बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

चौकट

चौकट

जन्म झाल्यावर प्रत्येक जीव धर्म, जात, पोटजात आणि कुळ यातच वाटला जातो, एक सामाजिक चौकट घेउन जगु लागतो. पुढे आई बापाच्या कुवती नुसार शाळेत माध्यम निवडलं जातं व पुढील दहा बारा वर्षा साठी पुन्हा चौकट तयार होते, त्यानंतर अनेक अभ्यासक्रमांच्या चौकटी पैकी आजुबाजुला सुरू असलेल्या शर्यतीत सामिल होण्यासाठी एक निवडली जाते, डोनेशन, कँपिटेशन फी वगैरे भरून झेपत असो नसो, तरी या चौकटीत टिकुन रहायचा केविलवाणा प्रयत्न करतात.

स्वतःला मान्य असो वा नसो, तरी जगताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक वेगवेगळ्या चौकटी भेदाव्या लागतात, अगदि शिक्षण, नोकरी, घर एवढच काय तर लग्न सुद्धा चौकट पाहूनच कराव लागतं. कधी नवरा, कधी बाप अश्या भुमिका पार पाडीत जगावं लागतं. बरं पुरूषांच्या बाबतीत जबाबदार्‍या काही प्रमाणात कमी आहेत, परंतु स्त्रियांच्या संबंधात असं होत नाही, त्यांना लहानपणा पासुन अनेक बंधनांच्या चौकटीत राहून सोशीकपणे जगावं लागतं. मला स्त्री पुरूष असा भेदभाव नाही करायचा, ना स्त्री मुक्ती वगैरे बद्दल बोलायचं, तरीही जे सत्य आहे ते नाकारता येत नाही.

चौकटीत जीव स्थिरावतो, काहीसा थांबतो, तेच वर्तुळात तो फिरत राहतो. कदाचित तेच कारण असेल म्हणुन आपले फोटो आयताकृत असतात, अपवाद म्हणुन कधी वर्तुळातही असतात, पण प्रचलित असतात ते आयतातलेच. काय किमया असावी चौकटीची? चौकट घडवते, चौकट बिघडवते चांगल्याला वाईट तर क्वचित प्रसंगी वाईटाला चांगलं बनवते.

चौकटीत जे काही असतं ते वेगळ दिसतं, या संदर्भात १९८१ साली धारवी झोपडपट्टीतील कथेवर प्रदर्शित झालेला चित्रपट "चक्र", ज्याचं स्मिता पाटिल यांच उघड्यावर अंघोळ करतानाचं पोस्टर जे रेल्वे, बस स्टाँप लगतच्या भिंतीवर लावलेलं, खुप वेळा पाहिलं होतं, माहित नाही तेव्हा त्या पोस्टरची चर्चा का झाली होती ते? खरं तर रेल्वे लगतच्या झोपडपट्टीतलं ते वास्तव होतं, सामान्यपणे रोज सकाळी अश्या अंघोळ करणार्‍या स्त्रीया, मुली अनेकांना दिसल्या असतील, पण त्या पोस्टरची चर्चा खुप झाली ती केवळ त्या पोस्टरला असलेल्या चौकटी मुळे, एका चौकटीने लोकांचा दृष्टीकोणच बदलला होता तेव्हा हे खरं.

पुर्वी आपल्याकडे अशी फँशन होती कि घरात देवादिकांचे फोटो फ्रेम भिंतीवर लावले जात व पुजाअर्चा केली जात असे कारण तशी मानसिकता बिंबवली गेली होती, तरी शेवटी प्रश्न श्रध्देचा असल्यामुळे निमुटपणे संस्काराची चौकट पाळली गेली.

जन्म ते मृत्यु असं एक चक्र पुर्ण करणारी चौकट प्रत्येकाच्या वाट्याला येते, कुणाचाही जीवनपट उलगडून पाहिला तर लक्षात येईल कि जन्मा पासुन सुरू होणारी चौकट मरणा नंतर सुध्दा चौकटीतच नेते, या दोन चौकटीतला फरक एवढाच उरतो तो म्हणजे या चौकटीला हार असतो.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26145/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा