शुक्रवार, १० जून, २०१६

एक प्रवास आगी सोबत...


एक प्रवास आगी सोबत...

          २६ जलै २००५ च्या महाभयंकर पुरातुन नुकतेच सर्वजण सावरले होते, त्या आठवणी ताज्या असतांनाच पुन्हा तशीच वेळ येते कि काय असा प्रसंग ओढवला...

          घटना, बरोबर १० वर्षा पुर्वीची, ६ सप्टेंबर २००५ ची संध्याकाळची वेळ, मुंबई सी.एस.टी वरून सुटणा-या ५.५५ च्या बदलापूर लोकल मधे आम्ही सर्व ग्रुप मेंबर्स स्थानापन्न झालो. नेहमी प्रमाणे  गाडी सुटल्याबरोबर आमची गाण्याची मैफल सुरू झाली, ज्या मैफलीला डब्यातील परीचित, अपरीचित प्रवाशांकडून उस्फुर्त दाद मिळत होती. आमच्यापैकी बहुतेक सर्वजण चांगले गायक असल्याने एका पेक्षा एक सुरेल गाण्यांची मैफल नेहमीच रंगत असे, गाणी गाता गाता प्रवासातला वेळ कसा जात असे हे अजिबात कळत नसे.
नोकरदारांना कोणत्याही परीस्थितीत घराबाहेर पडावेच लागते, त्या दिवशी सकाळ पासुन सारखा पाऊस पडत होता, आता सुध्दा बाहेर विजांच्या कडकडाटा सह पाऊस ब-यापैकि बरसत होता आणि आत डब्यात एकापेक्षा एक सुर बरसत होते, आमची गीत मैफल उत्तरोत्तर रंगत होती, एक तास दहा मिनिटांचा सी.एस.टी. ते अंबरनाथ हा प्रवास  कसा संपला हे कुणालाच समजले नाही, अंबरनाथ स्टेशनला गाडी नेहमी पेक्षा जरा जास्त वेळ उभी राहिल्याने सर्वाची चुळबुळ सुरू झाली होती, प्रत्येकजण काय झालं असेल याचे आडाखे बांधत होता, बाहेर पाऊस चांगलाच कोसळत असल्यामुळे प्रत्येकाने दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या होत्या त्यामुळे बाहेरची काहीच खबर कळत नव्हती, दरम्यान कशीबशी गाडी सुरू झाली होती.

        ज्या ठिकाणी आम्ही बसायचो तो अकरावा डबा बदलापूरच्या दिशेकडचा प्लँटफाँर्म सोडायचा बाकी होता, पुढील दहा मिनिटात बदलापूरला उतरायचे या विचारात आम्ही सारे असतांना एका झटक्या सोबत जोरदार धमाका झाला, आणि डब्यासह प्लँटफाँर्म वरील सर्व दिवे गेले, सगळीकडे गर्द अंधार झाला आणि आगीचा एक भला मोठा लाल पिवळा लोळ उठला, आगीची तिव्रता एवढी होती कि खिडक्या दरवाजे बंद असतांना सुध्दा बाहेरचा सारा परीसर त्यात उजळुन गलेला आम्हाला दिसला व पापणी लवेस्तोवर पुन्हा मिट्ट काळोख पसरला, क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला, "आपुले मरण पाहीले म्या डोळा" अवस्था झाली होती, पण पुढच्या काही मिनिटातच सावरलो,  कसलाही अंदाज येत नव्हता, बाँम्बस्फोट झालाय कि काय अशी काळीज हादरवणारी शंका मनाला वाटली. इथे डब्यात नुसता गोंधळ, आरडा ओरडा ऐकू येत होता, त्यातच पुन्हा एक आगीचा लोळ दिसला, आमच्या डब्यावर जणु कुणीतरी दिवाळीतला अनार फोडतोय कि काय असाच भास होत होता, भिती मिश्रित आश्चर्य अशी काहीशी अवस्था बाकी मित्रांची सुध्दा झाली होती, बाहेरून कुणीतरी सागितले कि गाडीच्या पेंटोग्राफला आग लागली आहे, त्याचेच स्फोट होत होते, इकडे मनातुन मात्र सगळ्यांचीच पार तरतरली होती.

          काही लोकांनी चालत्या गाडीतुन उडया टाकल्या, कुणी रडू लागले, काय न काय, परंतु आम्ही सारे समंजस पणे वागलो, मनातुन आठवतील त्या देवांचा धावा आम्ही करीत होतो. एकीच बळ काय असतं ते सर्वानी दाखवुन दिल, एकानेही उडी मारण्याची वा पळण्याची घाई केली नाही, महत्वाचं म्हणजे कुणीही पँनिक झाले नाही किंवा तसं कुणी दाखवल नाही, उलट एकदुस-याला धीर देवुन सावरत होते. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, सोबत विजांचा कडकडाट आणि टपावर छोटे छोटे स्फोट सुध्दा.

          वातावरण गंभीर झालं होतं, परंतु प्रत्येकजण खुप धीराने वागला, सर्वप्रथम मोबाईल व छत्र्या बंद करायला सांगीतल्या, कारण बाहेर विजांचा चांगलाच नाच सुरू होता, दरम्यान पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या चुकवत चुकवत आम्ही सारे पुलाच्या सहाय्याने सावकाश प्लँटफाँर्मच्या उलटया बाजुला उतरलो, खरच त्या दिवशी नशिब बलवत्तर म्हणुन आम्ही सारे एका अनर्थातुन बचावलो.

          पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या पासुन दूर जाण्यासाठी आम्ही मानवी साखळी करून उलट चालु लागलो होतो, गाडी पासुन ब-यापैकी अंतरावर असतांना पुन्हा एक धमाका झाला, पुन्हा एक लोळ व ठिणग्या उसळल्या, त्याचा फटका काही लोकांना बसला, कित्तेकांना त्या ठीणग्यांमुळे चटके बसले, कुणाचे कपडे जळाले, गाडीतुन उडया मारल्या मुळे काहीना खरचटले, किरकोळ दुखापती झाल्या. त्या गडबडीत आमच्यातील एकाचे घडयाळ हरवले, याची हळहळ सा-यांनाच लागली होती.

          आम्ही सुखरूप एका टपरीजवळ पोहचलो, चहाची आँर्डर देतांना लक्षात आले कि आमच्यातील एकजण गायब आहे, पुन्हा ग्रुप मधे टेंन्शन वाढले, त्याला फोन लावायचा प्रयत्न केला तर त्याचा फोन बंद लागत होता, दरम्यान लक्षात आले कि विजा चमकत असल्या मुळे त्याने मोबईल बंद ठेवला असणार! कसाबसा चाहा घेतला व पुन्हा टपरीवर भेटायचे ठरवुन दोन दोनच्या गटाने आम्ही त्याला शोधायला निघालो, बराचवेळ शोधुन त्याचा पत्ता नाही लागला, त्या आधी एका दुकानदाराला विनंती करून त्याच्या फोनवरून एक दोघांच्या घरी सुखरूप असल्याचा निरोप दिला व तसा निरोप ग्रुपमधील सर्वांच्या घरी दयायची व्यवस्था केली. पुढे काय करायचे हे ठरवत असतांनाच समोर तो दिसला, प्रत्येकाच्या मनात भयंकर राग, उस्तुकता, आश्चर्य अशा सगळ्या भावना आल्या होत्या. शेवटी त्याने सांगीतले कि "मी घडयाळ शोधायला परत गेलो, बरीच शोधाशोध केल्यावर सापडले", हे घे... म्हणत त्याने घडयाळ समोर केले... तेव्हा मात्र सगळ्यांचा राग गायब झाला.

          येवढया सा-या गोंधळामुळे आधिच घरी जायला खुप उशिर झाला होता, सगळयांना भुका सुध्दा लागल्या होत्या, आमच्या सारखी स्थिती सा-याची झाली होती, प्रत्येकाला घरी जायचे होते, रिक्षा, बस जे वाहन मिळेल त्याने लोक जात होते, अखेरीस खुप मिनतवारी करून आम्ही एका रीक्षावाल्याला बदलापूर पर्यंत आणले व सारे जण आपआपल्या घरी सुखरूप पोहचलो.

         मैत्रीचे बंध कसे असतात हे या प्रसंगातुन दिसले, परस्परांची काळजी घेणं, वेळ प्रसंगी कुठलेही काम स्वतःहुन करणं हे कुणालाच सांगावे लागले नाही. चांगले मित्र भेटायला नशीब लागत, मला भेटलेत असे मित्र, आणखी काय हवं असत जीवनात? खरच आजही आम्हा सर्वांनी तो अतुट धागा जपुन ठेवला आहे.

= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा