कधीकाळी आपला महाराष्ट्र, इतिहास जपणारा, परंपरा पाळणारा होता असं म्हणावसं वाटतं आता, कारण बऱ्याच वर्षांनी परवा दिनांक १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या मध्यवर्ती भागात जुन्या शासकीय विश्राम गृह व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात असलेला शिवकालीन ठेवा म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठा व्यास असलेली तसेच बारा महिने गोड्या पाण्याचा भरपूर पाणीसाठा व खास करून पाण्या पर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या असलेली #शिवकालीन_ऐतिहासिक_घोडेबाव_विहीर
पाहण्यासाठी गेलो, वाटलं होतं कि तीची अवस्था ठिकठाक असेल, परंतू विहीरीची दुरावस्था पाहिल्यावर पुरता भ्रमनिरास झाला. विहिरीत आता खूप मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेला आहे तसेच चौफेर झाडी वाढल्याने विहिर भकास दिसते.
शेजारच्याच गोवा राज्यातील काही ऐतिहासिक स्थळं पाहिल्यावर मनात त्यांची नकळत तुलना होउ लागते, मात्र आपल्या कडील या व ईतर बहुतेक ऐतिहासिक स्थळांचा विचार करता खूप वाईट वाटतं. ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीकडे प्रशासना कडून होत असलेले दुर्लक्ष आणि उत्साही पर्यटकांकडून होणारे विद्रुपीकरण सुद्धा नाकारता येणार नाही.
प्रशासनाच्या संबंधित विभागाने व पर्यटकांनी गंभीरपणे विचार करून आपला ऐतिहासिक वारसा जपायला हवा व येणाऱ्या पिढीसाठी आपल्या थोर व आदर्श इतिहासाच्या खुणा जपाव्यात येवढीच माफक अपेक्षा.
© शिवाजी सांगळे
संपर्क:९५४५९७६५८९