गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

शोध... स्वतःतल्या "स्व" चा

शोध...
स्वतःतल्या "स्व" चा

पसारा गोंधळल्या मनाचा
कसा सावरावा, कसा आवरावा ?
उडणार्‍या पाखराचे पंख
जेव्हा आपलेच वाटू लागतात
मग उडू लागतं, भरारी घेऊन मन,
स्वच्छंद... मोकळ्या पोकळीत...
कधी समाधी अवस्थेत,
तर कधी बधिर स्थितीत...!
कोणती अवस्था खरी...?
भानावर येते घंटेच्या स्वराने
कि तल्लीन होते कधी...पेटीच्या सुरांनी?
अगणित कोड्यांच्या, कोषात,
जोड्यांत गुंफलेलं, फुल पाखरू
सोडू पाहतं कोषाला कधी?
तरी गुंतत राहतं, एकसुरी... अल्पजीवी...
कृष्णविवरात या, "स्व" दिसत नाही,
कधी स्वतःतला, ऐकू येत नाही...
आवाज आतला...
कळूनही गीतेचा अर्थ,
गुरफटत राहतो व्यर्थ !
ऐकून सुध्दा...
ज्ञानोबाची, तुकोबाची, एखादी ओवी...!
कणा कणांनी बनलेल्या
गोळ्याला जोजवलं जातं
अलवारपणे रूजवलं जातं
कालांतराने शरीर मोकळेे होतं...
मन पुन्हा उंचउडू पाहतं,
आभाळाला गवसणी घालायला,
हरवलेल्या "स्व" शोधायला,
अविरत चक्रात फिरायला,
चौर्‍याऐंशी कोटी, कुणी म्हणे दोन?
कोणास ठाऊक? खरं खोटं...
हाच प्रश्न फिरत ठेवतो मनाला,
अनंत काळ शोधायला...
काळ शोधायला...अनंत...अनंत

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/''-25781/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा