बुधवार, २० मार्च, २०१९

दे रे थोड तरी पाणी (गवळण)

हल्ली सर्वत्र झपाट्याने शहरीकरण होत आहे, बऱ्याच ठिकाणी नियोजन करून सुद्धा पाणी पुरवठ्याची समस्या दूर करणे तसे सर्वच यंत्रणाना कठीण दिसते, तशात आता उन्हाळा सुरू झालाय, आणि दिवसेंदिवस हि समस्या वाढतच जाणार. "या अडचणी बद्दल काही तरी विडंबनात्मक लिहा" मित्राच्या या विनंती वरून दिवंगत जेष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या "दे रे कान्हा" या गवळणीचे पुढील प्रातिनिधिक विडंबन सुचले.
(जगदीश खेबुडकरांची सविनय क्षमा मागून)

दे रे थोड तरी पाणी (गवळण)

अहो ऐका जनहो तहाणल्यांची कहाणी
भुलवली जनता नुसत्याच आश्वासनांनी

स्वस्त मिळती घरे म्हणूनी लोक येथे आले
काढून कर्ज स्वतंत्र राहण्या बघा लोक आले
धक्काबुक्की प्रवास वाढला हाल खूप झाले
वेळ अपुरा न् खर्च वाढला ताण सोसते झाले

नसता पाणी अपेक्षा भंग
नवीन फ्लॅटमधे होता दंग
चर्चेत केवळ सगळेच दंग
दिसू लागले प्रभागीय रंग

येतो थकूनी लोकल मधूनी रोज चाकरमानी
दे रे नेत्या, दे रे थोड तरी पाणी

धुणीभांडी कपड्यां साठी
लावावी लागे नळासी तोटी
दिवसा रात्री उशिरापर्यंत प्रत्येका गरज पाणी

ऐन उन्हाळी तक्रार न्यारी
हर एक आणतो तुम्हा दारी
काकुळतीने पुन्हा करीतो आर्जवे विनवणी

वाढविल्या येथे तुम्ही इमारती
भरमसाठ ती झाली हो वस्ती
अपुऱ्या साठ्या मधूनी सर्वां कसे पुरावे पाणी

हात जोडोनि हीच विनवणी
टँकर भरुनी वाटावे त्वा पाणी
मतांसाठी तेव्हाच यावे नंतर नव्या इलेक्शनी

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/()-31590/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा