शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

हायकू १३०-१३२

#हायकू १३२

आनंद ठेवा
श्रावण मास आला
खेड्या पाड्यात ०३-०८-२०१७

#हायकू १३१
जळात छबी
भास आभास खेळ
प्रतिबिंब ते ०२-०८-२०१७

#हायकू १३०
श्यामल काळे
भावनांचे उमाळे
मेघ दाटले ०२-०८-२०१७

नको जीवना रे


नको जीवना रे

पहातोय सारा  तुझा डाव आता
कशा दावतो रे फुका भाव आता

पुरे आज  येथे  हि  खैरात सारी
उगा वाटतो ती तु मोकार आता

करा  माफ सारी  उधारी बळींची
तयारीत घेण्या गळा फास आता

सुरुवात माझी  जगायास झाली
नको जीवना रे  भिती दावु आता

धरावा सखे गं  कशाला अबोला
सुटे काळजाचा  इथे  धीर आता

कुणी  गोंदलेला  ठसा पावलाचा
कसे ते कळावे किनाऱ्यास आता

जळानेच माशा  असे  चिंब केले
भिजावेच त्याने  असे कर्म आता

नशा का चढावी  न  घेता जराही
तपासून आलो जरा स्टाँक आता

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29220/new/#new

सोमवार, ३१ जुलै, २०१७

हायकू १२७-१२९

#हायकू १२९
मनाचा तळ
शून्यात फिरणारा
न दिसणारा ३१-०७-२०१७

#हायकू १२८
रात्र काळोखी
छता थेंबाचा मारा
संतत धारा ३१-०७-२०१७

#हायकू १२७


शनिवार, २९ जुलै, २०१७

हायकू १२४-१२६

#हायकू १२६
सजला मळा
हिरव्या अंकुरांचा
रानात आता २९-०७-२०१७

#हायकू १२५
उन सावली
मधेच ये पाऊस
श्रावण मास २८-०७-२०१७

#हायकू १२४
किरण पडे
चमके दव थेंब
भास बिलोरी २७-०७-२०१७

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

ढंग आगळे


ढंग आगळे

तुझ्या आठवांचे ऋतू कोवळे
जगतो एकटा क्षणांचे सोहळे

गुंतुनी गुंत्यात मी असा गुंततो
होता नाही आले मला मोकळे

ढग कित्येक झाले होते गोळा
नच बरसले त्यांचे ढंग आगळे

कामी ना येती कुणी कार्याला
करण्या टिका जमतात कावळे

दाखले काय दिले कंपुबाजांनी
झाले आरोपी शिक्षेतून मोकळे

पुजीले जयां ठेवून भाव भोळा
निपजले जोडीने ढवळे पोवळे

गेले कित्येक कोरडे पावसाळे
भासू लागले प्रिय पहा उन्हाळे

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29166/new/#new

बुधवार, २६ जुलै, २०१७

विसरून गेली



विसरून गेली

डोळ्यात स्वप्ने कोणती देवून गेली
काळजात माझ्या घर करून गेली

चेतवून शब्द याग मज मनात येथे
लिहिण्याचे असे वेड लावून गेली

स्पंदने ह्रदयाची गातात तीच गीते
सांज किनारी तु जी शिकवून गेली

विस्मरावी मी कशी ती सारी स्वप्ने
पाहिलेली आपण जी सोडून गेली

मोगरा गंधवेडा केसात माळलेला
वहीत माझ्या कसा विसरून गेली

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t29147/new/#new

तुम्ही गणनायक

तुम्ही गणनायक

मंगल मुर्ती तुम्ही गणनायक
लंबोदर तुम्ही वरद विनायक
तुम्हीच एक भक्ताला पावक
वक्रतुंड तुम्ही सिध्दी विनायक ।।धृ।।

मुर्ती तुझी रे आम्ही स्मरावी
स्तुती तुझी न् किती करावी
एकदंता तुझी कृपा रहावी
दु:ख दारिद्रय ते सारे हरवून
व्हावे आमुचे तुम्हीच तारक।।१।।

मंगल मुर्ती तुम्ही गणनायक
लंबोदर तुम्ही वरद विनायक।।धृ।।

विद्या पती तुम्ही कलाधीपती
सेनापती थोर तुम्ही बुद्धीपती
सुखदाता विघ्नहर्ता यशपती
युध्दकला निपुण चतुर योध्दा
अजोड तुम्ही दैत्य संहारक।।२।।

मंगल मुर्ती तुम्ही गणनायक
लंबोदर तुम्ही वरद विनायक।।धृ।।

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t29143/new/#new

हायकू १२१-१२३

#हायकू १२३


#हायकू १२२
रात्र झुलवी
ते स्वप्नांचे हिंदोळे
तुझे न् माझे २६-०७-२०१७

#हायकू १२१


सोमवार, २४ जुलै, २०१७

प्रथम वंदिता

प्रथम वंदिता

विनवणी तुजला प्रथम वंदिता
तूच गणपती आम्हा विघ्नहर्ता
शरण तुजला आम्ही आलो आता
तूच गणपती आम्हा विघ्नहर्ता।।धृ।।

शक्ती अर्पितो,भक्तीला पावतो
भक्तांच्या हाकेस, धावूनी येतो
तुंदिल तनु तू बुद्धीची देवता।।१।।

विनवणी तुजला प्रथम वंदिता
तूच गणपती आम्हा विघ्नहर्ता।।धृ।।

अनेक रूपात, बाप्पा तूच येतो
भक्त जनांसी, नेहमी दर्शन देतो
लाडका कृपाळु, भक्तांचा त्राता।।२।।

विनवणी तुजला प्रथम वंदिता
तूच गणपती आम्हा विघ्नहर्ता।।धृ।।

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t29132/msg68940/#msg68940