मंगळवार, २४ मार्च, २०२६

पाठीराखा तु समर्था

पाठीराखा तु समर्था

करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||धृ|| 

भय दु:खातून देते मुक्ती | भक्तवत्सल कारुण्य मुर्ती 
आहे अशी अपार शक्ती | थोर तुमची ब्रम्हांडी किर्ती
सर्वांचे दयाळू तारणहर्ता | तुम्ही भक्तांचे रक्षणकर्ता
करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||१||

दत्तगुरुंचेच स्वरूप तुम्ही | नाम आशेचे वटवृक्ष स्वामी 
पाठीशी असता काय कमी | तव कृपेचे याचक आम्ही
व्हा कृपाळा आमचे त्राता | हे ची मागणे मागतो आता
करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||२||

नामजपाने चिंता हरती | शांती लाभते अक्कलकोटी 
सकलांची तु कारुण्यमुर्ती | दृष्टी असावी आम्हावरती 
कठीण काय कृपा होता | घ्यावे शरण 'शिवास' आता
करु कशाला उगाच चिंता, पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण, जीवन माझे अवघे आता ||३||

https://marathikavita.co.in/index.php?topic=77309.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा