रविवार, २५ जून, २०१७

माझी चूक झाली

माझी चूक झाली

घेतला जो पेट नाती खाक झाली
आज माझ्या भावनेची राख झाली

आज त्यांनी ती हत्यारे म्यान केली
ऐकलेली बातमी ती फेक झाली

वार माझ्या काल ते पाठीत झाले        
माणसे गद्दार ही का थोक झाली?

टाकले होते तयांनी घाव जेंव्हा
कापणारी ती हत्यारे नेक झाली

सोसले मी वार त्यांनी घाव केले
एवढी बाजू जमेची एक झाली

वाटते माझीच सारी भूल होती
पाळताे मी मौन माझी चूक झाली

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28895/new/#new

शनिवार, २४ जून, २०१७

हायकू

#हायकू ७२
टिपते क्षण
करविते दर्शन
हायकू काव्य २४.०६.२०१७

#हायकू ७१
सावळा मेघ
वाहतो पारदर्शि
सरीं मधून २३.०६.२०१७

#हायकू ७०
गडगडाट
विजा लखलखाट
सरी सैैराट २३.०६.२०१७

शुक्रवार, २३ जून, २०१७

पेल्यात नशील्या

पेल्यात नशील्या

मौनात सागराच्या पाताळ व्यापलेले
नेत्रात कोणते या आभाळ  दाटलेले

डोळे  सरोवरी हे  घे सावरून त्यांना
जातील बावरूनी  घायाळ जाहलेले

पेल्यात या नशील्या सारेच धुंद होते
बेहोश  होत  गेले ते  लाळ  घोटलेले

सारी कथा कहानी ती वेगळीच होती
साक्षात भोगले मी ते काळ भारलेले

सोडून पाश माझे दे मोकळे करूनी
मौनात ठेव बाकी आभाळ गोठलेले

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28886/new/#new

गुरुवार, २२ जून, २०१७

हायकू

६९
रानात गर्द
शृंगारतो पाऊस
ओल सर्वत्र  २२.०६.२०१७

६८
पाऊस धारा
कोसळती वरून
सूर लयीत

६७
ओढ घेतली
आताच  पावसाने
लोकां प्रतिक्षा २१.०६.२०१७

यंदा पांडुरंगा


यंदा पांडुरंगा

देवाजीस प्रिय, भक्त सान थोर
नाही अवडंबर, जातपात !!

भक्तांनी फुलतो, चंद्रभागा तीर
पाहण्या ईश्वर, विटेवरी !!

परस्परामधे, पाहता ईश्वर
सुख हे अपार, जाणवते !!

पाहता एकदा, तृप्त हो नजर
सावळं साजिरं, विठ्ठलाते !!

यंदा पांडुरंगा, कर उपकार
द्यावे भरपूर, पिक पाणी !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t28861/new/#new

नजर अन् हास्य भेट

नजर अन् हास्य भेट

डोळ्यात जेंव्हा सांज उतरते, मन उगाच हळवं होउ लागतं, कातर वेळ तीलाच म्हणतात ना?
आधीच पाणीदार असलेले डोळे वेगळेच भासु लागतात, अनेक गतस्मृतीना मौनात आठवू लागतात, शुन्यात शोधु लागतात, खरं तर सार्‍या दुःखाच्या, विरहाच्या, आत लपलेल्या नाजुक, मुक्या भावनांच्या.

अलगद उलगडू लागतो मग एक एक कप्पा अतंरातला, शोधू लागतो स्वतःची जागा. कुठे काय चुकलं याची गणितं करू लागतो, बराच उहापोह करूनही हाती काहिच लागत नाही, मग कधी उगाच वाळूवर रेघोट्या ओढीत बसतं मन. उभ्या आडव्या रेघा मारून काही काळ वाळू सरकते अन् हळूच नकळत पुन्हा जागेवर येते. आलेली लाट परत माघारी जाते तशी.

असचं असतं का आयुष्य आपलं? प्रश्न मनाला पडतो, पुन्हा तेच चक्र सुरू होत. पायाखाली केव्हा पाण्याचा थंड स्पर्श होतो ते सुध्दा कळत नाही. मग आवरतं घेतो स्वतःला, उठून आजू बाजूला पाहतो, तर काय येथे प्रत्येक जण असाच स्वतःला शोधायला आलेला.

चंद्रभागेच्या वाळवंटात आणि यात काहीच फरक उरत नाही. तीथे परस्परांचे चरण स्पर्श, गळा भेट होते, पांडुरंगाच्या शोधात, तर इथे हलकी नजर अन् हास्य भेट आपल्यातले आपण सापडलो म्हणून.

=शिवाजी सांगळे  २१.०६.२०१७

बुधवार, २१ जून, २०१७

शेर

शेर

असे ही आजकाल शेर दुर्मिळ झाले,
खुशी आहे, तुम्हाकडे दोन शेर आले !
=शिव
128/20-06-2017

वहिवाट

वहिवाट ...

काटेरी वाटेची तशी जुनीच वहिवाट आहे,
तरी मनात बहरणारा गुलमोहर खास आहे!
=शिव
129/20-06-2017

हायकू

#हायकू ६६
चमके विज
रिपरिप पाऊस
छत्री आधार २०.०६.२०१७

#हायकू ६५
पाऊस शांत
ठिबकणे थेंबाचे
पाने हलकी

#हायकू ६४
अखंड धारा
नदीला भला जोर
गाव ते दूर १९.०६.२०१७

मंगळवार, २० जून, २०१७

हायकू

#हायकू ६३
पावसा नंतर
ओलेत्या वाटेवर
पाऊल खुणा १९.०६.२०१७

#हायकू ६२
प्रभात वेळ
पाऊस पाणी तळं
पाखरू स्नान

#हायकू ६१
मनात सेव्ह
हार्ड डिस्क मधला
प्रियेचा फोटो