शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

रिटायर्ड झाल्यावर

रिटायर्ड झाल्यावर

       दिड एक वर्षभरापुर्वी रिटायर्ड झालेला मित्र परवा भेटला, तसाच पुर्वी सारखा हसतमुख, खट्याळ व बोलका, काही बदल नव्हता त्याच्या वागण्या बोलण्यात, बरं वाटल त्याला पाहुन. त्याही पेक्षा एक नवी दिशा सापडली त्याच्या बोलण्यतुन.

      चार पाच जण सहज गप्पा करीत असतांना कुणी तरी त्याला विचारले, "काय करतोस रे हल्ली? कुठे पार्ट टाईम जातोस कि नाही? यावर तो जे काहि म्हणाला त्यातुन सर्वांनी बोध घ्यावा असं होतं ते...

       अरे काहीच करीत नाही, मस्त पेपर वाचतो, बायको सोबत गप्पा मारतो, वेळ प्रसंगी कामात मदत सुद्दा करतो, मित्र मंडळी व नातेवाईकांना ईतके दिवस जो वेळ देउ शकलो नव्हतो तो देतोय, देवळात जातोय, मस्त मनाला आवडतात ती गाणी ऐकतो, पहायचे राहून गेलेले जुने चित्रपट पाहतो, छान एन्जाँय करतोय सारं. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं वाढवायची जी उणिव राहिली होती ती नातवंड वाढवताना घेतोय, तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? सगळे जण तेच तर करतात रिटायर्ड झाल्यावर; तरीही त्यात वेगळी गंमत आहे. अरे, आपली मुलं कशी मोठी झाली आठवतं का तुम्हाला कोणाला? यावर दोघांनी नकारार्थी माना हलवल्या, बाकीचे गप्प होते.

       तो पुढे सांगु लागला अरे, आम्ही दोघं नोकरी करणारे, रोज सकाळी घाई घाईत आवरून ट्रेन पकडायला बाहेर पडायचो, त्या दरम्यान मुलांच आवरण, त्याचे कपडे, खाणं वगैरे डब्यात भरून त्यांना बेबी सिटींग मधे सोडाची घाई असायची. दिवसभराचं सर्व उरकुन घरी आल्यावर साहजिकच पहिलं लक्ष मुलां कडेच द्यावं लागायच. पुढे मुलं मोठी झाली तरीही परीस्थितीत काही विशेष फरक पडला नव्हता, त्या काळात खरोखर मुलांचे हट्ट, लाड पुरवता आले नाही, बाकि लौकीक अर्थाने त्यांच्या गरजा पुरवित होतो ईतकच, कधी कधी त्यांच्या लहान सहान गोष्टीकडे, हट्टा कडे दुर्लक्ष करावं लागलं. नोकरी पेक्षा प्रवासाने जास्त थकुन जायचो, शरीरात त्राण उरत नव्हते, त्यामुळे चिडचीड व्हायची, जे हाल माझे तेच बायकोचेही व्हायचे.

       मुलांच बालपण खऱ्या अर्थाने अनुभवलं नाही आम्ही व मुलांनी सुद्धा. खरचं आता ती खंत जाणवते, घर, संसार चालवण्याच्या चक्रात त्यांच बालपण हिरावून घेतलं व स्वतःच तारूण्य शर्यतीला जुंपलं, नाहीतर काय? दिवसेंदिवस हा जीवन संघर्ष कठीणच होत चालला आहे. अरे, आपला काळ तर कसातरी सरला, पण आजची पिढी! लांब कशाला, माझ्या मुलाच व सुनेचच उदाहरण घ्या, आपल्या पेक्षा जास्त धावपळ, दमछाक होते अश्या नोकऱ्या, त्या करता करता येणरी वेगवेगळी टेंन्शस्, कंप्युटर असुन सुद्धा कामाचा म्हणावा तसा उरक नाही हल्लीच्या पिढीकडे. खैर, काळा नुसार हे होतचं रहाणार व त्या प्रमाणे जगावे लागणार, आणि ते जगता जगता मुलांची गरज म्हणा कि आपली? सोबत रहायचं सुख तर मिळत, दोघांनाही.

       मुलांसाठी जे जे करायचं राहिलं होतं ते आज नातवंडाच करून ती कसर भरून काढतो आम्ही दोघं, नातवंडाशी खेळतो, त्यांना गोष्टी सांगतो, अभ्यास घेतो फार समाधान मिळतं त्यातुन. तरीही घर म्हटलं कि भांड्याला भांड लागायचंच, पण तेही तेवढया पुरतचं राहतं, शेवटी कुणासाठी केली होती इतक्या वर्षांची धडपड? केलेल्या धावपळीत सुख म्हणजे काय हे समजल नव्हतं ते आता समजतय, नातवंड वाढवताना, आपलचं रूप आपण घडवतोय असं वाटतं, कुणी तरी म्हटलंच आहे कि दुधा पेक्षा दुधावरची साय जास्त आपलीशी वाटते. दोस्तो, हेच खरं.
     
       मी तर माझ्या मुलांना सांगीतलयं खुप धावपळ करू नका, केवळ पैसा कमावणं हाच शेवट नाही, आपल्या मुलांना, कुटुंबाला, माणसांना वेळ द्या, त्याच्याशी बोला, संवाद साधा, मान्य कि आजची महागाई, शिक्षणाचा, औषध पाण्याचा खर्च पाहता पैसा कमी पडतो, त्याची आवश्यकता आहे, तरीही अनावश्यक स्पर्धा व त्यातुन येणारे खर्च टाळा. योग्य नियोजन करूनही चांगल व सुरक्षित जीवन जगणं आपल्याच हाती आहे. आम्हाला नाही जमलं ते नीट पणे, पण आता तुम्ही ते जमवु शकता, किंबहुना तसा प्रयत्न करू शकता तेवढा आधार आहे तुम्हांला आमचा.

       इतकं सारं तो भरभरून व कौतुकाने सांगत होता व आम्ही मुग्ध होउन ऐकत होतो, अर्धा-पाउन तास केव्हा उलटला हे सुद्धा कळल नाही. कुणी तरी म्हटलं "अरे चला कामं नाहीत का?", तेंव्हा त्याचा निरोप घेउन एक एकजण मार्गस्थ झाला, मी सुध्दा निघालो, पण मनात त्याचे शब्द पिंगा घालीत होते. खरचं आपण सुद्दा या पेक्षा वेगळ काय केलं? हा प्रश्न काही केल्या मनातुन तेवढा जात नव्हता.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t26182/new/#new 17-11-2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा