गुरुवार, २९ जून, २०१७

स्वप्नांनाे

स्वप्नांनाे

मेघांवर स्वार होतो मी
पाऊस मिठीत घेतो मी

ऐकून दुख:, सुखाचे ते              
सोडून खुशाल देतो मी

थांबून रहाच स्वप्नांनाे
घेण्यास कवेत येतो मी

माझाच हट्ट कशा साठी
सोडून अहंम जातो मी

झालेत शब्द लिहूनी जे
बांधून सुरात गातो मी

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28926/new/#new

हायकू

#हायकू ८४
नभ दाटले
अंधारून ते आले
मन व्याकूळ २९.०६.२०१७

#हायकू ८३
रित आभाळ
वाहून गेले जळ
जरा उसंत २९.०६.२०१७

#हायकू ८२
उन पाऊस
उधळतात रंग
रत्न खड्यांचे २९.०६.२०१७

हायकू

#हायकू ८१
पाऊस वर्षा
हिरवीगार धरा
शृंगार नवा २८.०६.२०१७

#हायकू ८०
थोड्यात सांग
जरा कोड्यात सांग
एैक हायकू २७.०६.२०१७

#हायकू ७९
गुंजते शीळ
पाखराचा हाकारा
सावध प्राणी २७.०६.२०१७

बुधवार, २८ जून, २०१७

ऐक ना


मन माझे


जे रास्त आहे

जे रास्त आहे

हर एक येथला जरा जरा व्यस्त आहे
जगण्या पेक्षा मरण थोडे स्वस्त आहे

विचारता खुशाली तुम्ही ती कुणाला
सांगेल लगेच मी पण जरा त्रस्त आहे

करतो चौकिदार निवांत आराम येथे
घालतो मालक स्वरक्षणा गस्त आहे

पैसाच गरजेला पुरेना करून नोकरी
चोर सफेदपोश येथे मात्र मस्त आहे

करूनी आत्महत्या जातो बळी येथला
ऐकुन सुध्दा हाकारे यंत्रणा सुस्त आहे

उद्याचे आम्ही करतो तयार हमाल येथे
वाहण्या ओझे दप्तरांचे जे जास्त आहे

लिहिणे का हे गैर काही वाटते येथले?
वाटले म्हणुन सांगे शिव जे रास्त आहे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28920/new/#new

सोमवार, २६ जून, २०१७

हायकू

#हायकू ७८
एकच सर
देणं हे निसर्गाचं
पाचूंचा माळ २६.०६.२०१७            

#हायकू ७७
न्हाउन गेले
वृक्ष अन् कातळ
स्वच्छ जाहले २६.०६.२०१७

#हायकू ७६
मनात भाव
ओसंडतात शब्द
बांधे हायकू २६.०६.२०१७

हायकू

#हायकू ७५
शब्दांचा संग
हायकूचं निर्माण
आशयानंद २५.०६.२०१७

#हायकू ७४
तो धारावाहि
सारा शब्द समुह
हायकू होतो २४.०६.२०१७

#हायकू ७३
तीन ओळीत
व्यक्त करी हायकू
प्रभावी अर्थ २४.०६.२०१७

आठवतं !

आठवतं !

ढगांच्या गडगडाटांसह पागोळ्यातून पडणार्‍या पाऊस धारांचा कमी जास्त होत जाणारा लयबद्ध आवाज कानावर येत होता, मधेच वाट चूकलेल्या विजांची पळापळ खिडकीच्या काचेतून स्पष्टपणे अधोरेखीत होत होती. मध्यरात्र तशी उलटून गेलेली, पण आज डोळा लागत नव्हता. एक तर पावसाच्या धारांचा, गडगडाटाचा आवाज का कुणास ठावुक मनाला स्थिर होवु देत नव्हता.

अशा अवस्थेत विनाकारण मन फार मागे मागे जावु लागतं, नको इतक्या कुणाच्या तरी जवळ जावु पाहतं. सदमा चित्रपटातील एका दृष्यातील छतावरून, कौलांवरून ओघळणार्‍या पाण्याशी खेळणारी अल्लड, स्वतःत आकंठ हरवलेली श्रीदेवी आठवते? आणि आठवतो तीच्यावर जीवापाड जीव लावणारा कमल हसन? आठवतं! आपल्यात पण असा कुणीतरी एक असतो, जिव्हाळा जपणारा, काळजी घेत हळूवार प्रेम करणारा, आपण सुध्दा एकटेपणात शोधु लागतो त्याला, पण नाही सापडत तो, तो तर पार हरवलेला असतो डोंगराच्या कपारीवरून दूर पर्यंत दिसणार्‍या धुक्याच्या चादरी पल्याड, जाणवुन देत असतो स्वतःचं पुसटसं अस्तित्व. आजुबाजुला झाडं पण चिंब होवुन दव कुरवाळत उभी असतात, गवत फुलं दवाच्या ओझ्यानं मात्र वाकुन गेलेली, हळूहळू धुकं विरळ होवु लागतं, आपण चौकस पणे त्याचा शोध घेत असतो, मात्र तो कुठे गायब होतो ते समजत नाही.

त्याच नशेत वास्तव उजाडतं, वातावरणात अंधार तसाच भरून असतो, आता छतावर उरलेले पाऊस थेंब स्वतःला निथळत असतात, त्यांच्या पडण्याच्या कमी होत जाणार्‍या आवाजा सोबत एकाद पहाट पक्षाचा आवाज येतो आणि रस्त्यावर आँटो वगैरे वाहनांची चलती सुरू झालेली असते. रात्रभर शिणलेल्या मनाचा प्रवास हळू हळू संपवत, आळस देवुन स्वतःला ताजं करायचा प्रयत्न सुरू होतो, आजुबाजुला, शेजारी कुणीच नसतं, तेव्हा पाऊस पार थांबलेला असतो.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919545976589 Email:sangle.su@gmail.com
http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-28903/new/#new

रविवार, २५ जून, २०१७

माझी चूक झाली

माझी चूक झाली

घेतला जो पेट नाती खाक झाली
आज माझ्या भावनेची राख झाली

आज त्यांनी ती हत्यारे म्यान केली
ऐकलेली बातमी ती फेक झाली

वार माझ्या काल ते पाठीत झाले        
माणसे गद्दार ही का थोक झाली?

टाकले होते तयांनी घाव जेंव्हा
कापणारी ती हत्यारे नेक झाली

सोसले मी वार त्यांनी घाव केले
एवढी बाजू जमेची एक झाली

वाटते माझीच सारी भूल होती
पाळताे मी मौन माझी चूक झाली

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28895/new/#new

शनिवार, २४ जून, २०१७

हायकू

#हायकू ७२
टिपते क्षण
करविते दर्शन
हायकू काव्य २४.०६.२०१७

#हायकू ७१
सावळा मेघ
वाहतो पारदर्शि
सरीं मधून २३.०६.२०१७

#हायकू ७०
गडगडाट
विजा लखलखाट
सरी सैैराट २३.०६.२०१७

शुक्रवार, २३ जून, २०१७

पेल्यात नशील्या

पेल्यात नशील्या

मौनात सागराच्या पाताळ व्यापलेले
नेत्रात कोणते या आभाळ  दाटलेले

डोळे  सरोवरी हे  घे सावरून त्यांना
जातील बावरूनी  घायाळ जाहलेले

पेल्यात या नशील्या सारेच धुंद होते
बेहोश  होत  गेले ते  लाळ  घोटलेले

सारी कथा कहानी ती वेगळीच होती
साक्षात भोगले मी ते काळ भारलेले

सोडून पाश माझे दे मोकळे करूनी
मौनात ठेव बाकी आभाळ गोठलेले

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28886/new/#new

गुरुवार, २२ जून, २०१७

हायकू

६९
रानात गर्द
शृंगारतो पाऊस
ओल सर्वत्र  २२.०६.२०१७

६८
पाऊस धारा
कोसळती वरून
सूर लयीत

६७
ओढ घेतली
आताच  पावसाने
लोकां प्रतिक्षा २१.०६.२०१७

यंदा पांडुरंगा


यंदा पांडुरंगा

देवाजीस प्रिय, भक्त सान थोर
नाही अवडंबर, जातपात !!

भक्तांनी फुलतो, चंद्रभागा तीर
पाहण्या ईश्वर, विटेवरी !!

परस्परामधे, पाहता ईश्वर
सुख हे अपार, जाणवते !!

पाहता एकदा, तृप्त हो नजर
सावळं साजिरं, विठ्ठलाते !!

यंदा पांडुरंगा, कर उपकार
द्यावे भरपूर, पिक पाणी !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t28861/new/#new

नजर अन् हास्य भेट

नजर अन् हास्य भेट

डोळ्यात जेंव्हा सांज उतरते, मन उगाच हळवं होउ लागतं, कातर वेळ तीलाच म्हणतात ना?
आधीच पाणीदार असलेले डोळे वेगळेच भासु लागतात, अनेक गतस्मृतीना मौनात आठवू लागतात, शुन्यात शोधु लागतात, खरं तर सार्‍या दुःखाच्या, विरहाच्या, आत लपलेल्या नाजुक, मुक्या भावनांच्या.

अलगद उलगडू लागतो मग एक एक कप्पा अतंरातला, शोधू लागतो स्वतःची जागा. कुठे काय चुकलं याची गणितं करू लागतो, बराच उहापोह करूनही हाती काहिच लागत नाही, मग कधी उगाच वाळूवर रेघोट्या ओढीत बसतं मन. उभ्या आडव्या रेघा मारून काही काळ वाळू सरकते अन् हळूच नकळत पुन्हा जागेवर येते. आलेली लाट परत माघारी जाते तशी.

असचं असतं का आयुष्य आपलं? प्रश्न मनाला पडतो, पुन्हा तेच चक्र सुरू होत. पायाखाली केव्हा पाण्याचा थंड स्पर्श होतो ते सुध्दा कळत नाही. मग आवरतं घेतो स्वतःला, उठून आजू बाजूला पाहतो, तर काय येथे प्रत्येक जण असाच स्वतःला शोधायला आलेला.

चंद्रभागेच्या वाळवंटात आणि यात काहीच फरक उरत नाही. तीथे परस्परांचे चरण स्पर्श, गळा भेट होते, पांडुरंगाच्या शोधात, तर इथे हलकी नजर अन् हास्य भेट आपल्यातले आपण सापडलो म्हणून.

=शिवाजी सांगळे  २१.०६.२०१७

बुधवार, २१ जून, २०१७

शेर

शेर

असे ही आजकाल शेर दुर्मिळ झाले,
खुशी आहे, तुम्हाकडे दोन शेर आले !
=शिव
128/20-06-2017

वहिवाट

वहिवाट ...

काटेरी वाटेची तशी जुनीच वहिवाट आहे,
तरी मनात बहरणारा गुलमोहर खास आहे!
=शिव
129/20-06-2017

हायकू

#हायकू ६६
चमके विज
रिपरिप पाऊस
छत्री आधार २०.०६.२०१७

#हायकू ६५
पाऊस शांत
ठिबकणे थेंबाचे
पाने हलकी

#हायकू ६४
अखंड धारा
नदीला भला जोर
गाव ते दूर १९.०६.२०१७

मंगळवार, २० जून, २०१७

हायकू

#हायकू ६३
पावसा नंतर
ओलेत्या वाटेवर
पाऊल खुणा १९.०६.२०१७

#हायकू ६२
प्रभात वेळ
पाऊस पाणी तळं
पाखरू स्नान

#हायकू ६१
मनात सेव्ह
हार्ड डिस्क मधला
प्रियेचा फोटो

हायकू

#हायकू ६०
वर्षागमन
अमृतचं शिंपण
धरणी तृप्त १९.०६.२०१७

#हायकू ५९
पाऊस येणं
चारा, फुले आंदण
सारा आनंद

#हायकू ५८
सुर्यागमन
पाऊस दहिवर
इंद्रधनुष्य

हायकू

#हायकू ५७
सृष्टी बहर
पावसाचा वावर
पाचू पदर १९.०६.२०१७

#हायकू ५६
हवा ओलेती
ॠतु हा पावसाळी
पातं कोवळी

#हायकू ५५
पाऊस धारा
पागोळीत हि गर्दि
थेंबांची रांग १८.०६.२०१७

धीर

धीर

यावे पावसाने आता
झाले मन हे अधिर,
सोसवेना हा उकाडा
कुठवर धरावा धीर?
=शिव
405/20-06-2017

पाझर

पाझर

आठवणींचा पहा
कसा मौसम आला,
बघता बघता इथे
दगडा पाझर फुटला !
=शिव
404/19-06-2017

सोमवार, १९ जून, २०१७

हायकू

#हायकू
पाऊस धारा
पागोळीत हि गर्दि
थेंबांची रांग

#हायकू
आला पाऊस
पाणी पाणी सर्वत्र
सारे भिजले

#हायकू
नभ दाटले
झाकोळला तपन
सावली पडे

हायकू

#हायकू
मुक्त निसर्ग
चंद्र, सुर्य न् तारे
प्रेमात भेट

#हायकू
तांबड झालं
उठला दिवाकर
डौलते सृष्टी

#हायकू
गर्दि रात्रीस
चम चम आभाळी  
तुटला तारा

रविवार, १८ जून, २०१७

हायकू

#हायकू

काळोख गर्द
रात्री लपताे चंद्र
कृष्ण पक्ष

#हायकू

खेळती नभी
सुर्य, चंद्र, तारका
तो लपंडाव

#हायकू

टिपते दाणे
चिमणी अंगणात
मी आनंदात 

हायकू

#हायकू
वार्‍याचे गीत
हो चांदण्यांचे नृत्य
धुंद एकांत

#हायकू
सजे अंबरी
तारकांचा गं मेळा
चंद्र तो भोळा

#हायकू
तो उगवला
घेत सहस्त्र कर
देतो जीवन

गुरुवार, १५ जून, २०१७

हायकू

#हायकू

उजळे दिशा
रंगाची उधळण
ढगांचा खेळ

जाणताे संवेदना

जाणताे संवेदना

गंधल्या फूलास काही ज्ञात नाही
न्यायचे गंधा कुठे माहीत नाही !

दूरच्या शोधू नका काही निशाण्या
तेथल्या वाटेस कोणी जात नाही !

जीवना मी ठेवले सार्‍यां समोरी
दूसरे काहीच बाकी आत नाही !

आज मी गावात माझ्या काय गेलो
बोलण्या कोणास तेथे वेळ नाही !

जाणताे संवेदना सांगू कुणाला
वेदनेचा त्रास आता होत नाही !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28831/new/#new

बुधवार, १४ जून, २०१७

हायकू

#हायकू
विज लकाके
उजळे आसमंत
क्षणात शांत
           #हायकू
फूल फूलले
वार्‍यावर डोलले
पाखरू आले
                        
#हायकू
मेघ थांबले
पुन्हा पाऊस आला
भिजविण्यास

#हायकू
झाडावरची
परतली पाखरे
सुटली शाळा

नजर बंदि


असचं होतं

असचं होतं

नेहमी हे असचं होतं
पावसाच्या सरी साठी,
न् पहायची असते वाट
तूझ्या एका नजरे साठी !
=शिव
402/14-06-2017

एक निरीक्षण

(एक निरीक्षण)

फँशनची न् दुनिया न्यारी
उघडं वाघडं राहते नारी,
पुरूष मात्र त्याच जगती
घालतो अंगी कापडं सारी !
=शिव
 401/13-06-2017

मंगळवार, १३ जून, २०१७

ओल

ओल
पहाट वारा अन्
ओल दवाची,
सांगती कहाणी
रोज प्रेमाची !
=शिव
400/13-06-2017

सोमवार, १२ जून, २०१७

हायकू

#हायकू
वृक्ष कोरतो
निसर्गाचा सुतार
हा कारागिर


#हायकू
सुर मारूनी
वेधतो हा शिकार
रंगीत खंड्या

#हायकू
पाऊस आला
तृप्त चातक पक्षी
प्राशुन जल

#हायकू

मोर नाचतो
इंद्रधनु सजतो    
रंग पंचमी

ती परी

ती परी

सिग्न्ध तलम कांती
रूळले कुंतल खांद्यावरी,
गुलाबी लाली ओठी
स्मित हास्य चेहर्‍यावरी !

सज्ज धनुष्य भ्रुकुटी
करण्या वार कोणावरी?
नेत्री कटाक्ष तिरपा
ठेवित लक्ष प्रिया वरी !

सुडौल गौर काया
देतसे उठाव वसनांतरी,
परी म्हणू कि चित्र
भास हो पाहील्या वरी !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-shrungarik kavita/t28799/new/#new

शनिवार, १० जून, २०१७

हायकू

२७
गवत फुलं
वार्‍यावरती झुले
मन मोकळे

२६
झरा वाहतो
मंजुळ सरगम
सुर मैफल
२५
संततधार
भिजवतो पाऊस
छत्री उरूस

भय मार्ग

भय मार्ग

सोसायचे किती वार भूकेल्या नजरांचे
वाहायचे कसे डाग ओलेत्या जखमांचे

आक्रंदती मनातून...गात्रे हाेउन म्लानी
कोंडून राहती भाव...सारे आत मनीचे

तूम्हा न सांगता काहि लावूनी इथ बोली
देती विकून देहास......बाजारी मरणाचे

पैसाच येथला देव.....त्याचे पूजक सारे
तोची कमावती मोल लावूनी जगण्याचे

हा खेळ खेळतो कोण दावूनी भय मार्ग
खोटेच चालती डाव..जींकूनी हरण्याचे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28785/new/#new

शुक्रवार, ९ जून, २०१७

हायकू

२४
वळीव सरी
भोवती मृदगंध
अत्तर कुपी

२३
नाजुक कशी
दव थेंबाची नक्षी
हार रत्नांचा

२२
पाऊस सरी
गडगड मेघांची
वाजतो ताशा


हायकू

२१
तांबूस लाल
फुले गुलमोहर
वणवा रानी

२०
घुमताे वारा
मधूर रानोवनी
सूर पावरी


१९
लोलक थेंब
पानांवर चमके
कानी कुंडल 

हायकू

१८
ओढ्याला पाणी
पाण्याची खळ खळ
पायी पैंजण

१७
होता सुर्यास्त
विखुरला अंधार
दिवा राऊळी

१६
फुलां बहर
दरवळ रानात
चित्त प्रसन्न

हायकू

१५
रश्मी प्रसार
आसमंती तांबड
सुरू आन्हिक


१४
निळ्या सागरी
उसळतात लाटा
डोलते नाव


१३
जल प्रपात
सर्वत्र पाणी पाणी
उरी अकांत 

सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे

सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे
मी जाणून आहे पक्का तुला शहाणे

घेवुनी इथे मी फ्रँक्चर पाय माझा
अशा प्रसंगी का विचार यावा तुझा
टाळता न टळले इस्पितळात जाणे ।

क्रोध येतो मला तुला कसे कळावे
वांछित तुज होतो तेही ना उमजावे
ठरवून सुध्दा भेट झाले न तुझे येणे ।

स्मरता कधी तुला हे दुःख दूर होते
राहूनी मौन स्वतःला सावरले होते
धरावी न अपेक्षा असे मनात येणे ।

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t28769/new/#new

गुरुवार, ८ जून, २०१७

हायकू

१२
पाऊस गेला
पाखरांचे ठिपके
तारेवरती


११
चंद्र शितल
मंद झुळुक वारा
झोपते बाळ

१०
काळोख्या रात्री
तारकांचे पिसारे
आता निजा रे


घड्याळाकडे पहायचं असतं!

घड्याळाकडे पहायचं असतं!

ढग दाटून आल्यावर आणि पाऊस पडून गेल्यावर, वेळेचं भानच उरत नाही. एरवी सावली सोबत पळणार्‍या आम्हाला पाया खालच्या व लांबत जाणार्‍या सावल्यां वरून वेळेचा अंदाज बरोबर घेता येतो.

अशा अंधार वेळी, मग नजर वारंवार घड्याळाकडे जाते, तेंव्हा हळूच कुुणीतरी म्हणतं "काय गडबड, सारखं घड्याळ पाहताय?" काय बोलणार अशांना? वेळेशी तुमचं सुत जमणं फार महत्वाचं असं मला वाटतं. दर वर्षाचा पहिला पाऊस सगळ्यांना हवा हवासा वाटतो, तसाच बेभरवश्याचा अंधार देखिल, नंतर काय तर सवय होउन जाते दोघांचीही.

आपण मस्त पणे चालत असतो, इतक्यात सुर्यावर चादर टाकल्या सारखे ढग पसरतात, अंधार दाटु लागतो, अन् अवचित टपटप सुरू होते, सोबत छत्री तर नसतेच, कौतुक भरल्या डोळ्यांनी पडणारा एक एक थेंब डोळ्यात साठवू लागतो, कुणाला तरी आठवु लागतो, विसरतो कि आपण भिजतोय, त्यात सुद्धा एक सुुख असतं, मागील काहि महिन्यांच्या दाहक उन्हातुन सुटतोय याचं.

एक भुक असते प्रियकर, प्रेयसीला भेटण्याची, मुक्त नाही पण एकाच छत्रीत खेटून भिजण्याची, दोस्तां सोबत गरमागरम कांदा भजी खाण्याची, टपरीवर वाफाळता चहा पिण्याची, खरचं हि वेळ असते पहिल्या पावसाची, पहिल्या अंधारलेल्या वाटांची, म्हणुन तीचं भान ठेवायचं असतं, घड्याळाकडे पहायचं असतं.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919422779941/+919545976589 Email:sangle.su@gmail.com
http://marathikavita.co.in/marathi-lekh/!-28778/new/#new

हायकू


पानां वरती
पडण्या सरी दंग
जलतरंग

रानी हिरव्या
सळसळत्या सरी
नवी नवरी

शिळ पाखरू
या गवताळ रानी
मंजुळ गाणी

झांकी


हायकू


नभ सावळा
धरेस उत्सुकता
ॠतु ओलेता

मेघ गर्जना
सौदामिनीचा साज
चमके आज

ऊन सावली
खेळ रंगे आभाळी
या पावसाळी

हायकू


छोटं पाखरू
चिवचीव ते गाणे
टिपते दाणे

नभ दाटले
या पावसाच्या धारा
चिंब पसारा

निळे आभाळ
भिरभीरे पाखरू
मना सावरू

सोमवार, ५ जून, २०१७

कोरा कॅनवास


शहाणे व्हा-सजग व्हा

शहाणे व्हा-सजग व्हा

वृक्षसंवर्धन आम्हा जमेंना
नुसत्या आम्ही गप्पा करतो,
रस्ते न् बिल्डींग साठी
पाहिजे तशी झाडे तोडतो !

ढगांना सुद्धा हवी आहे
पृथ्वी छान चांगली हिरवीगार,
पाहून तीचे रूप गोजीरे
बरसतात मनसोक्त धुंवाधार !

तोच जर गेला संपावर
आम्ही रागवायचे कोणावर,
पैसा सुध्दा होतो खोटा
कसं यायचं त्यानं धरणीवर !

शहाणे व्हा, सजग व्हा
पर्यावरणाची सारे धरा कास,
सोडा गप्पा अन् आळस
मिळेल सर्वांना जीवन खास !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t28740/new/#new

शनिवार, ३ जून, २०१७

पण काहीही म्हणा... मतभेद


पण काहीही म्हणा... मतभेद

आमच्या आमच्यात
होत नाही एकी,
नेते मात्र करतात
सारे फेका फेकी !

एक म्हणतोय
घेतला संप मागे,
दुसरा म्हणतो
आम्हा कोण सांगे?

आपल्याच पायात
आपला पाय हवा,
नेतृत्व करायला
एकच मान्यवर हवा !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t28736/new/#new

ताटे

ताटे

कोणास लाभ आहे सांडून दूध वाटे
कोणा उपास राहे फेकून शाक वाटे
----------
नाही मिळे अनाथा खाण्यास एक वेळी
सांगाव यांस कोणी वाढून द्या कि ताटे
----------
=शिव 01062017

गुरुवार, १ जून, २०१७

मला वाटते... मुलगी एक दुवा


मला वाटते... झाड व सोबती


मला वाटते... मोठे पण


मला वाटते... प्रणय चित्र...