शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

स्वप्न गहिवर

स्वप्न गहिवर   

अंधुक प्रकाशी, तलम शुभ्र बिछाईतीवर
ताल सुरांचे भरले,अनोखे अपुर्व स्वयंवर

छेडता एकएक तार, सुडौल तानपुऱ्याची
येऊ लागली मंद स्वर भरती तल्लीनतेची

आसुसलेल्या, ठेवणीतल्या नाजूक ताना 
प्रतिसाद उस्फुर्त देत राहिल्या परस्परांना

घेत देत बेधुंद, स्वर आंदोलने रात्र जगली
नाजूक साजूक स्निग्ध,टपोर फळे फुलली

चढता राग सिंदूरा न् काफ़ी क्षणाक्षणाला
कळेना त्यां, आवरावे कसे कुणी कुणाला

उत्तरोत्तर मैफिल,जशी जशी, रंगू लागली
कोमल रे आरोह अवरोह मारव्यात दंगली

सरता हळूवार, वरवर निशेचा परदा धुसर 
स्मरु लागला,कल्याण थाटी भूपाळी स्वर

सावरले, आवरले, कसेबसे अखंड सूरांना
जमेल का डुंबवणे, गहिवर नेत्रात स्वप्नांना

https://marathikavita.co.in/index.php?topic=52457.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

कोरी पाटी २२०२२०२५ yq ०९:१०:१०

कोरी पाटी

कोरी माझी पाटी रे
काय लिहू मी तीच्यावरी?
खोटेनाटे लिहू कसे!
की, सांगू कथा खरीखुरी?

अनुभवी बोल मांडता
वाटतील बोचरे कुणातरी,
पचवायला सत्य खरे
सज्ज व्हा धैर्य ठेवूनी उरी!

स्वार्थापरी जगती जे
नकोच म्हणतील शेजारी,
बगैर सोबत जगतांना
राहतील ते मनाने आजारी!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

मार्ग २१०२२०२५ yq ०९:२०:१२

मार्ग

प्याला अर्धा भरलेला..
अर्धा रिकामा कुणी म्हणे !
दोन्ही प्रवृत्ती या संसारी
राजरोस दिसती उघडपणे ! 

कुंभस्नाना एक चालतो
घेऊन डोई मातेस श्रावण !
दूजा कोंडून जन्मदात्रीस
दर्शवे मनी वसला रावण !

दिवस रात्र खेळ सृष्टीचा
कारक मनाला होतो खरा ! 
ठेवून भान भल्याबुऱ्याचे
जगण्याचा योग्य मार्ग धरा !

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

वास्तविक ०८०२२०२५ yq १३:१४:४५


वास्तविक

गुलाबानेचं प्रेम व्यक्त होतं का?
प्रेमात ठिक, लग्ना नंतर जमतं का?

कोथिंबीर, मेथीची गरज असते
गुलाबा वाचून खरं काही अडतं का?

नक्कीच, रंगत वाढते संसारात
गुलाब, मोगरा किंवा गजरा दिल्याने,

वास्तविक वाढते गोडी खरोखर
परस्परांवर मनापासून प्रेम केल्याने!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९