रविवार, १५ मे, २०१६

माझी मुंबई... आठवणीतली आणि आजची....

“ माझी मुंबई “

     मुंबई शहर, तुमच, आमचं, सगळ्याच! ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्या स्वप्नातलं! जगातील प्रत्येकाला वाटत, एकदा तरी इथ याव, इथले लोकं, बस, ट्रेनची गर्दी पहावी! वडापाव, कटींग चहाची चव घ्यावी! अविरत धावणार, कधीही न थांबणारं, जगातील सांर काहि एकवटलेल शहर म्हणून याचं सर्वांना आकर्षण, आणि हिच मुंबईची कालपर्यंतची ओळख.

     पण आता, मुंबईत खुप बदल झाले, बरेच चढउतार आले! पिढी बदलली, लोकहि बदलले, मुंबईने जुन्या नव्यांना सामावून घेतलं, आपलसं केलं, त्यामुळे मुंबई स्वत: बदलली. आता मुंबईत आहेत उंच गगनचुंबी ईमारती, सतत वाहणारे उड्डाणपूल, गर्दीने तुडूंब भरलेल्या बसेस, लोकल ट्रेन्स, आणि धावणारी, दडपणाखाली जगणारी माणसं.

     पूर्वी इथ मिल होत्या, कारखाने होते. पण आता... ते सारं गेलं, उरलेत ते फक्त त्यांचे भग्न अवशेष! त्यात होताहेत अपराध आणि सामुहिक बलात्कार. अशी नवी ओळख आता मुंबईची होवू लागली आहे. पण, आजहि खुप लोकांना जुन्या मुंबईची आठवण आहे, ज्याकाळी कशाची भीती नव्हती, एकमेकांची काळजी होती, दुसऱ्यासाठी जगणं होतं, बरचस आनंदाचं होत, सुखाच होतं, आपलेपणाच होत...! त्याच आठवणीचा हा एक काव्यात्मक प्रवास.......“ माझी मुंबई “
A poetic Journey of Mumbai…


माझी मुंबई ...

दुध केंद्रावर बाटल्यांची,
नाक्यावर पेपरवाल्यांची
शाळेत जाणाऱ्या मुलांची,
पाळीवाल्या कामगारांची
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

मुलांना मास्तरांची,
भुरटयांना पोलिसाची,
उचल्यांना दुकानदारांची,
माणसाला देवधर्माची,
भीती असायची तेंव्हा मुंबईत !

दुपार नंतर केंव्हाही,
आंटीच्या अड्ड्यावर पिणाऱ्याची,
चौपाटीवर मालिश वाल्यांची,
रस्त्यावर गंडेरी वाल्यांची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

संध्याकाळी चाकरमान्याची,
त्यानंतर उशीरा शौकीनाची,
चौका, वाड्यांमधून खेळांची,
रात्री पोलिसाच्या गस्तीची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

© शिवाजी सांगळे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा