सगळे म्हातारे
म्हातारे असं कसं करतात?
सकाळीच लवकर उठून बसतात
टाकलाय का हो चहा कुणी?
रँन्डमली उगाच विचारून पाहतात !
न् चहा घेता घेता चवीने
उगा काहीबाही चौकश्या करतात
अडल्या नडल्या गोष्टींवर
न मागता आपणहून मतही देतात !
फिरता फिरता घरभर
इतस्ततः पडलेल्या वस्तूंशी बोलतात
नुसते बोलतच नाहीत
पुन्हा त्यांना,त्यांच्या जागेवर ठेवतात !
नाष्ट्या सोबत, पेपरही उरकतो
न् काही बातम्यांवर लेक्चर ठोकतात
मधेच काहीतरी वाचता वाचता
स्वतःमधे स्वतःच का हरवून बसतात?
आठवण करता सहज कुणी
आपोआप आपणहून भानावर येतात
तसं दूसरं काही काम नसता
पोथी किंवा मोबाईल घेऊन बसतात !
नातवंडांसह खेळ खेळतानां
लहान होत त्यांच्याशी भांडणं करतात
दटावता म्हातारीने हळूच कधी
मग लटक्या रागाने रूसूनही बसतात !
गंभीर चर्चेत एखाद्या दुपारी
अनुभवांच्या चार गोष्टी ऐकवतात
पोराबाळांनी मानलं तर ठिक
नाहीतर गपगुमान शांतपणे बसतात !
संध्याकाळी ते मात्र, हमखास
आठवून काही हळवे, कातर होतात
म्हातारीशी सावकाश बोलताना
गुपचुप स्वतःचे डोळे टिपून घेतात !
काहीतरी पुटपुटत स्वतःशी
मनात कसलीतरी उजळणी करतात
अगदीच नाही काही सुचलं
तर पोथी घेऊन हाती एकांती बसतात !
वयोपरत्वे आल्या आजारांची
दागिने आहेत म्हणून टर उडवतात
चालते फिरते असले तरी
कधी कधी जास्त चिडचिड करतात !
रात्रीचं जेवण, गोळ्या, औषध
मात्र न चुकता, आपणहून स्वतः घेतात
उद्या पुन्हा कामं आहेत म्हणता
डोळे मिटून अंथरूणात जागेच राहतात !
नेहमीच प्रश्न पडतो मला
सगळे म्हातारे असं काय करतात?
कदाचित वाढत्या वयाशी
कर्तव्याचा गुणाकार का मांडतात ?
https://marathikavita.co.in/index.php?topic=54446.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९