बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

सलगी न् वैर

सलगी न् वैर

नाही सलगी सुखाशी न् वैर माझे दु:खाशी
आवडतो जयांना मी तेच येतात माझ्याशी

नसता ओळख पाळख, काही इथे कुणाची
होते तरीही स्मित हास्य गर्दीत एकमेकांशी

माझे म्हणतो ज्यास मी, ते नेमके दूर जाती
साशंक राहतो जीव,लावावा जीव कुणाशी

घट्ट धरावी म्हणतो, जरा सावली डोक्यावर
लागलीच जुळवते ऊन मग सुत सावलीशी

मागावे काय! कसे आणि किती कोणाकडे
असमर्थ प्रश्न जे शरणागत होतात स्वतःशी

काय घडते भोवती कशाला, काही कळेना
म्हणून ना सलगी,ना वैर माझे इथे कुणाशी

https://marathikavita.co.in/index.php?topic=94278.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा