गुरुवार, ३१ जुलै, २०२५

स्वातंत्र्य बंधनातले

स्वातंत्र्य बंधनातले

जीव गुदमरत आहे रे, अधांतरी 
व्याप खासा, येण्या जमिनीवरी 

कोणते आकाश येथे, जगण्याचे 
तरीही झुलतोच आहे वाऱ्यावरी 

सारेच व्यर्थ, अवडंबर शाश्वताचे 
कोण नाही, अवलंबून कुणावरी

वाटे मोहक, स्वातंत्र्य बंधनातले 
गुदमरतो श्वास बेतता जीवावरी

खेळ अवघा, विचारांचा एकल्या 
तुटते नाळ,कळते येता भानावरी

https://marathikavita.co.in/index.php?topic=61385.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २७ जुलै, २०२५

बा विठ्ठला

बा विठ्ठला

देवा तुझ्या गाभाऱ्यात हल्ली
पावसाचा होतो थेट अभिषेक,

तुच घ्यावास ठरवून बा आता
कोण खादाड येथे, कोण नेक..!

होता जलाभिषेक डोक्यावरती 
कुंठते भक्ती, भोळ्या भक्तांची,

रिकामी होते तिजोरी बघ कशी 
दुरूस्ती होताना, तुज मंदिराची..!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

भुलावा

भुलावा

"चंचल हे मन माझे" न्
भुलावा हा भवसागर रे
जाईल कुठे प्रवास हा
वेळीच आता तु सावर रे

स्वार्थी मन, दुष्ट कधी
स्व:ता पुढे, का जाईना रे
इथवर येणे,बहू जाहले
योग्य सन्मार्ग तु दाखव रे

मग्न जे अंतरजाली 
वास्तव त्यांसी दावशिल रे
क्षणभंगुर मोह माया
तीतून आता तुच सोडव रे

https://marathikavita.co.in/index.php?topic=60899.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

श्रावण आला

श्रावण आला


श्रावण आला श्रावण आला 
पालवी फुलांचा बहर आला
रांगोळी फुले दारी सजताना
व्रतवैकल्यांचा आनंद आला

श्रावण आला श्रावण आला
माहेरवाशिणींचा सण आला
झिम्मा, फुगडी भोंडल्यासंगे
मंगळागौरीचाही खेळ आला

श्रावण आला श्रावण आला
मंदिरी भजनात जोश आला
आसमंती नवरंग हे उधळता
सुख, आनंदाला बहर आला

https://marathikavita.co.in/index.php?topic=60898.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २२ जुलै, २०२५

कल्पनेच्या तीरावर

कल्पनेच्या तीरावर

कित्येक स्मृतींचा ठेवा, कल्पनेच्या तीरावर 
तेव्हा मात्र मन नादान भिरभिरते वाऱ्यावर 

गोडी म्हणा, खोडी म्हणा, लागतोच चाळा 
इवला जीव हा मग राहतोय कुठे थाऱ्यावर 

डुबकी दर डुबकी आठवत राहते काहीतरी 
पुन्हा विसरते भान न् ताबा कसला मनावर

सगळे खोडकर पाणी ढग मन आणि वारा
आरोप प्रत्यारोप, कुणी, करायचा कुणावर 

विसरतो स्वतःला, डोकावता हळूहळू येथे
विरघळताना प्रतिबिंब हे पारदर्शी जळावर 

https://marathikavita.co.in/index.php?topic=60665.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १६ जुलै, २०२५

काही कळेना

काही कळेना

कचऱ्याच्या डब्याला सोन्याचा भाव
कोण म्हणतो? देश गरीब हाय राव?

स्वस्त घरांच म्हणतात होणार वाटप 
सामान्यांच्या हिताला कोण देई वाव!

"ज्याच्या हाती ससा, तो खरा पारधी"
व्यवस्थेवर घालतो तोच पहिला घाव

भ्रष्टाचार, गुन्ह्याच्या वाढत्या फेऱ्यात
होतयं पहा देशात राज्याचं मोठं नाव?

कुठे चाललोय आपण काही कळेना
स्वतःतच मश्गूल दिसतो जो तो राव!

https://marathikavita.co.in/index.php?topic=60133.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १४ जुलै, २०२५

आहे का वेळ


आहे का वेळ

वाटे आजही मनाला
हाताळावे रोज पुस्तकाला
काहीतरी गडबड होते
आणि राहून जाते वाचायला

कधी व्यवधाने रोजची
म्हणती पाहू मग पुस्तकाला
भुरळ सोशल मीडियाची
अन् मोबाईल आडवतो मला

सांगून गेले आहे कुणीतरी
घडवते ओळ एक आयुष्याला 
तुम्हा आम्हा कळतय सारं 
पण! आहे का वेळ वाचायला?

https://marathikavita.co.in/index.php?topic=59984.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १२ जुलै, २०२५

वीकेंडची सुट्टी

वीकेंडची सुट्टी

निसर्गाचे हे रूप वेगळे
पाहण्यास जातात काही बावळे
पर्वा न करता जीवाची
सेल्फी साठी करती कैक चाळे

मदिरापान अन् गोंगाट
सोबतीला असते हुल्लडबाजी
धाक न जुमानता काही
करतात हवं ते त्यांची मनमर्जी

निसर्गाचे रूप दाखवणे?
येथे, स्टेटस करता जो तो हट्टी
संवर्धन कसले निसर्गाचे
लेखी तयांच्या वीकेंडची सुट्टी

https://marathikavita.co.in/index.php?topic=59908.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ६ जुलै, २०२५

तु विठ्ठला


तु विठ्ठला

काय सांगू दिसतोस, कुठे कुणा तु विठ्ठला
कष्टणाऱ्यांच्या हातातील कष्टात तु विठ्ठला

सावळ्या नभात तु, न् कोसळत्या धारेत तु 
मातीत तु,पिकात भरल्या शेतात तु विठ्ठला

कपाळी नामात तु, अबीर गुलाल रंगात तु 
वाऱ्यावर फडकणात्या, ध्वजात तु विठ्ठला

टाळात तु, मृदंगात तु, डोईवर तुळशीत तु 
वारीमध्ये चालणाऱ्यां, पावलात तु विठ्ठला

नाम्याच्या पायरीत तु राऊळी कळसात तु
फिरता मागे,भक्तांच्या डोळ्यात तु विठ्ठला

https://marathikavita.co.in/index.php?topic=59301.new#new


©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९