बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" (नाटिका)

नमस्कार मित्र हो,

माझ्या एका छोटूश्या मैत्रीणीच्या आग्रहाखातर लिहीलेली एक छोटीशी नाटिका "चिमणी वाचवा निसर्ग वाचवा" सादर करीत आहे, सदर नाटिकेला माननिय बाल साहित्यिक व कथाकार श्री एकनाथजी आव्हाड यांचे पुढील प्रमाणे मनोगत लाभले आहे...

"पर्यावरणाचा संदेश देणारी तसेच मुलींचा सन्मान वाढवणारी आजच्या समाजमनाला सहज भिडणारी ही बालनाटिका मुलांना सादर करायला तर आवडेलच शिवाय त्यांना खूप काही शिकवून जाईल. अभिनंदन आपले."

"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा"

1. (झाड क्र. 1 – 2 – 3) झाडांच्या रुपात तीन मुली दिड ते दोन फुट अंतर ठेऊन उभ्या आहेत.
2. (मुलगी क्र. 1) हातात पाण्याचं भांड व दाणे/धन्य ते आजूबाजूला टाकते व पाण्याचं भांड ठेवते.
3. (चिमणी क्र. 1) पंख हलवीत येते व झाडा शेजारी उभी राहते.
4. (मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे हातात घेऊन येते व (मुलगी क्र. 1) च्या शेजारी उभी राहते.
5. (चिमणी क्र. 2 व 3) पंख हलवीत विरुद्ध दिशेने  त्याच वेळी तेथे येतात.
               ----- xx X xx -----
झाड-१ : काय उकडतंय नाही?

झाड-२ : हो न. सुर्य नुसता आगच ओकतोय, कधी पाऊस पडतोय असं झालय?

झाड-३ : एवढयात कसला येतोय पाऊस? आधी उन्हाळा तर जाऊ दे!

झाड-२ : मग काल एवढे ढग कशाला आले होते?

झाड-१ : हो. तुझ्या डोक्यावर सावली धरायला आले होते.

चिमणी क्र. १   पंख हलवीत झाडां मागे जाते व मान बाहेर काढून अवतीभोवती पहात झाडांशी बोलू लागते.

चिमणी क्र १ : बाई गं, खूप दमले मी, जरावेळ सावलीत बसू का? करू का थोडा आराम तुमच्या खांद्यावर बसून?                       (सर्व झाडे एकमेकाकडे पाहून हसतात)
त्याच वेळी तीची नजर दाणे टाकलेल्या ठिकाणी जाते व ती ईतर चिमण्यांना सुध्दा बोलावते. तिघी दाणे टाकलेल्या जागी गोल फिरून दाणे शोधू लागतात.
(मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे जमिनीवर ठेवते, व मोबाईल टावर सारखी उभी राहते.

चिमणी क्र १ : थांबते, हे बघा इथेच आहेत दाणे, या खायला.

चिमणी क्र ३ : (विरोध करीत) खात्री केल्या शिवाय खाऊया नको, हल्ली खरं नाही या माणसांच!

चिमणी क्र १ : मला तर बाई खूप भूक लागली आहे.

चिमणी क्र २ : तुला सांगते, या मोबाईल टावरच्या लहरीमुळे खूप त्रास होतो, डोकं गरगरतं नुसत.

चिमणी क्र १ : तू काय सांगतेस? मी तर त्या मोबाईल टावरचं घरट बांधलं होतं, हा  आता आलं लक्षात त्या टावरच्या लहरीमुळे थकायला होतं मला.

चिमणी क्र २ : हो गं, नाहीतरी या माणसांनी कौलारू घरं तोडून सगळीकडे टावर बांधले. कौलारूघरामध्ये त्या माणसां सोबत आपल्याला पण जागा मिळत होती थोडी फार.

चिमणी क्र ३ : ते झालच, ही माणसं बिल्डिंगला काचा लावतात, सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने किती उकडतं? त्यात भर म्हणुन रस्त्यावरच्या गाड्या, त्या मुळे काय कमी गरम होतं? तरी बरं ही झाडं आहेत. ( सर्व झाडे एकमेकाकडे पाहून आनंदाने हसतात)

चिमणी क्र १ : अगं. पण ते दाणे कधी खायचे आपण? बसलो आपण गप्पा मारीत, आपल्याला पण त्या बायकांचीच सवय लागली.

चिमणी क्र ३ : दाणे खायचं ठीक आहे, सापळा तर नसेल ना तीथे? आधीच आपली चिवचिव संख्या कमी झाली आहे, त्यात हे टपोरी कावले नेहमी छेड काढत असतात.

चिमणी क्र २ : तसं नाही, त्यांनी म्हणजे माणसांनी आपली रहायची सुद्धा सोय केली आहे, ते बघ घरट. (घरट्या कडे इशारा करते)

चिमणी क्र ३ : चला मग दाणे खायला... तिघी दाणे खायला जातात.

झाड क्र. १: पाहिलंत, कित्ती विश्वास आहे त्यांना आपल्यावर? नाहीतर ही माणसं, पार तोडून तोडून आपली संख्या कमी करीत सुटले आहेत.

झाड क्र. ३: हो खरं आहे, काही समजतं कि नाही त्यांना?

झाड क्र. २: हो, हों अगदी खरं आहे, बघा आजूबाजूचा सारा परिसर कसा उघडा बोडका झालायं यांच्या मूळ, स्वतः साठी पण सावलीला जागा ठेवली नाही त्यांनी.
(मुलगी क्र. 1) स्वतः कडील मोबाईल फोन काढून बोलू लागते.... हलो हलो.... काही बाही बोलत राहते, त्याच वेळी मोबाईल टावर झालेली मुलगी डोलू लागते.

चिमणी क्र ३ :  पळा, झाला टावर सुरु ...

चिमणी क्र २ : चला झाडावर बसूया, तिथे आही धोका नाही आपल्याला.

चिमणी क्र १ : खरचं, ही झाडचं आपल्या कामाला आली, माणसांना कधी कळणार कि झाडे वाचवा, पशु पक्षी वाचवा? निसर्ग वाचवा? अजुनही वेळ गेलेली नाही सावध व्हा, निसर्ग वाचवा असच ऐकत मोठे  झालो ना आपण?
हिच माणसं, मुलगी झाली तर.. माझी चिऊ म्हणत उराशी कवटाळत असतात ना तीला? मी तर आता असं म्हणेन कि...

    “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा “
       आणि
    “मुलगी वाचवा, समाज वाचवा “

(सर्व जणी एका रेषेत उभ्या राहून प्रेक्षकांना अभिवादन करतात व पडदा पडतो)

 लेखक : शिवाजी सांगळे ©

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा