्रीचे बंध कसे असतात हे या प्रसंगातुन दिसले, परस्परांची काळजी घेणं, वेळ प्रसंगी कुठलेही काम स्वतःहुन करणं हे कुणालाच सांगावे लागले नाही. चांगले मित्र भेटायला नशीब लागत, मला भेटलेत असे मित्र, आणखी काय हवं असत जीवनात? खरच आजही आम्हा सर्वांनी तो अतुट धागा जपुन ठेवला आहे.

= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com

बुधवार, २५ मे, २०१६

जाता जाता आला

जाता जाता आला...

          आज आमच्या कडे तो आला, वा-याची थंड झुळुक घेवुन आला, मला फार सुखद बरं वाटलं, ट्रेन मधे लोक दरवाजा खिडक्या लावुन घेत होते... भिजायच्या भितीने, मी म्हटल त्यांना नका रे अडवू त्याला, परततांना तरी त्याला येवु दया, नाही थांबणार तो आता जास्त काळ.

          उतरल्यावर वाटत होतं, थांबेल तो जरासा, पण तोही लहान मुलासारखा आज हट्ट करून होता, कधी कधी हट्टी मुलाचा राग येतो, पण त्याचा नाही आला... कर हट्ट आणि भिजव सा-यांना, तप्त, तृषार्त धरणीला, थोडासा मिळेल दिलासा   शेतक-याला. भिजव आमच्या सो काँल्ड काँलिफाईड, वाँटरपार्कच्या पावसात भिजणा-यांना.

          एक वेळ होती घरचे लोक म्हणायचे "चल घरी, भिजु नकोस, पडसं होईल..." तरी पण हट्टाने भिजायचो, आता पावसाचा राग येतो, भिजायच सोडून आडोश्याला लपतो.... म्हणतात ना माणुस बदलतो? निसर्ग तसाच रहातो निरागस....

          मी वाट पाहीली थोडा वेळ, तो नाही थांबला मग मी पण निघालो त्याच्या सोबत... मनात काही काही आठवत होत...

          पाऊस बघ परतीचाआपल्या भेटीस परत आला,गाठले बेसावध मलातुझ्या भेटीचा योग न आला!


= शिवाजी सांगळे, बदलापूर